तोडणार हे निश्चित! तरी कोट्यवधींचा खर्च कशासाठी? सिंहगड रस्ता उड्डाणपुलावर 2 कोटींच्या रोषणाईला मंजुरी
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
सिंहगड रस्त्यावर नुकताच बांधून पूर्ण झालेल्या उड्डाणपुलाचा पुढील काही महिन्यांत मेट्रो प्रकल्पासाठी ६६ ठिकाणी काही भाग तोडला जाणार आहे. तरी, आता या पुलावर तब्बल १ कोटी ८० लाख रुपये खर्च करून विद्युतरोषणाई करण्याचा घाट विद्युत विभागाने घातला आहे
पुणे: पुणे महानगरपालिकेच्या एका वादग्रस्त निर्णयामुळे शहरातील नियोजन आणि निधीच्या वापराबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. सिंहगड रस्त्यावर नुकताच बांधून पूर्ण झालेल्या उड्डाणपुलाचा पुढील काही महिन्यांत मेट्रो प्रकल्पासाठी ६६ ठिकाणी काही भाग तोडला जाणार आहे. तरी, आता या पुलावर तब्बल १ कोटी ८० लाख रुपये खर्च करून विद्युतरोषणाई करण्याचा घाट विद्युत विभागाने घातला आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने शुक्रवारी या खर्चाला मंजुरी दिल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
वाहतूक कोंडीवर उपाय, पण आता मेट्रोची अडचण
सिंहगड रस्ता (नरवीर तानाजी मालुसरे रस्ता) हा वडगाव, धायरी, खडकवासला आणि पानशेतकडून शहरात ये-जा करण्यासाठीचा मुख्य मार्ग आहे. या भागात वाढलेल्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी पालिकेने राजाराम पूल चौक ते फन टाइम थिएटर यादरम्यान दोन मोठे उड्डाणपूल (राजाराम चौकाजवळ एक आणि विठ्ठलवाडी ते फन टाइम थिएटरदरम्यान दुसरा) उभारले आहेत. या उड्डाणपुलांचे काही टप्पे वाहतुकीसाठी खुलेही झाले आहेत. माणिकबाग ते विठ्ठलवाडी हा शेवटचा टप्पाही नुकताच खुला करण्यात आला आहे.
advertisement
मेट्रो मार्गासाठी पुलाचे ६६ भाग तोडावे लागणार
नुकताच केंद्र सरकारने खडकवासला ते हडपसर या मेट्रो प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. नियोजित मेट्रो मार्ग याच सिंहगड रस्त्यावरून जाणार आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंच्या रॅम्पमध्ये मेट्रोच्या खांबांची उभारणी करण्यात आली असली, तरी उड्डाणपुलाच्या मुख्य भागातून मेट्रोचे पिलर उभे करण्यासाठी पुलाचा काही भाग ६६ ठिकाणी तोडावा लागणार आहे.
advertisement
उड्डाणपूल तोडण्याची ही प्रक्रिया पुढील काही महिन्यांत सुरू होण्याची दाट शक्यता असतानाही, महापालिकेच्या विद्युत विभागाने या पुलाच्या सौंदर्यीकरणासाठी आणि विद्युतरोषणाईसाठी १ कोटी ७९ लाख २५ हजार ९२ रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला. इतक्या मोठ्या तोडफोडीच्या कामाच्या अगदी तोंडावर कोट्यवधींचा हा अनावश्यक खर्च कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र, शुक्रवारी झालेल्या बैठकीत स्थायी समितीने या खर्चाला मान्यता दिली आहे. हा खर्च म्हणजे सार्वजनिक पैशाचा अपव्यय आहे, अशी टीका आता पुणेकर नागरिक आणि विरोधी पक्षांकडून होत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 14, 2025 8:51 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
तोडणार हे निश्चित! तरी कोट्यवधींचा खर्च कशासाठी? सिंहगड रस्ता उड्डाणपुलावर 2 कोटींच्या रोषणाईला मंजुरी











