PMPML Bus: पुण्यातील प्रवास आता 'सुपरफास्ट; पुणेकरांच्या सेवेसाठी पीएमपीचा मेगा प्लॅन तयार
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
प्रवाशांसाठी सर्वात दिलासादायक बाब म्हणजे बसच्या प्रतीक्षेचा कालावधी निम्म्याने कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या प्रवाशांना बससाठी सरासरी २० मिनिटे ताटकळावे लागते
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्रातील सार्वजनिक वाहतुकीचा चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टीने पीएमपीएमएल प्रशासनाने कंबर कसली आहे. एप्रिल-मे २०२६ पर्यंत ताफ्यात तब्बल अडीच हजार नवीन बस दाखल होणार आहेत. या मेगा विस्तारामुळे पुणेकरांचा प्रवास अधिक सुसह्य होणार आहे. सध्या असलेल्या ३९४ बस मार्गांची व्यापक पुनर्रचना करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. नवीन बस उपलब्ध झाल्यानंतर मार्गांच्या संख्येत किमान शंभरने वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे उपनगरांपर्यंत पीएमपीचे जाळे अधिक घट्ट विणले जाणार आहे.
प्रवाशांसाठी सर्वात दिलासादायक बाब म्हणजे बसच्या प्रतीक्षेचा कालावधी निम्म्याने कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या प्रवाशांना बससाठी सरासरी २० मिनिटे ताटकळावे लागते, हे प्रमाण ८ ते १० मिनिटांवर आणण्यासाठी प्रशासन सूक्ष्म नियोजन करत आहे. ज्या मार्गांवर प्रवाशांची मोठी गर्दी असते, तिथे फेऱ्यांची संख्या वाढवली जाणार आहे. तर नवीन मार्गांसाठी आलेल्या प्रस्तावांचाही गांभीर्याने विचार केला जात आहे. वेटिंग टाईम कमी झाल्यास प्रवाशांची संख्या आणि पर्यायाने उत्पन्नात मोठी वाढ होईल, असा विश्वास पीएमपीला वाटत आहे.
advertisement
या नवीन गाड्यांच्या आगमनानंतर पीएमपीचा एकूण ताफा सुमारे ४,००० बसपर्यंत पोहोचणार असून दैनंदिन प्रवासी संख्या १८ लाखांच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. यामुळे दिवसाचे उत्पन्न सुमारे चार कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी स्पष्ट केले की, ताफ्यात येणाऱ्या अडीच हजार बसच्या पार्श्वभूमीवर मार्गांच्या पुनर्रचनेचे काम सुरू झाले आहे. आगामी काळात ही सेवा अधिक सक्षम आणि व्यापक करण्यावर आमचा भर आहे. या सर्व प्रक्रियेला आगामी निवडणुकांनंतर अधिक गती मिळणार असून पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीचे चित्र पूर्णपणे बदलणार आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 26, 2025 11:15 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
PMPML Bus: पुण्यातील प्रवास आता 'सुपरफास्ट; पुणेकरांच्या सेवेसाठी पीएमपीचा मेगा प्लॅन तयार








