श्री गुरुदेव दत्त! स्वामींची कर्मभूमी मानलं जाणारं सांगलीतील श्री क्षेत्र औदुंबर, असं आहे महात्म्य
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Famous Temple: श्री दत्तात्रेयांच्या जागृत स्थानांपैकी एक म्हणजे सांगली जिल्ह्यातील श्री क्षेत्र औदुंबर होय. श्रीनृसिंह सरस्वतींच्या चातुर्मास-निवासामुळे प्रसिद्ध असणाऱ्या औदुंबर तीर्थक्षेत्राचे महात्म्य जाणून घेऊया.
प्रीती निकम, प्रतिनिधी
सांगली: श्री दत्तात्रेयांच्या जागृत स्थानांपैकी एक म्हणून सांगली जिल्ह्यातील श्री क्षेत्र औदुंबर मानलं जातं. गुरु दत्ताच्या तीन महत्त्वाच्या स्थानांपैकी हे एक आहे. श्रीनृसिंह सरस्वतींच्या चातुर्मास-निवासामुळे औदुंबर तीर्थक्षेत्राचे महत्त्व आहे. त्यामुळेच श्री दत्त सांप्रदायिक आणि लाखो भाविकांचे औदुंबर हे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंतीला इथं मोठ्या संख्येने भाविक येत असतात. याच श्री क्षेत्र औदुंबरचं महात्म्य पुरुषोत्तम जोशी यांनी सांगितलं आहे.
advertisement
श्री नृसिंह सरस्वती हे श्रीदत्तात्रेयांचे दुसरे अवतार समजले जातात. श्री नृसिंह सरस्वती स्वामींचा जन्म वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे झाला. पुढे ते सांगली जिल्ह्यातील औदुंबर येथे आले. कृष्णाकाठ हीच त्यांनी आपली कर्मभूमी बनविली. त्यांच्या वास्तव्याने, तपाने आणि लोकोद्धाराच्या कार्याने कृष्णाकाठी औदुंबर आणि नरसोबाची वाडी ही दोन पवित्र क्षेत्रे निर्माण झाली आहेत. कृष्णा नदीच्या ऐलतीरावर भिलवडी आहे व पैलतीरावर औदुंबर हे क्षेत्र आहे.
advertisement
नृसिंह सरस्वती यांचे वास्तव्य
श्री नृसिंह सरस्वती यांच्या तपाच्या तेजाने, शास्त्रपूत आचाराने आणि बुद्धीच्या प्रभावाने महाराष्ट्रात दत्तसंप्रदाय सर्वत्र प्रसार पावला. त्यांचे हे कार्य इतके मोठे आहे की, लोक त्यांनाच दत्तसंप्रदायाचे प्रवर्तक मानतात. त्यांनी सन 1441मध्ये औदुंबर येथे चातुर्मासात वास्तव्य केले. त्यामुळे औदुंबर हे महाराष्ट्रात दत्तस्थान म्हणून विशेष प्रसिद्ध पावले, असं जोशी सांगतात.
advertisement
कृष्णेच्या पैलतीरावर अंकलखोप नावाचं गाव आहे आणि ऐलतीरावर भिलवडीजवळ भुवनेश्वरी देवीचे देवालय आहे. भुवनेश्वरी हे शक्तिपीठ असल्यामुळे या परिसरात तपस्वी जनांचा वावर नेहमी असे. कृष्णेच्या तीरावर वृक्षांच्या दाटीमुळे आपोआपच एकांतमय तपोवन निर्माण झाले होते. या निसर्गसिद्ध तपोवनात, औदुंबराच्या दाट शीतल छायेत नृसिंह सरस्वती यांनी एक चातुर्मासाचा काळ घालविला आणि या स्थानाला चिरंतन पावित्र्य प्राप्त करुन दिले. औंदुबरक्षेत्री चैत्रात कृष्णमाई उत्सव, श्रीपाद श्रीवल्लभ उत्सव, श्री नृसिंह सरस्वती जन्मोत्सव, दत्तजयंती असे उत्सव साजरे केले जातात.
advertisement
कृष्णेचा डोह
औदुंबर येथील कृष्णेचा डोह रमणीय आणि लोभस असा आहे. अलीकडे श्री दत्तमंदिर व पैलतीरावर माता भुवनेश्वरी मध्ये कृष्णेचा डोह आहे. त्यावरून भाविकांना ने-आण करणारी नौका चालते. डोहातील पाणी कमी झाल्यावर सिध्दनाथाचे मंदिर दिसते. नृसिंह-सरस्वातींच्या निर्वाणदिनी फुलांनी सजविलेला पाळणा सोडला जातो. बाजूस सुंदर घाट बांधण्यात आला आहे.
advertisement
भुवनेश्वरी मंदिर
औदुंबरच्या पैलतीरावरील श्री भुवनेश्वरी मंदिर आद्य शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते. नृसिंह सरस्वती औदुंबर येथे आले. त्याही आधी भुवनेश्वरीमाता येथे वसली आहे. रम्य परिसर, दगडी रेखीव हेमांडपंथी मंदिर आहे. मंदिर परिसरात दगडी बुरूज, समोरील दगडी दिपमाळा, हनुमान, गणपती, काळभैरव, महादेवाची छोटी मंदिरे, प्रवेशद्वारे या मंदिराचा परिसर विलोभनिय जाणवतो. भिलवडी गावातून मंदिरापर्यंत मार्ग आहे. औदुंबरातील अवधूत नौकेतून कृष्णेचा डोह पार केला की मंदिराची दगडी वाट सुरू होते. मंदिर परिसर प्रशस्त व शांत आहे. देवीची मूर्ती साडेचार फूटी चक्रधारी आहे.
advertisement
औदुंबर तीर्थक्षेत्री असे या
औदुंबर क्षेत्री जाण्यासाठी सांगली एसटी स्थानकावरून नियमित एसटी सेवा आहे. सांगली-अंकलखोप या बसने इथे जाता येते. तासगाव-कोल्हापूर मार्गावर हे क्षेत्र आहे. तर पुणे-कोल्हापूर रेल्वे मार्गावर भिलवडी रेल्वे स्थानक आहे. या स्टेशनला उतरून बस किंवा खाजगी रिक्षेने 6 किमी अंतरावर असलेल्या औदुंबर या तीर्थक्षेत्री जाता येते. तर सांगलीपासून औदुंबर हे तीर्थक्षेत्र 25 किलोमीटर अंतरावर आहे. इथे भाविकांच्या राहाण्याची आणि जेवण्याची उत्तम सोय होऊ शकते. त्यासाठी धर्मशाळा आहे.
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
December 12, 2024 10:07 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
श्री गुरुदेव दत्त! स्वामींची कर्मभूमी मानलं जाणारं सांगलीतील श्री क्षेत्र औदुंबर, असं आहे महात्म्य