नवसाला पावणारं विदर्भातील गणेश मंदिर, श्रीरामाच्या जन्मापूर्वीचा आहे इतिहास
- Published by:News18 Marathi
Last Updated:
विदर्भातील अष्टविनायक मंदिर प्रसिद्ध आहेत. त्यातील सिद्धीविनायक मंदिराचा उल्लेख महाभारत आणि वसिष्ठ पुराणात आढळतो.
वर्धा, 19 सप्टेंबर: विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक गणपती मंदिर म्हणजे वर्धा जिल्ह्यात केळझर येथील श्री सिद्धिविनायक होय. केळझर गावातील एका टेकडीवर निसर्गरम्य परिसरात हे सुंदर जागृत देवस्थान आहे. या मंदिरामध्ये गणेशोत्सनिामित्त गणेश चतुर्थीपासून दहा दिवस उत्सव साजरा केला जातो. या उत्सावाकरिता विदर्भातीलच नाही तर इतरही ठिकाणच्या भक्तांची मांदियाळी असते.
सिद्धीविनायक मंदिरात बाराही महिने भाविकांची उपस्थिती असते. वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. वैशाख महिन्यात जागेश्वर महाराज स्मृतीनिमित्त सप्ताह, भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी उत्सव, अश्विन महिन्यात नवरात्रोत्सव, कार्तिक महिन्यात कार्तिक मास उत्सव, पौष महिन्यात एक दिवसीय यात्रा महोत्सव, माघ महिन्यात गणेश जयंती व महालक्ष्मी उत्सव आणि गजानन महाराज प्रगट दिन उत्सव आदी साजरे केले जातात. याबद्दल या मंदिरात 13 वर्षांपासून कार्यरत असलेले मंदिराचे सेवक पुजारी राममुरत मिश्रा यांनी माहिती दिली आहे.
advertisement
काय आहे मंदिराचा प्राचीन इतिहास?
या मंदिराचा इतिहास फार प्राचीन आहे. एवढेच नाही तर हे मंदिर प्रभू श्रीरामाचे गुरू वसिष्ठ ऋषींनी पूजेकरिता निर्माण केल्याची आख्यायिका आहे. प्रभू श्रीरामाच्या जन्मानंतर वशिष्ठ ऋषींनी हे गाव सोडल्याचंही सांगितलं जातं. शिवाय नवसाला पावणारा गणपती म्हणून त्याची ख्याती आहे. वशिष्ठ पुराण आणि महाभारतात केळझर या गावाचा उल्लेख एक चक्रनगर या नावाने आहे, असे पुजारी सांगतात.
advertisement
इथेच झाला होता बकासुराचा वध
या गावात बकासुर नावाचा राक्षस होता. गावकऱ्यांना तो त्रास देत असे. महभारतात या गावात म्हणजे एकचक्रनगरीत पांडवांचे वास्तव्य असताना बकासूर नावाच्या राक्षसाचा वध केल्याचा उल्लेख आहे. राक्षसाचा वध झाल्यानंतर गावकरी राक्षसाच्या त्रासापासून मुक्त झाले असेही गावकरी सांगतात.
advertisement
केळझरला जायचं कसं?
केळझर हे गाव वर्धा ते नागपूर मार्गावर वर्ध्यापासून पूर्वेस 25-30 किलोमीटर तर नागपूरपासून 55 किलोमीटर अंतरावर आहे. भाविकांना या देवस्थानात येण्याकरिता एसटी महामंडळाच्या बसेस, ट्रॅव्हल्स आणि ऑटोचीही सुविधा आहे. तुम्ही वर्धा जिल्ह्याच्या बाहेरून येणार असाल तर वर्ध्यापर्यंत रेल्वेने यायचे. त्यानंतर केळझर मंदिरात जाण्यासाठी बस, ट्रॅव्हल्स, ऑटोनेही जाता येईल.
advertisement
नवस पूर्ण झाल्यावर होतो महाप्रसाद
मंदिरातील गणेशाची मूर्ती 4 फूट 6 इंच उंच असून तिचा व्यास 14 फुट आहे. अत्यंत प्रसन्नचित्त, मनमोहक, जागृत मूर्ती असल्याने येथील बाप्पा भाविकांच्या नवसाला पावणारा असल्याची सर्वत्र ख्याती आहे. भक्तांचा नवस पूर्ण झाल्यावर मंदिर परिसरात मोठा स्वयंपाक म्हणजे महाप्रसाद केला जातो, असे पुजारी सांगतात. महाप्रसादासाठी सुविधाही मंदिर प्रशासनाने केली आहे. टेकडीवर मंदिर परिसर असल्याने निसर्ग सौंदर्यात आणखीच भर पडली आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
September 19, 2023 2:16 PM IST