महाराष्ट्रातील 'हिंदुस्थानी' देवीचं मंदिर माहितीये का? ब्रिटिश काळाशी आहे संबंध, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
महाराष्ट्रात हिंदुस्थानी शीतला देवीचं एक मंदिर असून त्याबाबत एक ऐतिहासिक संदर्भ सांगितला जातो.
वर्धा, 18 ऑक्टोबर : नवरात्रोत्सवाला सगळीकडे उत्साहात सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात देवीची अनेक प्राचीन मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराची वेगवेगळी आख्यायिका सांगितली जाते. देवीच्या या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक म्हणजे यवतमाळ येथील हिंदुस्थानी शीतला मातेचं मंदिर होय. या मंदिराला धार्मिक आणि ऐतिहासिक संदर्भ असून ब्रिटिश काळापासूनचा इतिहास असल्याचं सांगितलं जातं.
माळावर वसलेल्या यवतमाळची पूर्वीची ओळख 'यवता' अशी होती. शेकडो वर्षांपूर्वी साथरोग व महामारीचा प्रकोप गावात झाला, तेव्हा भक्तांचे रक्षण करणाऱ्या शीतला मातेला भाविकांकडून जलाभिषेक सुरू झाला. शितला माता यवतमाळची ग्रामदैवत असून भक्त आजही मोठ्या श्रद्धेने देवीला जलाभिषेक करतात, एव्हढेच नव्हे तर देवीचे हे स्थान तमाम यवतमाळ वासीयांसाठी श्रद्धेचे केंद्र बनले आहे.
advertisement
नवरात्रीत एकाच ठिकाणी दोन शक्ती
यवतमाळच्या आठवडी बाजार परिसरात ग्रामदेवी शीतला मातेचे वास्तव्य आहे. गोल बंगला, हिंदुस्तानी मंडळ, शीतला देवी मंदिर म्हणून हे पवित्र स्थान ओळखले जाते. या मंदिराला भारत स्वतंत्र होण्याआधीचा इतिहास आहे त्यामुळे येथील शीतला मातेच्या मंदिराला हिंदुस्तानी शितलादेवी मंदिर अशी ओळख असल्याचं सांगितलं जातं.याठिकाणी कडुनिंबाच्या झाडाखाली शितलादेवीची आकर्षक आणि प्रसिद्ध मूर्ती असून दरवर्षी नवरात्रीत दुर्गा देवीची स्थापना केली जाते.म्हणजेच नवरात्रात एकाच ठिकाणी दोन शक्तींची पूजा केली जाते.
advertisement
पुरातन काळातील शीतलादेवी महाराष्ट्रभर प्रसिद्ध
एका निंबाच्या झाडाखाली पूर्वी शीतला मातेचं छोट मंदिर होत. जे आज श्रद्धाळू भक्तांच्या सहयोगाने भव्य दिव्य झाले आहे. मात्र निंबाचे झाड अजूनही आहे. शीतला देवीच्या मूर्तीची स्थापना प्राचीन काळातील असून शेकडो वर्षांपूर्वीपासून येथे भक्तांची मांदियाळी असते. शीतला मातेसोबत मंदिरात आई दुर्गा आणि अन्य एक मूर्ती आहे. दगडात कोरलेल्या ह्या मूर्ती असून पुरातन आहेत. नवरात्रीत तर देवीचा अखंड जलाभिषेक सुरू असतो.महिला वर्गाची मंदिरात रीघ लागली असते.
advertisement
हिंदुस्थानी दुर्गोत्सव मंडळाची स्थापना
यवतमाळात धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या या ठिकाणाहून सामाजिक चळवळींनाही सुरुवात झाली. 1939 साली स्वातंत्र्य चळवळीतील युवकांनी संघठित होऊन हिंदुस्तानी दुर्गोत्सव मंडळ स्थापन केले. सर्वप्रथम येथूनच दुर्गोत्सवाला सुरवात झाली असून आज ते राज्यात प्रसिद्ध आहे. या देवीवर यवतमाळवासीयांची प्रचंड श्रद्धा आहे. लाखोच्या संख्येने भाविकांची गर्दी नवरात्रोत्सवादरम्यान येथे होत असते. भक्तांच्या मान्यतेनुसार इच्छापूर्ती करणाऱ्या शितलामाता मंदिरातून यवतमाळात धार्मिकतेसोबतच सांकृतिक वारसा वृद्धिंगत झाला.
advertisement
दहीभात नैवेद्याची प्राचीन परंपरा
शितलामाता मंदिरात समाजबांधवांनी पूजाआरतीच्या माध्यमातून एकत्रित येणे, सद्विचारांची देवाणघेवाण करणे सोबतच विविध उपक्रम राबविणे, ज्यात पतंग स्पर्धा, शंकरपट, फुटबॉल, व्हॉलीबाल सामने होतात. दसऱ्याला रावणदहनाचा मोठा कार्यक्रमही याच ठिकाणी होतो. आठवड्याचा बाजारही याच ठिकाणी भरतो तेव्हा ग्रामीण भागातील बाजारात येणारे भक्त देवीपुढे नतमस्तक होतात. दैनंदिन कामाला प्रारंभ करण्यापूर्वी देवीचे दर्शन घेणारेही असंख्य भक्त आहेत. देवीला जलाभिषेकासोबतच दही भात नैवेद्य चढविण्याची देखील परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे.
advertisement
ग्रामस्तांनी देवीला घातले साकडे
स्वातंत्र्यपूर्व काळात परिसरात आदिवासी समाज राहायचा. जेव्हा गावावर महारोगाचे संकट आले आणि अज्ञात आजाराने एका पाठोपाठ एक मृत्यू होऊ लागले तेव्हा भयभीत ग्रामस्तांनी देवीकडे साकडे घातले. देवीला जलाभिषेक करून महामारी दूर करण्याची विनवणी केली. अनेकांनी देवी जवळच आश्रय घेतला. काही काळाने रोगाचा प्रकोप आटोक्यात आला. तेव्हापासून शीतलामातेवर भक्तांची श्रद्धा अधिक दृढ झाली. देवी भक्तांचे रक्षण करते अशी भावना असल्याने देवीला जलाभिषेक करण्याची परंपरा आजतागायत सुरु आहे, अशी माहिती कोषाध्यक्ष अभय मिश्रा देतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
October 18, 2023 4:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
महाराष्ट्रातील 'हिंदुस्थानी' देवीचं मंदिर माहितीये का? ब्रिटिश काळाशी आहे संबंध, Video