शेतमजुराचा विळा लागला अन् दगडातून रक्त आलं, विदर्भातील अंजना मातेची अनोखी आख्यायिका
- Published by:News18 Marathi
Last Updated:
प्रत्येक मंदिरासोबत एखादी आख्यायिका जोडलेली असते. विदर्भातील अंजना माता मंदिराची अशीच अनोखी आख्यायिका आहे.
वर्धा, 16 ऑक्टोबर: नवरात्री उत्सवात गावोगावी शक्ती देवतेची पूजा केली जाते. विदर्भात प्रसिद्ध देवींची अनेक मंदिरे आहेत. वर्धा शहरानजीक आलोडी येथील अंजना माता मंदिर यापैकीच एक आहे. नवरात्री उत्सवाच्या काळात आणि वर्षभर या ठिकाणी भक्तांची गर्दी असते. मंदिरात देवीची स्वयंभू मूर्ती असून याबाबत एक अनोखी आख्यायिका सांगितली जाते. मंदिराचे पुजारी रमेश हेडाऊ यांनीच याबाबत माहिती दिली आहे.
चक्क दगडाला लागलं होतं रक्त?
अंदाजे 80 ते 90 वर्षांपूर्वी या ठिकाणी शेत होतं. शेतात मजूर काम करत होते. काम करत असताना मजुराचा विळा एका दगडाला लागला त्या दगडातून रक्त निघताना दिसून आलं. याची चर्चा परिसरात पसरली. ही मूर्ती नेमकी कशाची? ही मूर्ती देवीची? हनुमानाची? की आणखी कशाची हे गावकऱ्यांना समजेचना. त्यानंतर गावातील एका भक्ताला देवीने स्वप्नात जाऊन साक्षात्कार दिला. दुसऱ्या दिवशी तो भक्त या ठिकाणी आला आणि मूर्ती बघितली. तेव्हा ही मूर्ती अंजना माता आणि तिच्यासमोर असलेला दगड हा सिंह असल्याचं सांगितलं. तेव्हापासून या मंदिराला अंजना माता मंदिर असं नाव पडलं. गावकऱ्यांकडून मनोभावे श्रद्धेने पूजा होऊ लागली. हळूहळू या ठिकाणची प्रसिद्धी वाढत गेली असून त्या ठिकाणी आता मोठ्या संख्येने भक्त येत असतात, असे पुजारी रमेश हेडाऊ सांगतात.
advertisement
मूर्ती जागेवरून हलल्या नाही
अंजना माता आणि सिंहाची मूर्ती दुसऱ्या ठिकाणी बसवावी. यासाठी अनेकांनी सिंह आणि देवीची ही मूर्ती इथून उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणालाच मूर्ती उचलली गेली नाही. मूर्ती जागेवरून हललीच नाही. त्यामुळे होत्या तिथेच मंदिर उभं करण्यात आल्याचं भाविकांनी सांगितलं. याठिकाणी गंगामाता आणि आणखी काही मूर्ती सापडल्या. त्या मूर्तींना शेंदुर लावून याठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत, असेही पुजारी हेडाऊ यांनी सांगितले.
advertisement
अनेक भाविक मंदिरात करतात स्वयंपाक
अंजना माता नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे ज्या भाविकांना अंजना मातेने साक्षात्कार घडविला किंवा ज्यांचा नवस पूर्ण झाला. ते भाविक या ठिकाणी मोठा स्वयंपाक करून महाप्रसाद देतात. देवीला नैवेद्य लावला जातो. मंदिर परिसरात एक छोटा हॉल देखील बांधण्यात आला असून या ठिकाणी छोटे मंगल कार्य, वाढदिवस, छोटी सभा होत असते, अशी माहिती देण्यात आली.
advertisement
परिसरातील विहीर फार जुनी
मंदिरासमोर असलेलं पिंपळाच्या झाडाखाली अनेक भक्त विसावा घेतात. हे पिंपळाचे झाड अंदाजे 35-40 वर्षांपासून आहे. तसेच याठिकाणी असलेली विहीर देखील फार जुनी असून मंदिर परिसरात आयोजित कार्यक्रमांकरिता विहिरीचे पाणी वापरले जाते. नवरात्रीत या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. कीर्तन, भजन, गरबा तसेच महाप्रसाद अखंड ज्योतही लावण्यात येते. अशा प्रकारे अंजना मातेचं देवस्थान वर्धा वासियांचं श्रद्धास्थान आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
October 16, 2023 8:27 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
शेतमजुराचा विळा लागला अन् दगडातून रक्त आलं, विदर्भातील अंजना मातेची अनोखी आख्यायिका