तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर? Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
महाराष्ट्रात नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होतो. विदर्भातील गावात चक्क तळ्याच्या मध्यभागी तरंगत्या स्वरुपात दुर्गा विराजमान होते.
वर्धा, 21 ऑक्टोबर: महारामहाराष्ट्रात नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होतो. विदर्भातील गावात अनोख्या पद्धतीने नवरात्री उत्सव साजरा होतो. वर्धा जिल्ह्यातील तळेगाव टालाटुले येथे चक्क तळ्याच्या मध्यभागी तरंगत्या स्वरुपात दुर्गा विराजमान होते. गेल्या 40 वर्षांपासून गावकरी ही परंपरा जोपासत आहेत. विशेष म्हणजे आरतीसाठी देवी काठावर येते. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते.
40 वर्षांची परंपरा
तळेगाव टालाटुले येथे चक्क 20 फूट खोल असलेल्या तलावात मध्यभागी देवीची स्थापना केली जाते. विशेष म्हणजे लाकूड आणि प्लास्टिक ड्रमच्या आधारावर देवीची मूर्ती तलावाच्या मधोमध विराजमान झाली आहे. एवढेच नाही तर तलावात आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. देवीच्या मंडपापर्यंत जाण्यासाठी लाकूड आणि प्लास्टिकच्या ड्रमने तयार केलेल्या एका बोटच्या साह्याने भक्तांना आत घेऊन जातात. फक्त नवरात्रीत सादर केला जाणारा हाच आकर्षक आणि अनोखा देखावा बघण्यासाठी जिल्हाभरातील भक्त या ठिकाणी येत असतात.
advertisement
तलावात केली आकर्षक विद्युत रोषणाई
तलावात विराजमान असलेल्या देवीची मूर्ती पासून ते तलावाच्या काठापर्यंत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ही रोषणाई रात्रीच्या वेळी फारच नेत्र दीपक असते. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक रात्री देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात.
आरतीला देवी येते काठावर
तलावाच्या मध्यभागी प्लास्टिकचे ड्रम आणि लाकडावर विराजमान असलेली दुर्गादेवीची आकर्षक मूर्ती ही आरती करिता घट सकट ओढत ओढत तलावाच्या काठावर आणली जाते. तर आरती झाल्यानंतर परत देवीचे हे तरंगते मंदिर त्या जागी परत नेऊन ठेवलं जातं. विशेष म्हणजे या प्रक्रियेदरम्यान देवी जवळ असलेला घट हलत नाही आणि त्याला कुठलंही नुकसान पोहोचत नाही. घटाच्या अखंड दिव्याला कधीही खंड पडत नाही असेही मंडळ कार्यकर्ते सांगतात.
advertisement
बोट अतिशय कलाकारीची
ज्या बोट ने भक्त दर्शनासाठी जात आहेत ती बोट बनवण्यासाठी जवळजवळ एक महिन्याचा कालावधी लागतो. अनेक ड्रम एकमेकांना विशिष्ट पद्धतीने जोडून बांधून त्यावर लाकडी पाट्यांच्या साह्याने मजबूत बनवली जाते याच बोटचा उपयोग भक्तांना तलावाच्या काठापासून ते मूर्ती विराजमान असलेल्या ठिकाणापर्यंत येण्यासाठी केला जातो. टप्प्याटप्प्याने भाविकांना मंदिरापर्यंत या बोटने नेले जाते.
advertisement
जय अंबे, जय दुर्गेचा जयघोष
'जय अंबे, जय दुर्गे'च्या जयघोषात इथं वातावरणात मोठ्ठा उत्साह आणि सकारात्मता निर्माण झालीय. विसर्जनाच्या वेळी गावात देवीची मिरवणूक काढून पुन्हा याच तलावात विसर्जन केले जाते. गावात हे मोठं तळं असल्यामुळे तळेगाव नाव पडलं असावं, असं इथले नागरिक सांगतात. याच तळेगावातील जवळजवळ 18 एकर परिसरातील तलावात गावकऱ्यांनी आदिमायेची स्थापना करून नवरात्रीच्या निमित्ताने एक विशेष ओळख निर्माण करून दिलीय.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
October 21, 2023 10:57 AM IST