ते पान खाताच ग्राहक 'बेशुद्ध'; तपासात पुण्यातील 'मोठं कांड' उघड, कारखान्यावर छापा टाकताच पोलिसांचेही डोळे विस्फारले
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुण्यातील एका पानटपरीवर 'फूलचंद' पान खाल्ल्यानंतर एका ग्राहकाला अचानक गुंगी आली आणि याच एका घटनेने अंमली पदार्थांच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे
पुणे : 'खइके पान बनारसवाला' म्हणत पानाची चव चाखणाऱ्या शौकिनांसाठी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील एका पानटपरीवर 'फूलचंद' पान खाल्ल्यानंतर एका ग्राहकाला अचानक गुंगी आली आणि याच एका घटनेने अंमली पदार्थांच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पानाच्या आडून तरुणाईला नशेच्या जाळ्यात ओढणाऱ्या या टोळीचे धागेदोरे आता थेट कारखान्यापर्यंत पोहोचले आहेत.
पाण्यातून नाही, तर 'पानातून' नशा
गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील पानटपऱ्यांवर 'कडक' आणि 'फूलचंद' नावाच्या पानांची मागणी वाढली होती. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि पानाची 'किक' वाढवण्यासाठी काही विक्रेते चक्क अमली पदार्थांच्या पावडरचा वापर करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. या घातक पावडरची किंमत सुमारे दोन हजार रुपये प्रति ग्रॅम असून, ती काथ किंवा तंबाखूमध्ये मिसळून ग्राहकांना दिली जात होती.
advertisement
जांबे येथील कारखान्यावर छापा
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने तपास सुरू केला असता, याचे धागेदोरे मुळशी तालुक्यातील जांबे गावापर्यंत पोहोचले. तिथे या नशेच्या पावडरची निर्मिती करणारा कारखानाच पोलिसांनी शोधून काढला. हिंजवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाल्हेकरवाडीतील एका पानटपरीवरही पोलिसांनी छापेमारी करून साठा जप्त केला आहे.
advertisement
मेंदूवर थेट परिणाम करणारे घातक घटक
जप्त केलेल्या पावडरच्या प्राथमिक तपासात ओपिएट्स, बेन्झोडायझेपीन आणि मेथाम्फेटामाइन यांसारख्या अतिशय घातक ड्रग्जचा अंश आढळला आहे. हे पदार्थ थेट मानवी मेंदूवर परिणाम करतात, ज्यामुळे व्यक्तीला तात्काळ गुंगी किंवा नशा चढते. याचे सतत सेवन केल्यास मानसिक अस्थिरता आणि गंभीर आजार होऊ शकतात.
"पानाच्या माध्यमातून अमली पदार्थांची विक्री करणे हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. आम्ही हे नेटवर्क पूर्णपणे उद्ध्वस्त करू," असा इशारा पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिला आहे. सध्या जप्त नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले असून, लवकरच यातील मोठ्या माशांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 23, 2026 7:08 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
ते पान खाताच ग्राहक 'बेशुद्ध'; तपासात पुण्यातील 'मोठं कांड' उघड, कारखान्यावर छापा टाकताच पोलिसांचेही डोळे विस्फारले







