दिवाळी पाडव्याला पतीला पत्नी का ओवाळते?, जाणून घ्या, यामागचं कारण..
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
diwali padwa - पाडवा अनेक दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी पत्नी पतीला का ओळळते, यामागचे काय महत्त्व आहे, हे जाणून घेऊयात.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा असे म्हणतात. या दिवशी सोने खरेदी करण्याला प्राधान्य दिले जाते. तसेच या दिवशी पत्नी पतीचे औक्षण करते. व्यापाऱ्यांसाठी हा दिवस नवीन वर्षाचा प्रारंभ मानला जातो. त्यामुळे पाडवा अनेक दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी पत्नी पतीला का ओळळते, यामागचे काय महत्त्व आहे, हे जाणून घेऊयात.
advertisement
या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. तर या पाडव्याची प्रत्येक विवाहित स्त्री मोठ्या आतुरतेने वाट पाहते. या दिवशी पतीला पाटावर बसवून त्यांचं औक्षण करण्याची परंपरा आहे. या दिवशी पतीने पत्नीला ओवाळणी म्हणून सोने, साडी किंवा एखादी मोठी भेटवस्तू देण्याची पद्धतदेखील आहे.
असे सांगितले जाते की, असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू होता. राक्षसकुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजेच्या हितासाठी दक्ष राजा म्हणून बळी राजा ओळखला जायचा. पुढे त्याने आपल्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केला. बळीराजा हा अतिशय पराक्रमी आणि दानशूर होता. मात्र, त्याला अहंकाराचा वारा लागला आणि तो अहंकारापासून दूर राहू शकला नाही. माणसाला एकदा का अहंकाराचा वारा लागला की मग माणसाची अधोगती सुरू होते. बळी राजाचेसुद्धा तेच झाले, त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंनी बटू वामनाचा अवतार धारण केला आणि तो बळी राजाकडे दान मागायला गेला.
advertisement
बळी राजाने एक यज्ञ केला. या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. त्यामुळे भगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला आणि बटूवेशात बळी राजासमोर उभे राहिले. या रुपात वामनाने तीन पावले भूमी मागितली. वचनाला जागून बळी राजाने हे दान देण्याची तयारी दाखविली, तेव्हा वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने आपले डोके पुढे केले. तीन पावलांमध्ये विष्णूंनी बळीराजाकडून सर्व काही काढून घेतले. परंतु, बळी राजाच्या मनाचा उदारपणा बघून भगवान श्रीहरी विष्णू बळी राजावर प्रसन्न झाले आणि त्याला पातळाचे राज्य दिले.
advertisement
या संपूर्ण प्रसंगामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची लीला पाहून अर्थात, आपल्या पतीची लीला आणि औदार्य पाहून लक्ष्मी प्रसन्न झाली आणि तिने भगवान श्रीहरी विष्णूंना ओवाळले आणि भगवान श्रीहरी विष्णूंनीसुद्धा माता लक्ष्मीला ओवाळणी दिली आणि त्या दिवसापासून पत्नी पतीला ओवाळते, अशी प्रथा सुरू झाल्याची पौराणिक कथा सांगितली जाते. परंपरेनेच पती आणि पत्नी यांनी परस्परांविषयीची कृतज्ञता व्यक्त करून आपल्या नात्याला एक नवे आणि अर्थपूर्ण वळण देण्याचा हा दिवस आहे, असेही मानलं जाते, अशी माहिती ज्योतिषी राजेश जोशी यांनी दिली.
advertisement
सूचना - ही माहिती धर्म आणि शास्त्राच्या आधारे आचार्यांशी बोलून लिहिली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. याबाबत लोकल18 मराठी कोणताही दावा करत नाही.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 30, 2024 3:53 PM IST