प्रभू रामाच्या गुरुंनी बांधलं हे मंदिर, गणेश कुंडाला आहे पौराणिक संदर्भ
- Published by:News18 Marathi
Last Updated:
विदर्भातील अष्टविनायक म्हणून केळझऱच्या गणेश मंदिराची ओळख आहे. या ठिकाणी प्राचीन गणेश कुंड आहे.
वर्धा, 30 सप्टेंबर: महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच विदर्भातील अष्टविनायक प्रसिद्ध आहेत. केळझर येथील गणपती मंदिर हे या अष्टविनायकांपैकी एक आहे. प्रभू रामाचे गुरू वसिष्ठ यांनी या मंदिराची स्थापना केल्याचं सांगितलं जातं. वर्धा जिल्ह्यातील याच मंदिराच्या मागे एक प्राचीन विहीर असून तिला गणेश कुंड म्हणून ओळखलं जातं. मंदिरात येणारे भाविक या कुंडालाही आवर्जून भेट देतात.
गणेश कुंडाला प्राचीन संदर्भ
केळझर येथील टेकडीला वाकाटकाच्या काळापासून भव्य किल्ल्याचे ठिकाण होते. या किल्ल्याला पाच बुरुज व माती दगडांनी बांधलेले भव्य परकोट होते. पहिल्या व दुसऱ्या परकोटाच्या आत चौकोनी सुंदर व भव्य अशी कुशावरती विहीर बांधलेली असून, त्याला गणेश कुंड या नावाने ओळखतात. आता बरेचसे भाविक या विहिरीच्या पाण्याचा तीर्थ म्हणून उपयोग करतात. तसेच या कुंडाला पांडवकालीन इतिहास आहे. पांडवांनी या गावाला भेट दिली असता त्यांनी या विहिरीतील पाणी पिल्याची आख्यायिका सांगितली जाते.
advertisement
कसे आहे गणेश कुंड?
केळझर येथील गणपती मंदिराच्या मागे असणाऱ्या गणेश कुंडापर्यंत जाण्याच्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. गणेश कुंडाचे बांधकाम पूर्णपणे दगडी आहे. प्राचीन काळात बांधलेली विहीर आजही सुस्थितीत आहे. पूर्वी या कुंडातील पाणी पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी वापरले जात होते. पुढे मंदिराचा विकास झाला आणि विहिरीच्या पाण्याची फारशी गरज राहिली नाही. पण आता या कुंडातील पाणी गावकरी आणि येथे येणारे भक्त तीर्थ म्हणून वापरतात, असे कापसे सांगतात.
advertisement
केळझर सिद्धीविनायक मंदिर
केळझर येथील सिद्धीविनायक मंदिर विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक मानलं जातं. या मंदिराला रामायण महाभारतकालीन संदर्भ आहेत. या मंदिरात गणेश मूर्तीची स्थापना प्रभू रामाचे गुरू वसिष्ठ ऋषींनी केल्याचे सांगितले जाते. नवसाला पावणारा बाप्पा अशी येथील मंदिराची ख्याती आहे. त्यामुळे अनेक भक्त या ठिकाणी सिद्धीविनायकाच्या दर्शनाला येत असतात, असे मंदिराचे सचिव महादेवराव कापसे सांगतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
September 30, 2023 11:18 AM IST