पुण्यातला डोंगराळ भाग, रात्रीची वेळ अन् ते हिरव्या रंगाचं प्लॅस्टिक कॅन; उघडताच पोलीसही चक्रावले
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आकाश पाटील यांच्या पथकाने रात्रीच्या अंधारात डोंगराळ भागात छापा टाकला. यावेळी पोलिसांना हिरव्या रंगाचे एक प्लास्टिक कॅन सापडले.
पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात आपला मोर्चा वळवला आहे. वेल्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. गेल्या शुक्रवारी रात्री उशिरा डोंगराळ भागात आणि एका पोल्ट्री फार्मच्या आडोशाला सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या अड्ड्यांवर छापे टाकून पोलीसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत.
आंबवणे डोंगराळ भागातील थरार
मिळालेली पहिली माहिती अत्यंत धक्कादायक होती. वेल्हे तालुक्यातील आंबवणे गावाच्या हद्दीत, निर्जन डोंगराळ भागात बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू विक्री होत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आकाश पाटील यांच्या पथकाने रात्रीच्या अंधारात डोंगराळ भागात छापा टाकला. यावेळी पोलिसांना हिरव्या रंगाचे एक प्लास्टिक कॅन सापडले. ते उघडले असता त्यात सुमारे साडेआठ लिटर तयार गावठी दारू मिळून आली. या प्रकरणी सुरेश राजाराम इंगुळकर (रा. अडवली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
पोल्ट्री फार्मच्या आडोशाला 'भट्टी'
दुसरी कारवाई पानशेत परिसरातील रानवडी येथे करण्यात आली. येथे एका पोल्ट्री फार्मच्या शेडचा आडोसा घेऊन अवैध दारू विक्री सुरू होती. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) या ठिकाणी धाड टाकून गणेश दत्तात्रय निवंगुणे (रा. आंबी, ता. हवेली) याला ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी २० लिटर गावठी हातभट्टी जप्त केली आहे.
advertisement
हवालदार मंगेश भगत यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून, ज्ञानदीप दिवार आणि पंकज मोघे पुढील तपास करत आहेत. दुर्गम भागाचा फायदा घेऊन सुरू असलेल्या या 'भानगडी' मोडीत काढण्यासाठी आता पोलिसांनी कंबर कसली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 26, 2026 10:44 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यातला डोंगराळ भाग, रात्रीची वेळ अन् ते हिरव्या रंगाचं प्लॅस्टिक कॅन; उघडताच पोलीसही चक्रावले








