ENG vs SL: स्टेडियममधील 35,000 लोकांना कळाले, पण निसांकाला कळला नाही तो ट्रॅप ; एका बॉलवर संपूर्ण मॅच फिरली
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
England Defeated Sri Lanka: टी-20 वर्ल्डकप सुपर 8 सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेवर 51 धावांनी दणदणीत विजय मिळवला. पथुम निसांकासाठी रचलेल्या अचूक सापळ्यामुळे सामना इंग्लंडच्या बाजूने झुकला.
पल्लेकेले: ICC टी-20 वर्ल्डकपच्या सुपर 8 फेरीत इंग्लंडने श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 9 बाद 146 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संपूर्ण डाव केवळ 96 धावांवर आटोपला. मात्र या सामन्यातील सर्वात चर्चेचा क्षण ठरला तो श्रीलंकेच्या डावातील तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू होय. ज्यावर धडाकेबाज फलंदाज पथुम निसांका इंग्लंडने रचलेल्या सापळ्यात अडकला.
पालेकेले मैदानावर श्रीलंकेचा डाव सुरू असताना जोफ्रा आर्चर तिसरे षटक टाकत होता. षटकाच्या पहिल्याच चेंडूवर निसांकाने पुढे येत फुल लेंथ चेंडू मिड-ऑफच्या डावीकडे जोरात मारला, पण धाव मिळाली नाही. पुढील दोन चेंडूंवर मात्र त्याने आपला क्लास दाखवला. दुसऱ्या चेंडूवर लेंथ डिलिव्हरीला उशिरा बॅट शॉटमारत बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हरमधील मोकळ्या जागेत अप्रतिम चौकार मारला. तिसऱ्या चेंडूवर लेगसाईडकडे वळणाऱ्या स्लोअर बॉलला गुडघ्यावर बसून त्याने फाइन लेगच्या दिशेने चौकार ठोकला. या दोन फटक्यांमुळे तो लयीत आल्याचे दिसत होते.
advertisement
मात्र इंग्लंडने याच क्षणी डावपेच रचला. चौथ्या चेंडूपूर्वीच डीप मिडविकेटवर जेमी ओव्हर्टनला हलवण्यात आले. चौथ्या चेंडूवर आर्चरने वेगवान आणि स्टंपवर येणारा फुल लेंथ चेंडू टाकला. निसांकाने नेहमीप्रमाणे ‘व्हिपी’ फटका मारत चेंडू उंचावला, पण तो शॉट खाली ठेवण्यात अपयशी ठरला. डीप मिडविकेटवर उभा असलेला ओव्हर्टन सुरुवातीला सूर्यप्रकाशामुळे अडचणीत दिसला, तरी त्याने डोक्यावरून उत्कृष्ट झेल घेतला. निसांकाच्या विकेटने संपूर्ण मैदान क्षणभर स्तब्ध झाले. इंग्लंडच्या संघाने त्याच्यासाठी केलेला ट्रॅप संपूर्ण स्टेडियममधील चाहत्यांना दिसला. पण तो निसकाला कळला नाही आणि अवघ्या 9 धावा करून तो इंग्लंडच्या जाळ्यात अडकला. निसकाच्या विकेटनंतर श्रीलंकेची घसरण सुरू झाली.
advertisement
advertisement
गेल्या सामन्यात शतक ठोकणाऱ्या निसांकाकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र इंग्लंडने अचूक क्षेत्ररचना आणि वेगवान माऱ्याच्या जोरावर त्याला सापळ्यात अडकवले आणि श्रीलंकेच्या डावाला सुरुवातीलाच मोठा धक्का दिला. त्यानंतर श्रीलंकेची फलंदाजी कोसळली आणि 147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संपूर्ण संघ 96 धावांत गारद झाला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 22, 2026 8:48 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
ENG vs SL: स्टेडियममधील 35,000 लोकांना कळाले, पण निसांकाला कळला नाही तो ट्रॅप ; एका बॉलवर संपूर्ण मॅच फिरली








