Pune Metro: पुणेकरांचं स्वप्न पूर्ण! आता थेट विमानतळापर्यंत धावणार मेट्रो; ट्रॅफिकचं टेन्शन विसरा, असा असेल नवा मार्ग
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. लोहगाव विमानतळावर जाण्यासाठी आता पुणेकरांना ट्रॅफिकमध्ये अडकण्याची गरज भासणार नाही.
पुणे: पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. लोहगाव विमानतळावर जाण्यासाठी आता पुणेकरांना ट्रॅफिकमध्ये अडकण्याची गरज भासणार नाही. वनाझ-रामवाडी मेट्रो मार्गिका आता थेट विमानतळापर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी कल्याणीनगरमार्गे जाणाऱ्या मार्गावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
कसा असेल नवा मेट्रो मार्ग?
केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतलेल्या बैठकीत 'महामेट्रो'ने सादर केलेल्या सहा पर्यायांपैकी कल्याणीनगर स्पर लाईनला हिरवा कंदील दाखवण्यात आला. हा मार्ग कल्याणीनगर स्थानकाच्या पुढून सिम्बायोसिस कॉलेजमार्गे थेट विमानतळाजवळील एरोमॉलपर्यंत जाईल.
advertisement
या मार्गाची खास वैशिष्ट्ये:
या मार्गासाठी जमिनीचे अधिग्रहण कमीत कमी करावे लागणार आहे. हा मार्ग मुख्यत्वे रस्त्यावरून जाणार असल्याने संरक्षण मंत्रालयाच्या हद्दीतील जागेचा प्रश्न उद्भवणार नाही, त्यामुळे परवानगी मिळणे सोपे होईल. प्रवाशांना रामवाडी किंवा इतर ठिकाणाहून रिक्षा-टॅक्सी करण्याची गरज उरणार नाही, मेट्रो थेट विमानतळाच्या दारात उतरेल.
पुढचे नियोजन काय?
महामेट्रो लवकरच या विस्तारित मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा (DPR) पुणे महानगरपालिकेला सादर करणार आहे. यासोबतच वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मार्गांच्या कामालाही लवकरच गती मिळणार आहे. तसेच शहराच्या वाढत्या विस्तारासाठी शेवाळेवाडी-कात्रज-वाकड फाटा असा महामार्गाला समांतर मेट्रो मार्गही नियोजित आहे.
advertisement
विमानतळ विस्ताराचा हा नवा मार्ग तांत्रिकदृष्ट्या अधिक व्यवहार्य मानला जात आहे. यापूर्वी विमानतळापर्यंत मेट्रो नेण्यासाठी अनेक पर्यायांचा विचार करण्यात आला होता, मात्र संरक्षण विभागाच्या जागांचा तांत्रिक अडथळा येत होता. आता कल्याणीनगरमार्गे थेट सार्वजनिक रस्त्यांवरून (Right of Way) ही मेट्रो जाणार असल्याने कोणत्याही मोठ्या भूसंपादनाची गरज उरणार नाही.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 04, 2026 1:10 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Metro: पुणेकरांचं स्वप्न पूर्ण! आता थेट विमानतळापर्यंत धावणार मेट्रो; ट्रॅफिकचं टेन्शन विसरा, असा असेल नवा मार्ग








