Cricket Rules : ओव्हर थ्रो, हिट विकेट ते बॅट... T20 वर्ल्ड कपआधी बदलले क्रिकेटचे नियम! आताच जाणून घ्या
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपला 7 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे, पण त्याआधी क्रिकेटचे नियम बनवणारी संस्था असलेल्या एमसीसीने (मेर्लिबोर्न क्रिकेट क्लब) खेळाच्या नियमांमध्ये बदल केले आहेत.
मुंबई : टी-20 वर्ल्ड कपला 7 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे, पण त्याआधी क्रिकेटचे नियम बनवणारी संस्था असलेल्या एमसीसीने (मेर्लिबोर्न क्रिकेट क्लब) खेळाच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. एमसीसीने क्रिकेटचे 73 नियम बदलले आहेत, हे नवे नियम 1 ऑक्टोबर 2026 पासून लागू होणार आहेत, त्यामुळे टी-20 वर्ल्ड कप जुन्या नियमांनुसारच खेळवला जाणार आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये दिवसाच्या शेवटच्या ओव्हरला विकेट पडली, तर त्याच बॉलला दिवसाचा खेळ संपवला जायचा आणि नवीन बॅटर बॅटिंगला यायचा नाही, पण आता विकेट पडली तरी ओव्हर पूर्ण खेळावी लागेल. याशिवाय लॅमिनेटेड बॅटलाही सशर्त परवानगी देण्यात आली आहे.
शेवटच्या ओव्हरच्या नियमात बदल
सध्या टेस्ट क्रिकेटमध्ये शेवटची किंवा शेवटून दुसरी ओव्हर सुरू असेल आणि विकेट गेली, तर अंपायर दिवसाचा खेळ संपल्याचं जाहीर करायचे, त्यामुळे नवीन बॅटर मैदानात यायचा नाही. वेळ वाचवण्यासाठी हा नियम होता, पण यामुळे वेळ वाचत नाही, तर दुसऱ्या दिवशी उरलेले बॉल टाकावे लागतात. या नियमामुळे क्रिकेटचा रोमांच कमी झाला होता, कारण नवीन बॅटरचा कठीण परिस्थितीचा सामना करण्यापासून बचाव व्हायचा. आता नव्या नियमानुसार नव्या बॅटरला शेवटच्या ओव्हरचे उरलेले बॉल खेळावे लागणार आहेत.
advertisement
ओव्हर थ्रो चा नियमही बदलला
एमसीसीने ओव्हर थ्रो आणि मिस फिल्डिंगचा नियमही स्पष्ट केला आहे. नव्या नियमानुसार ओव्हर थ्रो तेव्हाच मानला जाईल, तेव्हा एखादा खेळाडू खेळपट्टीच्या दिशेने बॉल फेकेल आणि बॉल पुढे निघून जाईल. जर एखादा खेळाडू बाऊंड्री जवळ बॉल अडवण्याचा प्रयत्न करत असताना बॉल त्याच्या हातातून निसटला, तर त्याला मिस फिल्डिंग मानली जाईल.
advertisement
डेडबॉलसाठी बॉल विकेट कीपर किंवा बॉलरच्या हातामध्येच असणं गरजेचं असणार नाही. जर बॉल मैदानात कुठेही थांबला आणि अंपायरला बॅटर रन काढत नाहीये, असं वाटलं तर डेड बॉल घोषित केला जाईल.
बॅटचा नियमही बदलला
दोन ते तीन लाकडं जोडून बनवलेल्या बॅटलाही मंजुरी देण्यात आली आहे. अशाप्रकारच्या बॅट या स्वस्त असतात, कारण दोन किंवा तीन लाकडांच्या तुकड्यांपासून या बॅट बनवल्या जातात. अखंड लाकडापासून बनवलेल्या बॅटपेक्षा या प्रकारच्या बॅट स्वस्त असतात. एमसीसीने ओपन एज क्लब क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या बॅटच्या वापराला मंजुरी दिली आहे.
advertisement
हिट विकेटचा नियमही स्पष्ट
बॅटर विरोधी टीमच्या खेळाडूसोबत टक्कर झाल्यामुळे स्टम्पवर पडला तर त्याला हिट विकेट आऊट दिलं जाणार नाही. तसंच शॉट मारताना बॅटरच्या हातातून बॅट सुटली आणि ती स्टंपवर जाऊन आदळली, तर त्याला आऊट दिलं जाईल.
एमसीसी ही क्रिकेटचे नियम बनवणारा खासगी क्लब आहे, ज्याची स्थापना 1787 साली लंडनमध्ये झाली. आयसीसीची स्थापना झाल्यानंतरही एमसीसी क्रिकेटचे नियम बनवते, या समितीचे सदस्य क्रिकेटचे नियम ठरवतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 04, 2026 4:59 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Cricket Rules : ओव्हर थ्रो, हिट विकेट ते बॅट... T20 वर्ल्ड कपआधी बदलले क्रिकेटचे नियम! आताच जाणून घ्या








