ऑलिंपिक ते क्रिकेट, भारतीय खेळाडूंसाठी ‘टाटा’ ठरले तारणहार, वेळोवेळी अशी केली मदत
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
टाटा समूह गेल्या १०० वर्षांहून अधिक काळ भारतीय खेळाडूंना पाठिंबा देत आहे. ऑलिंपिक असो वा क्रिकेट, भारतीय खेळाडूंना मदत करण्यासाठी टाटा समूह नेहमीच सर्वांत पुढे उभा राहिला आहे.
भारताचे लोकप्रिय उद्योगपती रतन टाटा यांचे ८६ व्या वर्षी निधन झाले आहे. काल म्हणजेच ९ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात दुःखाचे वातावरण आहे. ऑलिंपिक मेडलिस्ट नीरज चोप्रा ते भारतीय क्रिकेट कर्णधार रोहित शर्मा यांनी त्यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. टाटा समूह गेल्या १०० वर्षांहून अधिक काळ भारतीय खेळाडूंना पाठिंबा देत आहे. ऑलिंपिक असो वा क्रिकेट, भारतीय खेळाडूंना मदत करण्यासाठी टाटा समूह नेहमीच सर्वांत पुढे उभा राहिला आहे.
भारताला ऑलिंपिकमध्ये पोहोचवण्यात मोठा वाटा
१९२० साली भारताने पहिल्यांदा अँटवर्प ऑलिंपिकमध्ये सहभाग घेतला होता. भारताला या स्पर्धेत पोहोचवण्यात दोराबजी टाटा यांची मुख्य भूमिका होती. १९१९ साली दोराबजी हे भारतीय ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्यांनी मुंबईच्या राज्यपालांना भारतीय संघाला ऑलिंपिकमध्ये पाठवण्यासाठी तयार केले. १९२० साली भारतीय संघाला ऑलिंपिकला जाण्याची परवानगी मिळाली. या खेळाडूंना ऑलिंपिकमध्ये जाण्यासाठी लागणारा पैसा दोराबजी टाटा यांनी पुरवला होता. यावेळी भारताकडून पाच खेळाडूंना पाठवण्यात आले होते.
advertisement
१९९६ मध्ये क्रिकेटमध्ये केली एन्ट्री
टाटा समूहाने क्रिकेटच्या उदयातही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. १९९६ साली रतन टाटा यांनी पहिल्यांदा क्रिकेटच्या क्षेत्रात पाऊल टाकले. त्यांनी 'टायटन कप' या नावाने त्रिकोणी मालिका प्रायोजित केली, ज्यात भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे देश सहभागी झाले. या मालिकेसाठी सचिन तेंडुलकर भारतीय संघाचे नेतृत्व करत होता. या मालिकेत भारतीय संघाने विजय मिळवला. २००० साली मॅच फिक्सिंगचा आरोप झाल्याने रतन टाटा यांनी यातून माघार घेतली.
advertisement
२०२० साली आयपीएलमध्ये घेतला सहभाग
२०२० साली टाटा समूहाने क्रिकेटमध्ये पुन्हा प्रवेश केला. यावेळी आयपीएल स्पर्धा मोठ्या आर्थिक अडचणीत सापडली होती. २०२० साली भारत आणि चीन यांच्यातील वाढत्या राजकीय मतभेदांमुळे 'वीवो' फोन कंपनीने आयपीएल बरोबरची भागीदारी अर्ध्यातच रद्द केली. या काळात रतन टाटा यांनी जगातील सर्वांत मोठी लीग स्पॉन्सर करण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही तर त्यांनी २०२३ साली सुरू झालेले महिला प्रीमियर लीगही स्पॉन्सर केले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 10, 2024 3:00 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
ऑलिंपिक ते क्रिकेट, भारतीय खेळाडूंसाठी ‘टाटा’ ठरले तारणहार, वेळोवेळी अशी केली मदत