Maval Accident: पुणे हळहळलं! हातात शिवज्योत घेऊन धावले पण किल्ल्यावर पोहोचलेच नाही, 2 तरुणांचा मध्यरात्री रस्त्यातच दुर्दैवी अंत
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
आपल्या लाडक्या राजाची शिवज्योत विसापूर किल्ल्यावरून मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात घेऊन गावाकडे निघालेल्या दोन तरुण शिवभक्तांवर काळाने झडप घातली.
पुणे : आज संपूर्ण महाराष्ट्र तिथीनुसार श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करत असताना, मावळ तालुक्यातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. आपल्या लाडक्या राजाची शिवज्योत विसापूर किल्ल्यावरून मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात घेऊन गावाकडे निघालेल्या दोन तरुण शिवभक्तांवर काळाने झडप घातली. भरधाव कारने दिलेल्या भीषण धडकेत या दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण मावळात शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय?
मयत तरुणांची नावे ओंकार दत्ता आरडे आणि दर्शन बाळू शिंदे अशी आहेत. हे दोघेही शिवभक्त विसापूर किल्ल्यावरून शिवज्योत घेऊन स्वतःच्या गावी, म्हणजे शिंदेवाडीला पायी निघाले होते. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील नायगाव जवळ गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हे दोघे ज्योत घेऊन मार्गस्थ होते. त्याचवेळी, विरुद्ध दिशेने आलेल्या एका भरधाव कारने नियंत्रण सुटल्यामुळे दुभाजक (Divider) भेदले आणि थेट या शिवभक्तांना चिरडले. हा आघात इतका भीषण होता की, ओंकार आणि दर्शन यांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
शिवजयंतीच्या दिवशीच काळाचा घाला
ज्या उत्साहात हे तरुण 'जय भवानी, जय शिवाजी'चा जयघोष करत निघाले होते, तो आनंद काही क्षणातच दुर्घटनेत बदलला. हातातली शिवज्योत घेऊन गावाकडे पोहचण्याचे त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले. या दुर्घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, मावळचे सुपुत्र गमावल्याचे दु:ख संपूर्ण गावाला झाले आहे. पोलिसांकडून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित कारचालकावर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 06, 2026 8:33 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Maval Accident: पुणे हळहळलं! हातात शिवज्योत घेऊन धावले पण किल्ल्यावर पोहोचलेच नाही, 2 तरुणांचा मध्यरात्री रस्त्यातच दुर्दैवी अंत









