सिग्नलवर यायचे, कारच्या काचेवर टक-टक वाजवायचे अन् मग क्षणात मोठं कांड; त्या घटनांनी पुण्यात खळबळ, अखेर दोघांना बेड्या
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
सिग्नलवर किंवा गर्दीच्या ठिकाणी ही टोळी चारचाकी वाहनांना मागून धडक देते. यानंतर गाडीच्या काचेवर 'टक-टक' करून चालकाचे लक्ष विचलित करते.
(अभिजीत पोटे, प्रतिनिधी) पुणे : पुण्यातील एका गँगने चोरीसाठी एक अजब पद्धत शोधली होती. सिग्नलवर उभ्या असलेल्या महागड्या गाड्यांना लक्ष्य करणाऱ्या आणि चालकाचे लक्ष विचलित करून चोरी करणाऱ्या कुप्रसिद्ध 'टक-टक' गँगच्या दोन अट्टल आरोपींना अखेर पुणे गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. या टोळीने पुणे शहरात चोरीचा धुमाकूळ घातला होता, मात्र आता ते पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत.
काय आहे 'टक-टक' गँगची पद्धत?
ही गँग अतिशय शिताफीने काम करते. सिग्नलवर किंवा गर्दीच्या ठिकाणी ही टोळी चारचाकी वाहनांना मागून धडक देते. यानंतर गाडीच्या काचेवर 'टक-टक' करून चालकाचे लक्ष विचलित करते. चालक काय झाले हे पाहण्यासाठी गाडीतून खाली उतरताच किंवा काच खाली करताच, संधी साधून गाडीतील मोबाईल, लॅपटॉप, बॅगा आणि रोख रकमेवर ही टोळी डल्ला मारते.
advertisement
पोलिसांचा सापळा आणि अटक
फरासखाना पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाला सीसीटीव्ही फुटेजमधून दोन संशयित आरोपी दिसले. पोलीस कर्मचारी मयूर भोसले, अमित जमदाडे आणि हेमंत पेरणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, हे आरोपी समर्थ पोलीस ठाणे हद्दीतील एका लॉजवर येणार होते. पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्वरित सापळा रचला आणि रवी ओमप्रकाश कोहली (३८) व अफजल कय्युम अब्बासी (३८) या उत्तर प्रदेशातील (मेरठ) मूळ रहिवासी असलेल्या दोघांना जेरबंद केले.
advertisement
चौकशी दरम्यान, आरोपींनी पुणे शहरात अशा प्रकारे अनेक चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या अटकेमुळे शहरात दाखल असलेल्या टक-टक गँगच्या अन्य सदस्यांचा शोध घेण्यास पोलिसांना मदत होणार आहे. वाहनचालकांनी सिग्नलवर अशा प्रकारे कुणीही बोलावले किंवा धडक दिली, तर सावध राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 14, 2026 9:57 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
सिग्नलवर यायचे, कारच्या काचेवर टक-टक वाजवायचे अन् मग क्षणात मोठं कांड; त्या घटनांनी पुण्यात खळबळ, अखेर दोघांना बेड्या






