Mahashivratri: काठी लागली अन् दगडातून वाहू लागलं रक्त, प्रसिद्ध मंदिरात स्वयंभू शिवलिंग, आख्यायिका काय?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Mahashivratri: सोलापुरातील पापरी इथं स्वयंभू लिंग असणारं महादेव मंदिर आहे. महाशिवरात्रीला इथं भाविकांची मोठी गर्दी असते.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर: महाशिवरात्रीला देशभरातील मंदिरं भाविकांनी फुलून गेलेली असतात. महाराष्ट्रात देखील गावोगावी शिवमंदिरं असून त्यांचा मोठा इतिहास असतो आणि एखादी आख्यायिका या मंदिरांसोबत जोडली गेलेली असते. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असणारं पापरीचं स्वयंभू महादेवाचं मंदिर पंचक्रोशित प्रसिद्ध आहे. महाशिवरात्रीला इथं मोठी यात्रा भरते. तसेच विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन केले जाते. याच मंदिराबाबत एक आख्यायिका असून अरुण दगडू माळी यांनी लोकल18 सोबत बोलताना याबाबत माहिती दिलीये.
advertisement
मोहोळ तालुक्यातील पापरी येथे पुणे-सोलापूर महामार्गापासून काही अंतरावर स्वयंभू लिंग असणारं प्रसिद्ध महादेव मंदिर आहे. पूर्वी याठिकाणी हेमाडपंथी शैलीतील छोटं मंदिर होतं. त्यानंतर भाविकांची गर्दी विचारात घेऊन मोठं मंदिर बांधण्यात आलं आहे. मंदिरात स्वयंभू शिवलिंग असून यात 12 लिंगं आहेत. तर तेरावं मातृलिंग आहे, जे माता पार्वती देवीचं प्रतिक मानलं जातं.
advertisement
अशी आहे आख्यायिका
पूर्वी महादेवाच्या माळावर जंगल होतं. या जंगलात शेतकऱ्यांची मुलं जनावरे चारण्यासाठी येत होती. जनावरं राखत असताना मुलं याठिकाणी खेळत होती. तेव्हा एका मुलाकडून लिंगाला काठी लागली. त्यानंतर या शिवलिंगातून रक्तस्त्राव सुरू झाला. हे सर्व पाहून मुलं घाबरली आणि त्यांनी घरी जावून याबाबत आई-वडिलांना सांगितलं. वडिलधारी माणसं याठिकाणी आली आणि त्यांनी जमिनीतून वर आलेलं शिवलिंग पाहिलं. तेव्हा हे भगवान भोलेनाथाचं लिंग असल्यानं त्याची श्रद्धेनं पूजा सुरू केली. तेव्हापासून याठिकाणी पूजा होत असल्याचं अरुण माळी यांनी सांगितलं.
advertisement
अन् उभं राहिलं शिवमंदिर
या भागात बुधगावच्या राजाचं राज्य होत. त्यावेळेस राजे सरकारांना मुल-बाळ नव्हतं. सहज फिरत फिरत या ठिकाणी ते आले होते. जनावरं राखणाऱ्या मुलांना विचारलं असता त्यांनी इथं महादेवाचं लिंग असल्याचं सांगितलं. या शिवलिंगाचं दर्शन घेत राजानं अपत्य प्राप्तीसाठी नवस केला. पुढे राजाला मुलगा झाला आणि त्यानं या शिवलिंगावर हेमाडपंती स्वरुपात लहानसं मंदिर उभारलं, अशी आख्यायिका देखील माळी यांनी सांगितली.
advertisement
रौप्य महोत्सवी वर्ष
या मंदिरात गेल्या 25 वर्षांपासून महाशिवरात्रीला अखंड हरिनाम सप्ताह होत आहे. यंदा त्याचे रौप्य महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. व्यवसाय व नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले नागरिक आवर्जून दर्शनासाठी येतात. महाशिवरात्रीला महादेवाला अभिषेक केला जातो. तसेच विविध धार्मिक विधी आणि पूजा केल्या जातात. सप्ताहभर चालणाऱ्या धार्मिक कार्यक्रमादरम्यान रोज महाप्रसाद असतो आणि शिवभक्तांची मोठी गर्दी देखील इथं असते.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
February 26, 2025 8:30 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
Mahashivratri: काठी लागली अन् दगडातून वाहू लागलं रक्त, प्रसिद्ध मंदिरात स्वयंभू शिवलिंग, आख्यायिका काय?