Diwali 2025 Date: यंदा कधी साजरी होणार दिवाळी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, विधी, संपूर्ण माहिती
- Published by:Ramesh Patil
- trending desk
Last Updated:
Diwali 2025 Date and Time: अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या वेळी कुटुंबातील व्यक्ती आणि सगेसोयरे एकत्र येतात. या सणाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करून संपत्ती व समृद्धी मागितली जाते.
मुंबई : हिंदू धर्मामध्ये वर्षभर अनेक सण साजरे केले जातात. पण, दिवाळीच्या सणाची मजा काही औरच असते. लोक दिवाळीची आतुरतेने वाट पाहतात. दिवाळी हा हिंदू धर्मियांचा सर्वांत मोठा सण आहे. या सणाला प्रकाशाचा सण म्हणूनही ओळखलं जातं. संपूर्ण भारतातील लोक एक आनंदाने आणि उत्साहाने हे दीपपर्व साजरं करतात. अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या वेळी कुटुंबातील व्यक्ती आणि सगेसोयरे एकत्र येतात. या सणाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करून संपत्ती व समृद्धी मागितली जाते.
वर्ष 2025 मधील दिवाळी कधी आहे?
या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये, दिवाळीचा सण ऑक्टोबर महिन्यात साजरी केली जाईल. सहा दिवस चालणाऱ्या या सणाची सुरुवात वसुबारसेच्या दिवशी होते तर शेवट भाऊबीजेने होतो. या वर्षी वसुबारस 17 ऑक्टोबर रोजी आहे तर भाऊबीज 23 ऑक्टोबर रोजी आहे. लक्ष्मीपूजन हा दिवाळीच्या सणातील अतिशय महत्त्वाचा दिवस असतो. यावर्षी 21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन आहे.
advertisement
दिवाळीच्या दिवसांचं महत्त्व
दिवाळी हा हिंदूंचा महत्त्वाचा सण आहे. त्यामुळे या सणाला प्राचीन परंपरा आहे. असं म्हटलं जातं की, श्री रामाच्या अगोदरच्या काळापासून हा सण साजरा होतो. विष्णू व भागवत पुराणांमधील समुद्रमंथन कथेनुसार, समुद्रमंथनातून निघालेल्या अन्य रत्नांबरोबर लक्ष्मी देवी बाहेर आल्या होत्या. तेव्हापासून लक्ष्मीच्या पूजेसाठी दिवाळीला महत्त्व आहे. लक्ष्मी देवीबरोबर देवतांचे खजिनदार अशी ओळख असलेल्या 'कुबेरा'ची देखील पूजा केली जाते.
advertisement
वसुबारस
दिवाळीच्या सणाची सुरुवात वसुबारसेपासून होते. या दिवशी घराच्या गोठ्यात असलेल्या गोमातेची आणि तिच्या वासरांची पूजा केली जाते.
धनत्रयोदशी
त्यानंतर धनत्रयोदशी असते. हा दिवस लक्ष्मी देवीच्या सन्मानासाठी असतो. याप्रसंगी, लोक आपलं घर स्वच्छ करतात आणि सजवतात. सोने, चांदी किंवा भांडी यासारख्या नवीन वस्तू खरेदी करतात. असं म्हटलं जातं की, धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्यासह मौल्यवान धातूंची खरेदी केल्यास वर्षभर घरात संपत्ती आणि समृद्धी नांदते. धनाची देवता लक्ष्मीच्या स्वागतासाठी सर्वत्र दिवे लावतात. या वर्षी 18 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे. या दिवशी संध्याकाळी 7 वाजून 16 मिनिटापासून ते 8 वाजून 20 मिनिटांपर्यंत पूजेसाठी शुभ मुहूर्त आहे.
advertisement
साडेसातीतसुद्धा या राशीचे लोक खुश कसे? शनि महाराज मेहरबान; अडचणीतून अलगद बाहेर
धनत्रयोदशीची पूजा कशी करावी?
या दिवशी घरातील धनाची पूजा केली जाते. दारात असलेल्या धान्याची आणि घरात असलेल्या धनाची या दिवशी पूजा करून आरोग्य, उत्तम धन आणि संपदा लाभावी यासाठी प्रार्थना केली जाते. नैवेद्य म्हणून धणे आणि गुळ ठेवला जातो. यासोबत गूळ, खोबरं, पुरणपोळी किंवा गोडधोड नैवेद्यही दाखवण्याची प्रथा आहे. आयुर्वेदानुसार, या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते.
advertisement
धन्वंतरी आणि गणपती
लक्ष्मीची पूजा करण्यासाठी सर्वात आधी लाकडी पाट घेऊन त्यावर स्वस्तिक काढावे. त्यावर तेलाची ज्योत असलेला दिवा लावावा. दिव्याला हळद-कुंकु आणि तांदुळ लावा. त्यानंतर तुमच्याकडे असलेलं धान्य, धन, सोनं या वस्तूंची पूजा करा. गणपती आणि लक्ष्मीची पूजा करा. नमस्कार करावा.
नरक चतुर्दशीदिवाळी दरम्यान चतुर्दशी, अमावस्या आणि प्रतिपदा या तीन दिवशी अभ्यंगस्नानाच्या विधीला महत्त्व आहे. अभ्यंगस्नान हा एक प्राचीन आयुर्वेदिक विधी आहे. या विधीदरम्यान अंगाला सुगंधी उटणे लावून शरीर आणि मनाची शुद्धी केली जाते. असं म्हटलं जातं की, नरक चतुर्दशीच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने न चुकता अभ्यंगस्नान केलं पाहिजे. नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असं देखील म्हणतात. पुराणातील ग्रंथांतील माहितीनुसार, या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. मनामध्ये आणि घरामध्ये सकारात्मक उर्जा आणण्यासाठी सडा-रांगोळ्या टाकल्या जातात. यावर्षी 20 ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी आहे. पहाटे 5 वाजून 13 मिनिटांपासून ते 6 वाजून 25 मिनिटांपर्यंत अभ्यंगस्नानासाठी शुभ मुहूर्त आहे.
advertisement
कार्तिक महिन्यातील अमावस्येच्या दिवशी रिद्धी-सिद्धीचा दाता श्रीगणेश आणि धनाची देवता लक्ष्मी देवीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. दिवाळीच्या रात्री नियमानुसार गणेश-लक्ष्मीची पूजा केल्यास व्यक्तीला वर्षभर धन-धान्याची कमतरता भासत नाही, असं मानलं जातं. या दिवशी संध्याकाळी, लक्ष्मीच्या मूर्ती किंवा प्रतिमेजवळ मिठाई, फळे आणि पैसे ठेवले जातात आणि देवीकडे येत्या वर्षात संपत्ती आणि समृद्धीची मागणी केली जाते. यावर्षी 21 ऑक्टोबर रोजीसंध्याकाळी 7 वाजून 8 मिनिटांपासून ते 8 वाजून 18 मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे.
advertisement
बलिप्रतिपदा आणि पाडवा
उत्तर भारतामध्ये या दिवशी गोवर्धन पूजा देखील केली जाते. भागवत पुराणात वर्णन केल्याप्रमाणे, इंद्राने पाठवलेल्या वादळापासून श्रीकृष्णाने वृंदावनातील रहिवाशांचं संरक्षण केलं होतं. त्यासाठी कृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला होता. त्या पर्वताच्या खाली वृंदावनातील रहिवाशांनी आसरा घेतला होता. त्या दिवसाची आठवण म्हणून गोवर्धन पूजा केली जाते. काही ठिकाणी हा दिवस पाडवा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी व्यापारी वर्गाच्या नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवसाला बलिप्रतिपदा असं देखील म्हटलं जातं. या दिवशी विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन उदार बळीराजाला जमिनीत म्हणजे पाताळात गाडलं होतं. बळीला पाताळातील राज्य देऊन विष्णूने त्याच्या राज्याच्या द्वारपालाचे काम स्वीकारलं होतं, अशी अख्यायिका आहे.
भाऊबीज
भाऊबीज हा दिवाळीच्या सणाचा शेवटचा दिवस असतो. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावतात. त्यांना मिठाई देतात आणि औक्षण करून त्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. भाऊ आपल्या बहिणींना ओवाळणी देतात. यावर्षी 23 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजून 13 मिनिटांपासून ते 3 वाजून 28 मिनिटांपर्यंत औक्षणासाठी शुभ मुहूर्त आहे.
तुळशीचे लग्न आणि देवदिवाळी
दिवाळीच्या सणानंतर तुळशीच्या लग्नाला देखील फार महत्त्व आहे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे. हिंदू धर्मात तुळशी विवाहाला खूप महत्त्व आहे. या दिवशी तुळस आणि शाळीग्राम रुपातील विष्णू यांचा विवाह केला जातो. तुळशीला देवी लक्ष्मीचा अवतार मानले जाते. यावर्षी, 2 ते 5 नोव्हेंबर या काळात तुळशीचं लग्न लावता येईल. 'त्रिपुरारी पौर्णिमे'च्या दिवशी देवदिवाळी साजरी केली जाते. या दिवशी शंकराने त्रिपुरासुरावर विजय मिळवला होता. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी वाराणसीमध्ये मोठ्या उत्साहाने गंगा घाटांवर दिवे लावले जातात.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 21, 2025 11:21 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Diwali 2025 Date: यंदा कधी साजरी होणार दिवाळी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, विधी, संपूर्ण माहिती