'इस हिजडे को यहां क्यों बिठाया?' अन् पुण्यातल्या प्रियाचा संघर्ष सुरू; आता झटतोय बेघर मुलांच्या शिक्षणासाठी !
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
पुण्यातल्या तृतीयपंथीयानं उपेक्षित ते प्रेरणादायी आयुष्य असा प्रवास केला आहे.
पुणे, 21 ऑगस्ट : स्त्री-पुरुष समानता या विषयावर आपण अनेकदा वादविवाद करतो. त्याचवेळी समाजात तृतीयपंथी हा देखील एक वर्ग आहे, हे विसरुन जातो. त्यांच्या समानतेबद्दल कुणीही बोलत नाही. लोकांकडून होणारा भेदभाव, अवहेलना आणि न संपणारा संघर्ष हा त्यांच्या पाचवीलाच पुजलेला! यामध्ये काही जण हातावर हात धरून राहतात तर काही तृतीयपंथियांसाठी हा संघर्षच 'टर्निंग पॉईंट' ठरतो. जे समाजाने आपल्यासाठी केलं नाही ते आपणच करायचं असं ठरवून त्यांचे टाळी वाजवून 'मागणारे' हात 'देणारे' हात होतात.
पुण्यातल्या अमित उर्फ प्रिया उर्फ आम्रपाली या तृतीयपंथीयाचा असाच प्रवास आहे. उपेक्षित ते प्रेरणादायी आयुष्य असा प्रवास त्यानं केलाय. केवळ विशिष्ट एका क्षेत्रामध्ये नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तो आज समाजसेवेचे काम करत आहेत. त्यांचा हा धगधगता प्रवास प्रत्येकाला खूप काही शिकवून जाणारा आहे.
advertisement
पुण्यातल्या तळेगाव दाभाडेमध्ये अमित उर्फ प्रिया जन्म झाला. घरची गरिबी, वडील व्यसनाच्या आहारी गेलेले. आई घरकाम करून घर चालवायची. अमित पाचवीमध्ये असताना वडिलांचं निधन झालं. त्यानंतर त्यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू झाला. वयाच्या 12 व्या वर्षी आपण तृतीयपंथीय असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याला याबद्दल शाळेत मुलांकडून हिणवले जात असे.
advertisement
या खडतर परिस्थितीमध्येही त्यानं 'संघर्षावर मात करायची असेल तर शिक्षण कर', या आईच्या शिकवणीचं अनुकरण केलं. अमितनं परिस्थितीशी झुंजत दहावीपर्यंतचं शिक्षण केलं. दहावीत असतानाच संवादावरील प्रभुत्वयामुळे त्याला टेलीकॉलिंगमध्ये नोकरी मिळाली. नोकरीच्या पहिल्याच महिन्यात त्याने 'बेस्ट परफॉर्मर'चा अवॊर्ड मिळवला.
advertisement
कधी पडली ठिणगी?
अमितला नोकरीमध्ये पॅन इंडियाचा बेस्ट परफॉर्मर अवॊर्ड मिळाला होता.हा पुरस्कार घेण्यासाठी दिल्लीला जात असताना त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्याबद्दल 'इस हिजडे को यहां क्यों बिठाया?' असं कुजबुजताना ऐकले. ज्यांना अडचणीमध्ये मदत केली त्यांनी आपला अपमान केला, यामुळे अमित डिप्रेशनमध्ये गेला. त्याच्या मित्रानं त्याला डिप्रेशनमधून बाहेर काढलं.
संघर्ष वाट्याला आलाच आहे तर हालअपेष्टांच्या झळा सहन करून नव्हे तर स्वतः ज्योत होऊन इतरांचे आयुष्य उजळण्यासाठी प्रयत्न करायचा असे अमितने ठरवले. दुर्लक्षित, अनाथ मुलांसाठी तसेच तृतीयपंथीयांसाठी आयुष्य समर्पित करण्याचा ध्यास घेतला.
advertisement
बेघर मुलांसाठी 'फुटपाथ शाळा'
फुटपाथवरील बेघर मुलांचे आयुष्य बदलायचे असेल तर त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायला हवे या उद्देशाने अमितने 'फुटपाथ शाळा' ही संकल्पना सुरू केली. पुण्यात मालधक्का चौक, स्वारगेट, वाघोली, ताडीवाला रोड, रावेत, विश्रांतवाडी अशा सहा ठिकाणी या शाळा सुरू आहेत. पालकांची परवानगी असल्यास शासकीय शाळांमध्ये मुलांचे ऍडमिशन करून देतो,अशी माहिती अमितने दिली. अमितने स्वतः कष्ट करून पैसे गळा करून साधारण 600 मुलांची फी भरली आहे. सध्या फूटपाथ शाळेमध्ये 40-45 मुलं आहेत.
advertisement
फुटपाथ शाळेव्यतिरिक्त ससूनमध्ये अन्नदानाचे काम करणे, मुक्या प्राण्यांसाठी कार्य करणे, स्त्री आरोग्याविषयी जागृती करणे, व्यसनमुक्ती, 'जेंडर इक्विटी' विषयावर व्याख्यान देणे अशी वेगवेगळ्या माध्यमातून अमितचे समाजसेवेचे व्रत अविरत सुरू आहे.
'उपेक्षित, दुर्लक्षित, माझ्यासारख्या तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माझे कार्य सुरू आहे. आजपर्यंत लोकांनी मागणारी टाळी बघितली आहे पण समाजाचे दायित्व पूर्ण करणारी टाळीसुद्धा दिसावी यासाठी मी झटत आहे, अशी भावना अमितनं यावेळी व्यक्त केली.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 21, 2023 10:36 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
'इस हिजडे को यहां क्यों बिठाया?' अन् पुण्यातल्या प्रियाचा संघर्ष सुरू; आता झटतोय बेघर मुलांच्या शिक्षणासाठी !