2 वर्ष, 2 मुलं पण ठिकाण अन् हत्येची पद्धत सारखीच; पुण्याला हादरवणाऱ्या 'त्या' प्रकरणात सिरियल किलरचा धक्कादायक खुलासा
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
या प्रकरणातील पहिली घटना २१ जून २०२४ रोजी घडली होती, तर दुसरी घटना १७ मार्च २०२६ रोजी घडली. दोन्ही मुलांचे वय ११ ते १२ वर्षे होते आणि दोघांच्याही हत्येची पद्धत एकच होती.
पुणे : शिरूर तालुक्यातील दहिवडी परिसरात गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या 'डेथ मिस्ट्री'चा अखेर उलगडा झाला आहे. एका २२ वर्षीय तरुणाने केवळ समलैंगिक संबंधांना विरोध केला म्हणून दोन निष्पाप अल्पवयीन मुलांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची कबुली दिली आहे. अक्षय दत्तात्रेय मांजरे (वय २२) असे या नराधम आरोपीचे नाव आहे. त्याच्या या खुलाशामुळे संपूर्ण पुणे जिल्हा हादरून गेला आहे.
दोन घटनांनंतर उलगडा
या प्रकरणातील पहिली घटना २१ जून २०२४ रोजी घडली होती, तर दुसरी घटना १७ मार्च २०२६ रोजी घडली. दोन्ही मुलांचे वय ११ ते १२ वर्षे होते आणि दोघांच्याही हत्येची पद्धत एकच होती. विशेष म्हणजे, दोन्ही मृतदेह एकाच शेतात सापडले होते.
सुरुवातीला पोलिसांनी या दोन्ही घटनांकडे गांभीर्याने न पाहता, हा बिबट्याचा हल्ला असल्याची शक्यता वर्तवून तपास वनविभागाकडे ढकलला होता. मात्र, वनविभागाने वन्यप्राण्याचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केल्यानंतरही पोलिसांनी टाळाटाळ केली. पहिल्या खुनाच्या वेळी अक्षय मांजरेवर संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी त्याला साधी चौकशी करून सोडून दिले. पोलिसांच्या या हलगर्जीपणामुळे हा सिरियल किलर तब्बल २१ महिने मोकाट फिरत राहिला आणि त्याने दुसऱ्या मुलाचा बळी घेतला.
advertisement
दुसऱ्या मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर दहिवडीतील ग्रामस्थ आक्रमक झाले. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. ग्रामस्थांच्या प्रचंड दबावानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या २४ तासांत अक्षय मांजरेला बेड्या ठोकल्या.
तपासात समोर आले की, आरोपी अक्षय पहिल्या मुलाच्या अंत्यविधीतही सहभागी झाला होता, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. सध्या न्यायालयाने आरोपीला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, शिक्रापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 21, 2026 12:57 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
2 वर्ष, 2 मुलं पण ठिकाण अन् हत्येची पद्धत सारखीच; पुण्याला हादरवणाऱ्या 'त्या' प्रकरणात सिरियल किलरचा धक्कादायक खुलासा






