रवींद्रचा फोन आला; 'आई ICU मध्ये आहे', भावुक होऊन पुण्यातील शिक्षिका मदतीला धावली अन् कांड झालं
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
शुक्रवार पेठेत राहणाऱ्या पीडित शिक्षिकेला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. समोरील व्यक्तीने 'रवींद्र' असे नाव सांगून आपण परिचयाचे असल्याची खात्री पटवून दिली.
पुणे : सायबर भामट्यांनी आता फसवणुकीसाठी मानवी भावनांचा आणि नात्यांचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. "माझी आई मृत्यूशी झुंज देत आहे, तिला वाचवण्यासाठी तातडीने पैशांची गरज आहे," असे भावनिक आवाहन करून एका भामट्याने पुण्यातील एका शिक्षिकेची दोन लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे पुणेकरांमध्ये चिंतेचे वातावरण असून, खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कसा रचला फसवणुकीचा सापळा?
शुक्रवार पेठेत राहणाऱ्या पीडित शिक्षिकेला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. समोरील व्यक्तीने 'रवींद्र' असे नाव सांगून आपण परिचयाचे असल्याची खात्री पटवून दिली. "माझी आई आयसीयूमध्ये (ICU) भरती आहे आणि तातडीने हॉस्पिटलचे बिल भरायचे आहे," असे सांगून त्याने मदतीची याचना केली.
भामट्याने शिताफीने सांगितले की, "माझा मित्र तुमच्या खात्यावर पैसे पाठवेल, ते तुम्ही फक्त मला ट्रान्सफर करा." शिक्षिकेने संशय व्यक्त करताच, त्याने एडिटिंगचा वापर करून पैसे जमा झाल्याचे खोटे मेसेज आणि बनावट स्क्रीनशॉट त्यांना पाठवले. समोरच्या व्यक्तीच्या आईचा जीव धोक्यात आहे, या भावनिक विचारातून शिक्षिकेने स्वतःच्या खात्यातून गुगल पे आणि युपीआयद्वारे दोन दिवसांत २ लाख रुपये पाठवले.
advertisement
फसवणूक कशी उघड झाली?
काही वेळाने शिक्षिकेने आपले बँक बॅलन्स तपासले असता, त्यांच्या खात्यात कोणतेही पैसे जमा झाले नसल्याचे समोर आले. उलट त्यांचे स्वतःचे २ लाख रुपये भामट्याने लांबवले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी खडक पोलीस ठाण्यात धाव घेतली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 20, 2026 2:51 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
रवींद्रचा फोन आला; 'आई ICU मध्ये आहे', भावुक होऊन पुण्यातील शिक्षिका मदतीला धावली अन् कांड झालं








