वारी विशेष ब्लॉग: भारुडाचे गारुड (भाग 2)
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Wari Special Blogs Marathi: मुळात गंभीर वाटणारे तत्वज्ञानाचे विषय लोकांना समजावून देण्याचे काम भारुड करते. लोकांच्या रोजच्या जीवनात येणाऱ्या सजीव-निर्जीव अशा छोट्या-मोठ्या अनेक गोष्टी निरनिराळ्या रूपकांमधून भारुड जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करते.
लेखक, संकलक: डॉ नरेंद्र भिकाजी कदम
भारुड वाङमय हे मराठी वाङ्मयाचे एक वैशिष्ठ्यपूर्ण दालन आहे. तत्वज्ञान आणि अध्यात्म हे सामान्य माणसाला कळण्यासाठी फारच गुढ आहे. त्यामुळे या गूढ तत्वज्ञानाच्या मार्गाला जाऊ नये अशी सर्वसामान्यांची मानसिकता निर्माण होते. मूळ संस्कृतात असलेले तत्वज्ञान लोकांना कळावे, त्यांच्या पचनी पडावे म्हणून संतांनी संस्कृतातील हे तत्त्वज्ञान प्राकृतात आणले. लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत त्यांनी निरनिराळ्या रचना केल्या. त्यात गोडी यावी म्हणून त्याला ओवी, अभंग, गवळण, भारुड अशा अनेक पद्धतीने ते लोकांपर्यंत पोहोचवले.
advertisement
मुळात गंभीर वाटणारे तत्वज्ञानाचे विषय लोकांना समजावून देण्याचे काम भारुड करते. लोकांच्या रोजच्या जीवनात येणाऱ्या सजीव-निर्जीव अशा छोट्या-मोठ्या अनेक गोष्टी निरनिराळ्या रूपकांमधून भारुड जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करते. म्हणूनच भारुड वाङमय हे अत्यंत सहज-सुंदर, साधेसुधे आणि काही तत्व असलेले असे अध्यात्मनिष्ठ वैशिष्ट्य आहे. वेदांतात सांगितलेल्या गोष्टी सर्वसामान्य माणसाला समजणे अंमळ कठीणच असते. हे सांगितलेले तत्त्वज्ञान सर्वसामान्यांना समजेल अशा शब्दांमध्ये विशद करण्याचे काम भारुड करते.
advertisement
अनेक संतांनी आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेने विपुल संत साहित्याची निर्मिती केली. ओवी, अभंग, भजन, कीर्तन, गवळण अशा विविधतेने नटलेल्या रचनांची निर्मिती केली. संतांनी केलेला हा तत्त्वज्ञानाचा, अध्यात्माचा उपदेश अनेक ओवी, ग्रंथ, श्लोक, अभंग यामध्ये बद्ध होता. भागवत धर्माच्या प्रचाराचा प्रसाराचा काळ हा साधारणपणे बाराव्या शतकापासून ते सोळाव्या शतकापर्यंत होता. या काळात देशावर अनेक परकीय आक्रमणे झाली. देश परचक्राच्या अधिपत्याखाली जाऊ लागला. देशात येणारे हे परकीय इथला धर्म बुडवून आपल्या धर्माचा प्रसार करण्याच्या प्रयत्नात होते. या सर्व जाचातून परचक्राखाली भरडल्या जाणाऱ्या सर्वसामान्य जनतेला संतांचे हे वाङमय वाचायला वेळ मिळणे केवळ अशक्य होते. चाल करुन आलेल्या प्रत्येक राज्यकर्त्याने प्रस्थापित धर्म बुडवण्यासाठी पराकाष्ठा केली. (इतके करूनही आजही हा भागवत धर्म किंवा आपला हिंदू धर्म टिकून आहे याचे श्रेय राज्यकर्त्यांच्या जोडीने या संतांना द्यायला हवे.) या परकीय शक्तींपासून धर्माचे रक्षण करण्याचे कठीण काम करण्यात तत्कालीन राज्यकर्त्यांच्या जोडीने भागवत धर्माचे संत अग्रगणी होते. धर्म रक्षण करण्यासाठी धर्मग्रंथात लिहिलेले तत्वज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचावे म्हणून, समाजाला सहज रुचेल अशा सोप्या शब्दांत साहित्याची निर्मिती केली. त्यांनी रचलेल्या अनेक रचनांमधून लोकांना जागृत करण्याचे काम केले. भागवत धर्माचा उपासक जरी इतरांप्रती करुणा बाळगणारा असला तरी तसाच प्रसंग आला तर अशा लोकांविरुद्ध बंड करायला आम्ही कमी करणार नाही हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात,
advertisement
मऊ मेनाहूनि आम्ही विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥१॥
मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जें जें मागे तें तें देऊं ॥ध्रु.॥
भले तरि देऊं गांडीची लंगोटी । नाठाळाचे काठीं देऊं माथां ॥२॥
मायबापाहूनि बहू मायावंत । करूं घातपात शत्रूहूनि ॥३॥
अमृत तें काय गोड आम्हांपुढें । विष तें बापुडें कडू किती ॥४॥
advertisement
तुका म्हणे आम्ही अवघेचि गोड । ज्याचें पुरे कोड त्याचेपरि ॥५॥
तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही विष्णूचे दास आम्ही मेणाहूनही मऊ, नम्र आणि शीतल आहोत. प्रसंग पडलाच तर आम्ही वज्राहूनही कठीण होऊ शकतो, आम्ही इतके कठीण होतो की आम्ही वज्रासही भेदू शकतो. आम्ही जिवीत, मृत कसेही असो, पण आम्ही आत्मस्थितीने जागृतावस्थेत आहोत. म्हणजेच याचकाला मदत करण्याची वेळ आली तर मरणासन्न अवस्थेतही त्याला हवे ते देण्याची आमची तयारी आहे. अशा अवस्थेत आम्ही त्याला आमची नेसती वस्त्रेसुद्धा देऊ, पण कोणी आमच्या या प्रेमाचा उपमर्द करण्याचा प्रयत्न केला, आमच्या प्रेमभावनेची खिल्ली उडवणारा एखादा नाठाळ आमच्या समोर आला तर मात्र त्याच्या डोक्यात काठी घालायलाही आम्ही मागेपुढे पाहणार नाही. आई, वडील आपल्या अपत्यावर माया करतात त्या पेक्षाही आम्ही मायाळू आहोत, पण प्रसंगी शत्रूपेक्षाहि त्रासदायक असा घातपात करण्याची आमची तयारी आहे. अमृतापेक्षाही आम्ही गोड आहोत, अमृताची गोडी आमच्यापुढे फिकी आहे, आणि प्रसंग पडताच आम्ही विषापेक्षाही कडू होऊ शकतो. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही अवघे सगळेच लाघवी आहोत पण समोरचा आमच्याशी जर प्रेमाने वागेल तरच, म्हणून आम्ही प्रत्येकाचे ज्याच्या त्याच्या पद्धती प्रमाणे लाड पुरवितो.
advertisement
माऊली, तुकाराम महाराजांची चर्चा चालू असताना सहजच आम्हाला तुकाराम महाराजांचे एक भारुड आठवले. कालच आपण माऊलींचे भारुड वाचले, चला तर आज आपण तुकाराम महाराजांच्या भारुडाचा आस्वाद घेऊ.
मंडळी, संतांची निरीक्षण शक्ती किती सूक्ष्म होती याचे उत्तम उदाहरण हे भारुड आहे. माणसाच्या स्वभावाचे कंगोरे त्यांनी अत्यंत अचूकतेने टिपले होते. कितीही प्रयत्न केला तरी कुत्र्याचे शेपूट सरळ होत नाही. तसाच माणसाचा मूळ स्वभाव त्याने कितीही प्रयत्न केला तरी बदलत नाही हे सत्य त्यांनी जाणले होते. माणसाच्या मूळ स्वभावाबरहुकूम वागण्यातून निर्माण होणाऱ्या व्यंगावर तुकाराम महाराज अचूकतेने बोट ठेवताना म्हणतात,
advertisement
आधी होता वाघ्या । दैवयोगे झाला पांग्या ।
त्याचे येळकोट राहिना । मुळ स्वभाव जाईना ।।
आधी होता ग्रामजोशी। राज्यपद आले त्यासी ।
त्याचे पंचांग राहिना । मुळ स्वभाव जाईना ।।
आधी होती दासी । पट्टराणी केले तिसी ।
तिचे हिंडणे राहिना । मुळ स्वभाव जाईना ।।
आधी होता संतसंग। तुका झाला पांडुरंग ।
त्याचे भजन राहिना । मुळ स्वभाव जाईना ।।
वर आलेल्या भारुडातून तुकाराम महाराज सांगतात की मनुष्य कितीही उच्चपदाला गेला तरी त्याचा मूळ स्वभाव काही बदलत नाही. ‘तेथे पाहिजे जातीचे, येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.’ अधिकार पदावर असलेली व्यक्ती त्या पदाचा आब राखूनच वागली पाहिजे. त्या पदाची प्रतिष्ठा अबाधित राहण्यासाठी त्याने त्या पदास योग्य असेच वागायला हवे. पण नेमका माणसाचा मूळ स्वभाव मार खातो आणि तिथेच माती खातो. व्यक्ति उच्च पदाला गेली तरीही तिथे त्याचे मूळ स्वरुप उघडे पडते. ही गोष्ट महाराजांनी निरनिराळी रुपके वापरुन सांगितली आहे. विसाव्या शतकातही आपल्या जीवनातही आपल्याला या गोष्टीचे प्रत्यंतर अनेकदा येत असते.
आधी होता वाघ्या । दैवयोगे झाला पांग्या ।
त्याचे येळकोट राहिना । मुळ स्वभाव जाईना ।।
एका वाघ्याला (वाघ्या-मुरळीतला वाघ्या) दैवयोगाने राजाच्या सैन्यात घोड्यांच्या पागेत नोकरी मिळाली. राजाच्या अश्वदळाचा तो पागाप्रमुख झाला. पण तिथे नेमका त्याचा मूळ स्वभाव आडवा आला. दिवसभर पागेत काम करताना त्याला ‘जय मल्हार’ करता येत नव्हता. म्हणून रात्री सगळे झोपल्यावर त्याचा येळकोट चालत होता. या कारणाने घोड्यांची झोप होत नव्हती, राजाची घोडी सतत आळसावलेली राहत होती. घोड्यांच्या आळसाचे कारण वाघ्या आहे हे कळताच राजाने वाघ्याला कामावरून काढून टाकले. ‘येळकोट’ करण्याची त्याची सवय आडवी आली. अन त्याची चाकरी गेली.
आधी होता ग्रामजोशी। राज्यपद आले त्यासी ।
त्याचे पंचांग राहिना । मुळ स्वभाव जाईना ।।
राज्य कारभार चालवणे कोणा येऱ्यागबाळ्याचे काम नाही. राज्यकारभार चालवताना नेहमीच मुहूर्त पहाणे गरजेचे नसते. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जाताना काही निर्णय घ्यावे लागतात, त्यासाठी पंचांग पहाण्याची काय गरज? पंचांग, मुहूर्त या गोष्टी कुचकामी आहेत. लोकांचे भविष्य सांगणाऱ्या अशाच एका ग्रामजोश्याला अचानक राज्यपद मिळाले. सवयीचा गुलाम ग्रामजोशी हातातले पंचांग बाजूला ठेवू शकला नाही. त्याचा राज्यकारभार बसला. त्याच्या हातातले पंचांग सुटले नाही. प्रत्येक गोष्टीसाठी मुहूर्त पहाण्याच्या सवयीने हाती आलेले राज्यपद गेले.
आधी होती दासी । पट्टराणी केले तिसी ।
तिचे हिंडणे राहिना । मुळ स्वभाव जाईना ।।
राणी म्हटली की तिचा रुबाब काही औरच असतो. दिमतीला दास, दासी, नोकर, चाकर म्हणेल ती गोष्ट हातात हजर, मोठी ऐश असते नाही का? अशीच एक दासी झाली राजाची पट्टराणी. पट्टराणी झाल्यानंतरही दासी असतानाची इकडेतिकडे फिरण्याची सवय काही गेली नाही.
आधी होता संतसंग। तुका झाला पांडुरंग ।
त्याचे भजन राहिना । मुळ स्वभाव जाईना ।।
भक्त नेहमीच भजन कीर्तनातून भगवंताची स्तुती करत असतो. स्तुती करणे भक्तांचे काम अन ऐकणे भगवंताचे. तुकाराम महाराजांना संतसंगामुळे देवपण मिळाले. पण हाय रे दैवा माणसाचा मूळ स्वभाव काही केल्या जात नाही. देवपण आल्यानंतरही भजन करण्याचा छंद काही गेला नाही आणि अंगी आलेले देवपण निघून गेले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 02, 2024 10:34 PM IST