...तरच लालपरीचा प्रवास मोफत! तिकीट सवलतींसाठी एसटीचे नवे नियम, तुम्हाला माहितीये का?
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
ST Bus Scheme: एनसीएमसी कार्ड नसल्यास महिलांसह ज्येष्ठ नागरिकांनाही प्रवासासाठी पूर्ण तिकीट दर भरावा लागणार आहे.
पुणे : राज्यातील एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एसटी प्रवासात विविध सवलत योजनांचा लाभ घेताना आता केवळ आधार कार्ड किंवा इतर जन्मतारखेचा पुरावा असणारी ओळखपत्र पुरेसं ठरणार नाही. महिलांना 50 टक्के आणि 75 वर्षांपुढील ज्येष्ठांना 100 टक्के तिकीट सवलत हवी असेल तर कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) काढावं लागणार आहे. अन्यथा तिकिटाचे पूर्ण पैसे मोजावे लागतील.
एसटीच्या माध्यमातून 26 ऑगस्ट 2022 पासून काही प्रवर्गांसाठी मोफत प्रवास योजना सुरू करण्यात आली होती. तसेच 17 मार्च 2023 पासून महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. आतापर्यंत या सवलतींचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड दाखवणे आवश्यक होते. मात्र आता शासनाने नियमांमध्ये बदल केला असून सवलतीचा लाभ घेण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) जवळ असणे बंधनकारक केले आहे.
advertisement
नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य
एनसीएमसी कार्ड नसल्यास महिलांसह ज्येष्ठ नागरिकांनाही प्रवासासाठी पूर्ण तिकीट दर भरावा लागणार आहे. या नव्या व्यवस्थेमुळे एसटी प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक होईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. एनसीएमसी कार्डद्वारे सवलतींची अचूक नोंद ठेवली जाणार असून व्यवहार पूर्णपणे रोखविरहित पद्धतीने होणार आहेत. तसेच सवलतींची प्रतिपूर्ती ही पारदर्शक रीतीने होणार असल्याने संपूर्ण प्रक्रिया अधिक सक्षम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
advertisement
कार्डसाठी नवीन नियम
एनसीएमसीच्या नव्या नियमांनुसार प्रवाशांना एनसीएमसी कार्डसाठी 199 रुपये मोजावे लागणार आहेत. आधीचे स्मार्ट कार्ड परत करणाऱ्यांना सवलतीच्या दराने म्हणजे 149 रुपयांत नवीन कार्ड मिळेल. हे कार्ड फक्त ओळखपत्र नाही तर प्री-पेड वॉलेटसारखे काम करेल. यात किमान 100 रुपयांचा बॅलन्स ठेवणे आवश्यक असणार आहे. प्रवाशांना 50 रुपयांच्या पटीत ते रिचार्ज करता येणार आहे. त्यामुळे आता कार्ड असेल तर या सवलतीचा लाभ घेता येणार आहे.
advertisement
सवलत योजना गुंतागुंतीची का?
आतापर्यंत आधार कार्डच्या आधारे महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचा प्रवास कोणत्याही मोठ्या अडचणीशिवाय मिळत होता. मात्र आता एनसीएमसी कार्ड सक्तीचे करण्यात आल्याने प्रवाशांना नवीन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. कार्ड काढण्यासाठी केंद्रांवर जावे लागणे, ते वेळेवर रिचार्ज करणे तसेच तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. पूर्वी सोप्या पद्धतीने मिळणारी सवलत आता अधिक गुंतागुंतीची का करण्यात आली? असा सवाल काही प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 20, 2026 10:46 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
...तरच लालपरीचा प्रवास मोफत! तिकीट सवलतींसाठी एसटीचे नवे नियम, तुम्हाला माहितीये का?









