'महाराष्ट्र केसरी'नंतर हिंदकेसरीही सोलापूरचाच! पैलवान समाधान पाटीलनं मारलं मैदान, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
यंदा महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी मोहोळ तालुक्याला मिळाल्याने सोलापूर जिल्ह्यात जल्लोष साजरा केला जात आहे.
प्रसाद दिवाणजी, प्रतिनिधी
सोलापूर: नुकतेच तेलंगाणातील हैदराबाद येथे 52 वी हिंदकेसरी स्पर्धा झाली. यात सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील पैलवान समाधान पाटील याने हिंद केसरीची गदा पटकावली. हरियाणातील भोलू खत्री या अनुभवी आणि प्रसिद्ध पैलवानाला 6 विरुद्ध 12 गुणांनी पराभूत करत समाधानने विजय मिळवला. पैलवान समाधानच्या विजयाने सोलापूरच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेला आहे.
advertisement
शेतकरी कुटुंबातील समाधान पाटील
पैलवान समाधान पाटील हा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील आहे. मोहोळ तालुक्यातील नजीक पिंपरी गावात समाधानने कुस्तीचे धडे घेतले. सुरुवातीला गावात पैलवानकीला सुरुवात केली. तब्बल 20 वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर यंदाची हिंदकेसरी गदा मोहोळ समाधानने पटकावली. यंदा हिंद केसरीची गदा महाराष्ट्रात जाते की दिल्लीकडे याची उत्सुकता सर्वांना होती. अखेर सलग दुसऱ्या वर्षी ही गदा महाराष्ट्रात आली.
advertisement
पै. समाधान उपमहाराष्ट्र केसरी
पैलवान समाधान 2010 सालपासून कुस्ती करत आहे. यापूर्वी त्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या ‘सीएम केसरी’चा किताब तसेच 2017 सालचा ‘उपमहाराष्ट्र केसरी’ किताब पटकवला आहे. समाधान सोलापुरातील भरत मेकाले यांच्या तालमीत सराव करत होता. त्यानंतर काही काळ त्यानं दिल्लीतही सराव केला आहे. घरात आजोबांपासून सर्वच जण पैलवान आहेत. त्यामुळे लहानपणापासून कुस्तीचे बाळकडू त्याला मिळाले होते.
advertisement
सोलापूर पैलवानांचा जिल्हा
सोलापूर जिल्हा हा पैलवानांचा जिल्हा म्हणून देशभर प्रसिद्ध होऊ लागला आहे. यंदा महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी मोहोळ तालुक्याला मिळाल्याने सोलापूर जिल्ह्यासह मोहोळ तालुक्यात जल्लोष साजरा केला जात आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
March 09, 2024 9:55 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'महाराष्ट्र केसरी'नंतर हिंदकेसरीही सोलापूरचाच! पैलवान समाधान पाटीलनं मारलं मैदान, Video