पुणे मेट्रोचा प्रवास 'सुसाट', पण बाहेर पडताच 'पायपीट'! बसथांबे हलवले अन् रिक्षावाल्यांची चांदी; काय घडतंय?
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
नगर रस्ता, विमाननगर, खराडी आणि वाघोली परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने रामवाडी मेट्रोचा वापर करतात. यापूर्वी मेट्रो स्थानकातून बाहेर पडताच बस मिळत असे.
पुणे: शहरात सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून मेट्रो सुरू करण्यात आली. मात्र, मेट्रो आणि पीएमपी (PMPML) यांच्यातील समन्वयाअभावी प्रवाशांचे हाल संपताना दिसत नाहीत. रामवाडी मेट्रो स्थानकाखालील बसथांबा वाहतूक कोंडीचे कारण देऊन चक्क २०० मीटर पुढे हलवण्यात आला आहे. यामुळे दररोज १५ ते २० हजार प्रवाशांना विनाकारण पायपीट करावी लागत असून, या निर्णयाचा थेट फायदा रिक्षाचालकांना होत असल्याचे चित्र आहे.
नगर रस्ता, विमाननगर, खराडी आणि वाघोली परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने रामवाडी मेट्रोचा वापर करतात. यापूर्वी मेट्रो स्थानकातून बाहेर पडताच बस मिळत असे. आता थांबा पुढे हलवल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विमानतळावरून सामानासह येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे, ज्या ठिकाणी बसमुळे 'कोंडी' होते असे सांगितले जाते, त्याच ठिकाणी रिक्षा आणि खासगी कॅबच्या रांगा लागलेल्या असतात. मग कोंडी केवळ बसमुळेच होते का? असा संतप्त सवाल पुणेकर विचारत आहेत.
advertisement
शिवाजीनगरमध्येही 'पायपीट'
केवळ रामवाडीच नव्हे, तर पोलिसांच्या सूचनेनुसार पीएमपीने अनेक ठिकाणचे थांबे हलवले आहेत. सीओईपी (COEP) होस्टेल येथील दोन थांबे पुढे हलवण्यात आले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र (शिवाजीनगर) येथील महत्त्वाचा थांबा हलवण्याचे पत्रही पोलिसांनी दिले आहे. जर हा थांबा हलवला, तर प्रवाशांना लांबपर्यंत चालत जावे लागेल, ज्यामुळे ते नाईलाजाने खासगी वाहनांचा किंवा रिक्षाचा पर्याय निवडतील.
advertisement
शिवाजीनगरमध्ये 'बँक ऑफ महाराष्ट्र' समोर सायंकाळी खासगी ट्रॅव्हल्सची मोठी गर्दी असते, ज्यामुळे खरी वाहतूक कोंडी होते. मात्र, त्यावर कारवाई करण्याऐवजी सर्वसामान्यांच्या बसचे थांबे हलवण्यावर भर दिला जात आहे. रामवाडी स्थानकाबाहेर रिक्षाचालक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत.सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याऐवजी फीडर सेवेचा कणा असलेल्या बस थांब्यांवरच गदा येत असल्याने पुणेकरांमध्ये तीव्र नाराजी आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 27, 2026 1:18 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणे मेट्रोचा प्रवास 'सुसाट', पण बाहेर पडताच 'पायपीट'! बसथांबे हलवले अन् रिक्षावाल्यांची चांदी; काय घडतंय?







