पुण्यात लहान मुलं चोरणारी टोळी? पुणे पोलिसांचा स्पष्ट खुलासा, पुणेकरांना केलं आवाहन
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांनी अधिकृत निवेदन जारी करत या सर्व दावे पूर्णपणे खोटे, निराधार आणि अफवांवर आधारित असल्याचे स्पष्ट केले आहे.
पुणे : शहरात बालअपहरण करणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवा सध्या सोशल मीडियावर वेगाने पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांनी अधिकृत निवेदन जारी करत या सर्व दावे पूर्णपणे खोटे, निराधार आणि अफवांवर आधारित असल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रम निर्माण करण्याच्या उद्देशाने अशा संदेशाचा प्रसार केला जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अलीकडील काळात व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या समाजमाध्यमांवर बालअपहरण टोळी शहरात फिरत आहे, लहान मुलांना लक्ष्य केले जात आहे अशा प्रकारचे संदेश, व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप्स फिरत आहेत. मात्र, अशा कोणत्याही टोळीविषयी किंवा घटनांविषयी पुणे शहरात कोणतीही अधिकृत तक्रार किंवा पुष्टी मिळालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
advertisement
अफवांमुळे विशेषतः पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते, शाळा, वसाहती आणि सार्वजनिक ठिकाणी गैरसमज पसरतात. काही वेळा संशयावरून निष्पाप व्यक्तींना त्रास दिला जाण्याचे प्रकारही घडतात. त्यामुळे अशा अपप्रचाराला थारा न देता, माहितीची सत्यता तपासणे अत्यंत आवश्यक आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
पुणे शहर पोलिसांनी नागरिकांना तीन महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. प्रथम, कोणतीही माहिती अधिकृत स्रोतांकडून पडताळल्याशिवाय विश्वास ठेवू नये. दुसरे, अफवा पसरवणारे संदेश, व्हिडिओ किंवा पोस्ट सोशल मीडियावर पुढे पाठवू नयेत. तिसरे, कुठेही संशयास्पद प्रकार आढळल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा 112 या आपत्कालीन क्रमांकावर फोन करावा.
advertisement
यासोबतच, नागरिकांनी पुणे शहर पोलिसांच्या अधिकृत समाजमाध्यम खात्यांवरून दिल्या जाणाऱ्या सूचनांकडे लक्ष द्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. खोटी माहिती रोखणे आणि शहरात शांतता व सुरक्षितता राखणे ही सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांनी सजग राहून अफवांना बळी न पडता, पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पुणे शहर पोलिसांनी केले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 17, 2026 8:55 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात लहान मुलं चोरणारी टोळी? पुणे पोलिसांचा स्पष्ट खुलासा, पुणेकरांना केलं आवाहन










