पुण्यातील अजब लग्नाची गजब स्टोरी! मुस्लिम कपलच्या रिसेप्शनमध्ये हिंदू कपलने लग्नगाठ बांधली
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Pune Wedding: हिंदू कपलच्या लग्नात पावसानं खोळंबा केला. तेव्हा पुण्यातील मुस्लिम कुटुंबानं रिसेप्शनचा हॉल दिला. या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
पुणे : धर्माच्या सीमा ओलांडत माणुसकीचा हात पुढे करणाऱ्या एका हृदयस्पर्शी घटनेने पुणेकरांच्या मनाचा ठाव घेतलाय. मुसळधार पावसामुळे वानवडीतील एका हिंदू कुटुंबाचा विवाहसोहळा अडचणीत आला. अशा वेळी शेजारचं मुस्लिम कुटुंब मदतीसाठी सरसावलं. केवळ रिसेप्शन हॉलच नव्हे, तर एक वडील म्हणून दुसऱ्या वडिलांच्या स्वप्नांना आधार दिला. आता या लग्नाची सर्वत्र चर्चा होतेय.
विवाह थांबला, पण माणुसकीने दिलं नवजीवन
कवडे आणि गलांडे कुटुंबीयांनी आपल्या प्रिय मुला-मुलीच्या विवाहासाठी वानवडी परिसरातील खुल्या लॉनमध्ये सर्व तयारी उरकली होती. सजावट, रोषणाई, पाहुण्यांची रेलचेल, आणि शुभमुहूर्तासाठी सज्ज झालेला विवाहमंच. सगळं काही नियोजनात होतं. पण अचानक आकाश फाटलं आणि जोरदार पावसानं सगळं लॉन जलमय केलं. त्यामुळे लग्न थांबवण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. आस्मानी संकटामुळं वडिलांच्या डोळ्यांतून हताश अश्रू वाहू लागले.
advertisement
‘अलंकार लॉन’मधून उठले माणुसकीचे सूर
हिंदू कुटुंबावर आलेलं संकट पाहून एक मुस्लिम कुटुंब मदतीसाठी सरसावलं. शेजारील ‘अलंकार लॉन’मध्ये मुस्लिम नवविवाहित जोडप्याचा वलीमा समारंभ सुरू होता. फारूक काझी यांनी परिस्थिती पाहिली आणि कोणतीही अट न ठेवता आपला रिसेप्शन हॉल दीड तासासाठी खुला करून दिला. त्यामुळे नरेंद्र आणि संस्कृतीचा विवाह त्या हॉलमध्ये विधीपूर्वक पार पडला. मंगलाष्टकांच्या गजरात, आणि हिंदू-मुस्लिम पाहुण्यांच्या उपस्थितीत एक आदर्श विवाह संपन्न झाला.
advertisement
वडील म्हणून वडिलांना साथ
विवाहानंतर काझी कुटुंबाने पुन्हा आपला वलीमा समारंभ सुरू केला. त्यांच्या या उदारतेने कवडे आणि गलांडे कुटुंबीयांचे अश्रूही आनंदात परावर्तित झाले. "माझ्या मुलाच्या लग्नाचं स्वप्न पूर्ण झालं, कारण शेजारी माणूस म्हणून मदतीसाठी उभं राहिला," असं भावूक उद्गार वडिलांनी काढले.
धर्म नाही, माणुसकीच मोठी!
समाजात काही वेळा जातीय आणि धार्मिक संघर्ष निर्माण केले जातात. परंतु, या सगळ्यांच्या पलिकडे माणुसकीचा धर्म मोठा असल्याचे या प्रसंगाने सिद्ध झाले. एक वडील आपल्या पोटच्या गोळ्याचं स्वप्न पूर्ण करू शकले, कारण दुसऱ्या वडिलांनी आपला आनंद थांबवून त्यांना आधार दिला. त्यामुळे या विवाहाचं सध्या संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे आणि माणुसकीच्या विजयाने पुणे शहर पुन्हा एकदा प्रकाशमान झालं आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
May 23, 2025 9:58 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यातील अजब लग्नाची गजब स्टोरी! मुस्लिम कपलच्या रिसेप्शनमध्ये हिंदू कपलने लग्नगाठ बांधली