पुण्यात संपूर्ण दगडी बांधकामाचे आहे हे मंदिर; इंग्रजांच्या राजवटीबद्दल आढळते भविष्यवाणी!
- Published by:News18 Marathi
Last Updated:
पुणे शहरात अनेक प्राचिन मंदिर आहेत. त्रिशुंड गणेश मंदिर ऐतिहासिक वारसा लाभलेलं मंदिर आहे.
पुणे, 14 सप्टेंबर : पुणे शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. पुणे शहरात अनेक प्राचिन मंदिरे आहेत. यामध्ये ग्रामदैवत कसबा गणपती, सारसबाग, चतु:श्रृंगी ही मंदिर प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर त्रिशुंड गणेश मंदिर देखील एक अपरिचित पण ऐतिहासिक वारसा लाभलेलं मंदिर आहे. 1754 च्या दरम्यान बांधलेले त्रिशुंड गणपती मंदिर हे एका दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देते.
काय आहे मंदिराचा इतिहास?
पुण्यातील सोमवार पेठेत त्रिशुंड गणपती मंदिर आहे. शहाजीराजांनी इ.स. 1600 मध्ये शहापुरा ही पेठ वसवली. 1735 मध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांनी या पेठेत व्यापाराला उतेजन देऊन या पेठेचा विकास करून या पेठेचे सोमवार पेठ हे नामकरण केले. या पेठेत गोसावी समाजाची मोठी वस्ती असणाऱ्या भागात गोसावीपुरा म्हणत हा समाज सधन होता. कसबा पेठेतून मंगळवार पेठ दवाखान्याच्या दिशेने जकातेपुला नंतर, उजव्या बाजूस दगडी कोरीव शिल्पांनी नटलेले त्रिशुंड गणपतीचे मंदिर आहे, त्रिशुंड गणेशाची मूर्ती महाराष्ट्रात क्वचितच आढळते. या मंदिराच्या निर्मितीमागे शिवमंदिराची कल्पना असल्यामुळे या मंदिराची शैली शिवमंदिराप्रमाणे आहे. कालमानानुसार येथे देवतांच्या आणि मंदिराच्या स्वरूपामध्ये थोडाफार बदल झालेला आढळतो.
advertisement
Video : अयोध्येतील राम मंदिराची पुणेकरांना पर्वणी, पाहा दगडूशेठच्या देखाव्याचा फर्स्ट लुक
या मंदिरासंदर्भातील ऐतिहासिक नोंदीनुसार इंदूरजवळ असलेल्या धामपूर येथील संपन्न गोसावी भीमगिरजी यांनी 26 ऑगस्ट 1754 मध्ये या मंदिराचे बांधकाम केले. 1754 ते 1770 या दरमम्यान या मंदिराचे बांधकाम चालू होते या मंदिरातील गर्भगृहाच्या चौकटीवर दोन संस्कृत आणि एक फारशी शिलालेख आहेत. पहिल्या संस्कृत शिलालेखात मंदिराच्या बांधकामाचा काल आणि रामेश्वराची (श्री शंकर) प्रतिष्ठापना केल्याचा उल्लेख असून दुसऱ्या शिलालेखात गीतेतील आरंभीचा नमनाचा श्लोक कोरलेला आहे, तर फारशी शिलालेखात हे स्थान गुरुदेवदत्तांचे असल्याचे नमूद केलेले आहे.
advertisement
संपूर्ण दगडी बांधकामाचे हे मंदिर
संपूर्ण दगडी बांधकामाचे हे मंदिर पुरुषभर उंचीच्या दगडी ज्योत्यावर पूर्वाभिमुख उभे आहे. राजस्थानी, माळवा आणि दक्षिणात्य वास्तुशैलीचा संमिश्र वापर येथे करण्यात आलेला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस द्वारपाल आहेत. प्रवेशद्वाराच्या कोरीव चौकटीच्या वर धारदार कमान असून अगदी वरच्या बाजूस शेषशायी विष्णूची प्रतिमा आहे. यक्ष, लक्ष्मीमंत्र, मोर, पोपट, भैरव, मंगलकलश, दशावतार, गजान्तलक्ष्मी अशी अनेक मांगल्य दर्शविणारी चिन्हे प्रवेशद्वारच्या भिंतीवर कोरलेली आहेत.
advertisement
येथील एक शिल्प मात्र राजकीय दृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण आहे. हिंदूस्थानातील तत्कालीन राजकीय परिस्थितीतीचे चित्रण या शिल्पातून साकार होते. इंग्रजांनी प्लासीच्या युद्धानंतर 1757 मध्ये बंगाल आणि आसामवर सत्ता प्रस्थापित केली. याची दखल मोठ्या खुबीने शिल्पकराने घेतलेली दिसते. एक इंग्रज शिपाई बंगाल आणि आसामचे प्रतीक असलेल्या गेंड्याला साखळदंडाने बांधताना दिसत आहे. लवकरच इंग्रज हिंदुस्थानात आपले पाय रोवणार याची अप्रत्यक्ष भविष्यवाणी या शिल्पातून करण्यात आलीय.
advertisement
गणेशोत्सवात बाप्पाला काय नैवेद्य दाखवावा? जाणून घ्या शास्त्र
गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर उजव्या सोडेची गणेशमूर्ती असून त्याखाली गणेशचक्र आहे. प्रदक्षिणेच्या वाटेवर दक्षिणेकडील भिंतीत नटराजाची मूर्ती असून उत्तरेकडील भिंतीत विष्णू आणि काळ भैरवाच्या कलात्मक रेखीव मूर्ती आहेत. दक्षिणेकडील भिंतीत मंदिराच्या मागील बाजूस आगळ्या पद्धतीचे कुठेही सहसा न आढळणारे शिवलिंग आहे. ही लिंगोद्भव शिवप्रतिमा आहे यात फक्त शाळुंका असून त्यावर वरच्या दिशेने उडणारा हंस, खाली मुसंडी मारणारा वराह आणि शिवलिंगावर छत्र धरणारा नाग अशा ठळक प्रतिमा कोरलेल्या आहेत. पुराणातील एका कथेवर हे शिल्प आधारित आहे.
advertisement
गर्भगृहातील गणेश मूर्ती वेगळ्या स्वरुपातील आहे. एक मुख, तीन सोंडा, सहा हात असलेली काळ्या पाषाणातील मूर्ती मोरावर आरुढ आहे. उजवी सोंड मोदक पात्रास स्पर्श करीत असून मधली सोंड उंदरावर आहे तर डावी सोंड मांडीवर बसलेल्या शक्ति देवतेच्या हनुवटीला स्पर्श करीत आहे. हा गणेश सत्व, तम आणि रज या गुणांनी युक्त आहे. बाजूस रिद्धी-सिद्धी आहे. या मूर्तीस पाषाणाची मेघडंबरी आहे. गणेशाच्या वरच्या, उजव्या आणि डाव्या हातात अंकुश आणि परशू आहे. मोराच्या दोन्ही बाजूस मूषक आणि स्त्रीगण आहे. मुकुटाखाली पाठीवर रुळलेली गोडेदार केशरचना आहे.
advertisement
गणेश चतुर्थीला ठेवा हटके WhatsApp Status, लगेच करा Save!
मूर्तीच्या मागे भिंतीवर अतिशय रेखीव शेषशायी नारायणाची प्रतिमा असून भिंतीवर श्री गणेशयंत्र कोरलेले आहे. तळघरात जिवंत झरा असल्यामुळे येथे पाणी भरते. दरवर्षी गुरुपौर्णिमिस तळघर स्वच्छ करून भाविकांसाठी खुले करण्यात येते. विश्वस्त मंडळाने येथील शिल्पांचे नुकसान होऊ नये म्हणून अनेक उपाय योजलेले आहेत. या अप्रतिम मंदिराची बहुसंख्या भाविकांना कल्पना नसल्यामुळे येथे भाविकांची वर्दळ नाही. त्रिशुंड गणपती मंदिराच्या विश्वस्त मंडळाने मंदिराची व्यवस्था उत्तम ठेवलेली आहे. शिल्पदृष्ट्या महत्वाचे असणारे त्रिशुंड गणेशाचे मंदिर खरोखरच अप्रतिम आहे,अशी माहिती सोमवार पेठेतील रहिवाशी प्रकाश लांडगे यांनी दिली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 14, 2023 8:31 AM IST
मराठी बातम्या/Temples/
पुण्यात संपूर्ण दगडी बांधकामाचे आहे हे मंदिर; इंग्रजांच्या राजवटीबद्दल आढळते भविष्यवाणी!