ट्रम्प यांच्या रिसॉर्टमध्ये घुसला, 20 वर्षाच्या तरुणाचा जागीच खात्मा; एका हातात शॉटगन अन् दुसऱ्यात होते फ्यूल कॅन
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Mar A Lago Resort: डोनाल्ड ट्रम्प यांच्या मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 20 वर्षीय तरुणाला सीक्रेट सर्व्हिसने गोळी घालून ठार केले. शॉटगन आणि फ्यूल कॅनसह तो सुरक्षित परिसरात शिरण्याचा प्रयत्न करत होता.
फ्लोरिडा: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडातील मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये रविवारी पहाटे घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाचा सीक्रेट सर्विसच्या गोळीबारात मृत्यू झाला. स्थानिक वेळेनुसार ही घटना पहाटे सुमारे 1.30 वाजता घडली. सीक्रेट सर्विसने दिलेल्या माहितीनुसार एक व्यक्ती संरक्षित परिसरात बेकायदेशीररीत्या प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. परिस्थिती धोकादायक झाल्याने एजंटने गोळीबार केला.
शॉटगन आणि फ्यूल कॅनसह प्रवेशाचा प्रयत्न
अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, रिसॉर्टच्या नॉर्थ गेटवरून एक वाहन बाहेर पडत असताना संबंधित तरुणाने आत शिरण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडे शॉटगन आणि फ्यूल कॅन होते. दोन सीक्रेट सर्विस एजंटांनी त्याला थांबवत शस्त्र खाली ठेवण्याचे आदेश दिले. त्याने फ्यूल कॅन खाली ठेवला; मात्र शॉटगन गोळीबाराच्या स्थितीत उचलल्याने एजंटांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
मृत युवकाचे वय 20 वर्षे असून तो नॉर्थ कॅरोलिनाचा रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तपास यंत्रणा या प्रकरणाची चौकशी करत आहेत. प्राथमिक तपासात समोर आले की, काही दिवसांपूर्वी त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या बेपत्ता होण्याची नोंद केली होती. तो नॉर्थ कॅरोलिनाहून दक्षिणेकडे प्रवास करत आला होता आणि मार्गात त्याने शॉटगन खरेदी केल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्या वाहनातून बंदुकीचे बॉक्सही जप्त करण्यात आले.
advertisement
घटनेवेळी ट्रम्प व्हाइट हाऊसमध्ये
घटनेच्या वेळी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प वॉशिंग्टन डीसी येथील व्हाइट हाऊसमध्ये होते. साधारणपणे ते आठवड्याच्या शेवटी मार-ए-लागो येथे वेळ घालवतात.
ट्रम्प यांच्या सुरक्षेबाबत आधीही घटना
जुलै 2024 मध्ये निवडणूक प्रचार सभेदरम्यान ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला होता. त्या वेळी ते राष्ट्राध्यक्ष नव्हते. सुमारे 400 फूट अंतरावरून एका हल्लेखोराने असॉल्ट रायफलमधून गोळी झाडली होती, जी त्यांच्या कानाला स्पर्शून गेली. त्यानंतर सीक्रेट सर्विसच्या स्नायपर्सनी हल्लेखोराला ठार केले होते.
advertisement
कडक सुरक्षा, मेंबरशिपशिवाय प्रवेश नाही
मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये प्रवेशासाठी विशेष सदस्यत्व आवश्यक असते. लाइफटाइम मेंबरशिपची फी सुमारे 8.5 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे वृत्त आहे. मात्र केवळ पैसा पुरेसा नसून अर्जदारांची पार्श्वभूमी, आर्थिक माहिती आणि सामाजिक स्थितीची तपासणी केली जाते. AFP वृत्तसंस्थेनुसार दरवर्षी जगभरातील अनेक श्रीमंत व्यक्ती सदस्यत्वासाठी अर्ज करतात, परंतु निवडक लोकांनाच प्रवेश दिला जातो.
advertisement
सध्या फेडरल आणि स्थानिक तपास यंत्रणा या घटनेचा सर्वांगीण तपास करत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 22, 2026 10:24 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
ट्रम्प यांच्या रिसॉर्टमध्ये घुसला, 20 वर्षाच्या तरुणाचा जागीच खात्मा; एका हातात शॉटगन अन् दुसऱ्यात होते फ्यूल कॅन










