Pune News: अचानक तो मोठा गूढ आवाज अन् हादरे; घरांना गेले तडे, नागरिक बाहेर पळाले, पुण्यातील रांजणगावमध्ये काय घडलं?
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
अचानक झालेल्या या दणदणाटामुळे जमिनीला भूकंपासारखे हादरे बसले. अनेक रहिवाशांच्या घरांच्या भिंतींना मोठे तडे (चिरा) गेले आहेत, तर काही घरांचे विद्युत बोर्ड हादऱ्यांमुळे सैल होऊन बाहेर आले आहेत
पुणे : पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती परिसरात सोमवारी (२ मार्च) दुपारी सव्वाचारच्या सुमारास झालेल्या एका गूढ आणि कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. हा आवाज इतका भीषण होता की, काही काळ आसमंतात त्याचे प्रतिध्वनी उमटत राहिले, ज्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भूकंप की मोठा स्फोट?
अचानक झालेल्या या दणदणाटामुळे जमिनीला भूकंपासारखे हादरे बसले. अनेक रहिवाशांच्या घरांच्या भिंतींना मोठे तडे (चिरा) गेले आहेत, तर काही घरांचे विद्युत बोर्ड हादऱ्यांमुळे सैल होऊन बाहेर आले आहेत. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु भीतीपोटी शेकडो नागरिक घराबाहेर पडले.
प्रशासनाचे आवाहन आणि चौकशी
हा आवाज नेमका कशामुळे झाला? हा 'सॉनिक बूम' होता, की जमिनीखालची हालचाल? याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले की, "तालुका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला या घटनेची कल्पना दिली आहे. जोपर्यंत अधिकृत अहवाल येत नाही, तोपर्यंत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये."
advertisement
भरपाईची मागणी
ज्या घरांचे नुकसान झाले आहे, त्यांचे तातडीने पंचनामे करून सरकारने भरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे. या गूढ आवाजाचे रहस्य उलगडण्यासाठी प्रशासन आता भूगर्भीय आणि हवामान खात्याच्या अहवालाची प्रतीक्षा करत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 04, 2026 7:01 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: अचानक तो मोठा गूढ आवाज अन् हादरे; घरांना गेले तडे, नागरिक बाहेर पळाले, पुण्यातील रांजणगावमध्ये काय घडलं?






