Video: 2 इंचाचा नंदी पाहिलात का? पाहा कसा बनतोय लाकडाचा नंदीबैल?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
विदर्भात बैलपोळा आणि तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तेव्हा लाकडी नंदी पुजले जातात. पण हे नंदी बनतात कसे?
वर्धा, 7 सप्टेंबर: विदर्भात बैलपोळ्यासोबत तान्हा पोळा हा बालगोपाळांचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या पोळ्याला चिमुकले वेगवेगळ्या वेशभूषेत लाकडी नंदीबैल घेऊन पोळा भरवतात. वेगवेगळ्या आकाराचे लाकडी नंदीबैल सर्वांनाच आकर्षित करतात. मात्र हे नंदीबैल घडवण्यासाठी कलाकारांची मेहनत कशी असते? एका लाकडी ठोकळ्यापासून नंदीबैल घडवण्यामागे किती दिवसांचा कालावधी लागतो? हे आपण वर्धा येथील कलाकार राजेश दाळवणकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
नंदीबैल बनवण्याचा वडिलोपार्जित व्यवसाय
कलाकार राजेश दाळवणकर यांचा लाकडी कामाचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. आतापर्यंत त्यांनी अर्ध्या इंचाच्या नंदीपासून ते 4-5 फुटापर्यंत नंदी घडवले आहेत. हे छोटे नंदी गावात एखादा कार्यक्रम आयोजित झाल्यास पाहुण्यांना भेट स्वरूपात दिल्या जाते. सिंदी रेल्वे या गावाला नंदीमुळे एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. वाढत्या महागाईनुसार नंदीच्या किमती देखील माहागल्या आहेत, असं दाळणकर सांगतात.
advertisement
लाकडापासून बनवला 2 इंचाचा नंदी
दाळवणकर यांनी आपल्या कलाकारीतून 2 इंच नंदी तसेच दोन बैलांची टक्कर, बैलगाडा, देवतेची मूर्ती अशा प्रकारच्या शोभेच्या वस्तू बनवल्या आहेत. लाकडी नंदीबैल बनवण्या मागची मेहनत खूप मोठी आहे. लाकडी ठोकळ्याला आकार देऊन, त्याला पॉलीश करून आणि रंग देऊन हे नंदी तयार केले जातात. त्यांना विविध रुपात सजवलं जातं. या नंदीला मोठी मागणी असते, असे दाळणकर सांगतात.
advertisement
किती आहे लाकडी नंदीची किंमत?
सिंदी रेल्वे येथे अनेक सुबक आकाराचे आणि आकर्षक दिसणारे लाकडी नंदी मिळतात. या नंदीच्या किमती आकार आणि इतर बाबींवरून ठरतात. एक नंदी पूर्ण तयार होण्यासाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे त्याच्या किमती 3 ते 4 हजारापर्यंत जातात, असे दाळणकर यांनी सांगितले. तरीही हौसेला मोल नसते असं म्हणतात त्याप्रमाणे मोठ्या संख्येने नागरिक सिंदी रेल्वे या गावातून नंदीची खरेदी करतात.
advertisement
नंदी बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात
विदर्भातील प्रसिद्ध तान्हा पोळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे आता हे नंदी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तयार केलेल्या नंदीला रंग देण्याचे आणि सजवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सिंदी रेल्वे येथील बाजार आता आकर्षक नंदींनी सजू लागले आहेत. तान्हा पोळ्याला या लाकडी नंदी बैलाची पूजा करून घरोघरी जाऊन बोजारा मागण्याची परंपरा आहे.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
September 07, 2023 10:59 AM IST