RCB समोरचं ग्रहण संपता संपेना, आता स्टार क्रिकेटपटूवर बंदी, करिअरही संकटात!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2025 ची ट्रॉफी जिंकल्यानंतर आरसीबीच्या मागे लागलेली संकंटं काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.
मुंबई : आयपीएल 2025 ची ट्रॉफी जिंकल्यानंतर आरसीबीच्या मागे लागलेली संकंटं काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. आयपीएल जिंकल्यानंतर आरसीबीच्या विजयी परेडवेळी चेंगराचेंगरी झाली, ज्यात 11 जणांचा मृत्यू झाला तर 50 पेक्षा जास्त जण जखमी झाले. या संपूर्ण प्रकरणामध्ये आरसीबी जबाबदार असल्याचं सांगत तपास यंत्रणांनी आरसीबीविरोधात गुन्हा दाखल केला. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने महाराजा टी-20 लीगचे सामनेही चिन्नास्वामी स्टेडियमऐवजी म्हैसूरला खेळवण्याचा निर्णय घेतला, तसंच महिला वनडे वर्ल्ड कपच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यांवर संकट ओढावलं आहे.
आरसीबीच्या खेळाडूवर बंदी
दुसरीकडे आता आरसीबीच्या खेळाडूच्या अडचणीही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. आरसीबीचा स्टार क्रिकेटपटू यश दयाळ याचं करिअर संकटात सापडलं आहे. लैगिंक अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर आता यश दयाळ याला यूपी टी-20 लीगमध्ये बंदी घालण्यात आली आहे. यश दयाळने आयपीएल 2025 च्या 15 सामन्यांमध्ये 13 विकेट घेत, आरसीबीला ट्रॉफी जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
advertisement
यश दयाळवर झालेल्या गंभीर आरोपांमुळे त्याच्यावर बंदी घालण्याचा निर्णय यूपीसीएने घेतला आहे. यूपी टी-20 लीगमध्ये गोरखपूर लायन्सने यश दयाळला 7 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. पण यश दयाळवर सुरू असलेल्या कायदेशीर कारवाईमुळे त्याच्या खेळण्यावर बंदी घालण्याचा निर्णय यूपीसीएने घेतला आहे.
22 ऑगस्टला पुढील सुनावणी
काहीच दिवसांपूर्वी राजस्थान हायकोर्टाने यश दयाळला धक्का दिला. अल्पवयीन मुलीवरच्या अत्याचाराचे आरोप संवेदनशील आहेत, त्यामुळे यश दयाळच्या अटकेवर आणि पोलीस कारवाईवर बंदी घालता येणार नाही, असा निर्णय हायकोर्टाने दिला. यानंतर आता या प्रकरणाची सुनावणी 22 ऑगस्टला होणार आहे.
advertisement
लैंगिक अत्याचाराचे दोन आरोप
27 वर्षांच्या यश दयाळविरोधातलं पहिलं प्रकरण गाझियाबादमधून समोर आलं. यश दयाळने लग्नाचं आमिष दाखवून आपल्यावर लैंगिक अत्यातार केल्याचा आरोप तरुणीने केला. यानंतर जयपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीनेही यश दयाळने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला. याप्रकरणी जयपूरच्या सांगानेर सदर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांमुळे यश दयाळचं करिअरही संकटात सापडलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 10, 2025 5:21 PM IST


