Katraj Zoo: सिंह, झेब्रा आता पुण्यात पाहता येणार, राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचं तिकीट महागणार, कारण...
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Rajiv Gandhi Zoo: पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालय पाहण्यासाठी देश आणि विदेशातूनही लोक येतात. आता या ठिकाणी भेट देणं महागणार आहे.
पुणे : पुण्यातील कात्रज येथे असणारे राजीव गांधी प्राणी संग्रहालय हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय असून, राज्यासह परदेशातूनही मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे भेट देतात. पण आता या प्राणी संग्रहालयाला भेट देणे महागण्याची शक्यता आहे. पुणे महापालिका प्रशासनाने प्रवेश शुल्कात तब्बल 50 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. प्राणीसंग्रहालयाला मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होत असल्याने शुल्कवाढ करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
गेल्या काही वर्षांत प्राणीसंग्रहालयाचे व्यवस्थापन, प्राण्यांची देखरेख, खाद्य खर्च आणि इतर देखभाल खर्चात मोठी वाढ झाली आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकातून संग्रहालयाच्या विस्तारासाठी मोठा निधी देण्यात येत आहे. आगामी काळात हा खर्च आणखी वाढण्याची शक्यता असल्याने प्रवेशशुल्क वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
advertisement
सध्या लहान मुलांचे (4 फूट 4 इंच उंचीपर्यंत) तिकीट 10 रुपये असून, प्रस्तावानुसार ते 20 रुपये करण्यात येणार आहे. तर प्रौढ व्यक्तींसाठीचे 40 रुपयांचे तिकीट 60 रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. विदेशी नागरिकांसाठी शुल्क 900 रुपयांवरून वाढवून 1350 रुपये करण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठीचे विशेष दरही वाढवण्यात येणार आहेत. दरवाढीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार करून उद्यान विभागामार्फत समितीसमोर ठेवला आहे.
advertisement
2018 नंतर सात वर्षांत प्रवेशशुल्कात कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती. या कालावधीत प्राणीसंग्रहालयाने विस्ताराचा मोठा टप्पा पार पाडला आहे. सध्या सुरू असलेल्या विस्तारीकरणानंतर सिंह, पुच्छ वानर, पिसोरी हरीण, झेब्रा यांसारखे आकर्षक प्राणी संग्रहालयात दाखल होणार आहेत. तसेच मार्मोसेट, टॅमरिन वानर आणि रानकुत्री देखील लवकरच दाखल होणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे.
advertisement
देशातील इतर प्रमुख प्राणीसंग्रहालयांच्या तुलनेत पुण्यातील तिकीट दर कमी असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. त्यामुळे पर्यटकांच्या खिशावर मोठा भार न पडता ‘सुविहित आणि न्याय्य’ दर आकारले जातील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्राणीसंग्रहालयाची गुणवत्ता, नवनवीन प्राणी आणि संशोधन सुविधा वाढवण्यासाठी आर्थिक स्थैर्य आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले.
दरवाढीचा अंतिम निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेतला जाणार असून, मंजुरी मिळाल्यास पुणेकरांना आणि पर्यटकांना प्राणी संग्रहालयाची सफर पूर्वीपेक्षा महाग पडणार आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 14, 2025 12:59 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Katraj Zoo: सिंह, झेब्रा आता पुण्यात पाहता येणार, राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचं तिकीट महागणार, कारण...


