Farmer Success Story: नोकरी गेली अन् मातीशी पुन्हा नाळ जोडली, पुरंदरच्या शेतकऱ्यानं मिळवला 10 लाखांचा नफा, नक्की करतोय काय?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
पुरंदरच्या सिंगापूर गावातील अभिजित लवांडेने नोकरी गमावूनही ३० गुंठ्यातून १० लाखांचा नफा मिळवला. अंजीर व सीताफळ शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रेरणादायी ठरला.
Farmer Success Story: पुरंदर हे नाव जरी ऐकं तरी डोळ्यासमोर येतो तो रसरशीत, गोड अंजीर! जगभरात पुरंदरच्या अंजिराची वेगळी ओळख आहे. एकेकाळी, शेतीकडे पाठ फिरवणाऱ्या तरुणाईसाठी आज पुरंदर तालुक्यातील सिंगापूर गावचा युवा शेतकरी, अभिजित लवांडे प्रेरणास्त्रोत बनला आहे. नोकरी गेल्यानंतर खचून न जाता त्याने डोकं चालवलं आणि आपल्याकडे असलेल्या जमिनीतून त्याने सोनं केलं, त्याचं तोंडभरुन कौतुक आई-वडील करत आहेत.
अभिजितनं सांगितला तो अनुभव
उच्च शिक्षण घेऊनही नशिबाने अभिजितला नोकरीच्या चक्रातून बाहेर फेकलं. हातातोंडाशी आलेला घास हिसकावला गेला. कोरोना काळात नोकरी गमावली आणि मनात थोडी निराशा आली. पण अभिजितन हार मानली नाही. त्याने आपल्या वडिलोपार्जित 9 एकर शेतीकडे एक नवी संधी म्हणून पाहिलं. अभिजित म्हणतात की, नोकरी गेली तेव्हा थोडं वाईट वाटलं, पण शेवटी आपली माती आपल्याला कधीच निराश करत नाही, तेव्हाच ठरवलं या माहितीतून सोनं उगवून दाखवायचं.
advertisement
वडिलांचा आणि काकांची मदत घेऊन अभिजितने आधुनिक शेतीची कास धरली. शेतीला बारमाही पाणी मिळावं यासाठी त्यांनी धाडस केलं आणि कृषी विभागाच्या मदतीने शेततळं उभारलं. यासाठी त्यांना ३ लाख ३० हजार रुपयांचं अनुदान मिळालं, ज्यामुळे पाण्याची चिंता मिटली.
३० गुंठ्यातून १० लाखांचा नफा!
अभिजित यांनी आपल्या ४ एकर शेतीत 'पुना पुरंदर' वाणाच्या अंजिराची ६०० झाडं लावली. केवळ ३० गुंठ्यात, म्हणजे अगदी कमी जागेत त्यांनी १४ टन विक्रमी उत्पादन घेतलं! विश्वास बसणार नाही पण या ३० गुंठ्यांनी अभिजितला चक्क १० लाखांचा निव्वळ नफा मिळवून दिला. खट्टा बहार असो वा मिठा बहार, त्यांच्या अंजिराला बाजारात ८० ते १०० रुपये प्रति किलो असा उत्तम दर मिळाला. त्यांचे अंजीर पुणे, मुंबई, कोल्हापूर, दिल्लीच नव्हे, तर मागील वर्षी प्रायोगिक तत्त्वावर जर्मनीलाही निर्यात झाले!
advertisement
शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड
अभिजितच्या या यशाचं गुपित आहे, अभ्यासपूर्ण नियोजन आणि जिद्द. त्यांनी शेतीत केवळ कष्ट नाही घेतले, तर डोक्याचा वापर केला. डॉ. दळवे आणि डॉ. बालगुडे यांसारख्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतलं. कृषी विद्यापीठाचे प्रशिक्षण, प्रदर्शने आणि भेटी घेऊन एकात्मिक कीड व्यवस्थापन शिकून घेतलं. त्यांनी तुषार सिंचन पद्धतीत बदल केले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, अंजिराच्या बहराचे महिने बदलले. पाचटांचा वापर करून कमी पाण्यात जास्त उत्पादन घेण्यावर भर दिला. यांत्रिकीकरणाच्या मदतीने वेळ वाचवला. समीर डोंबे आणि मोठे बंधू मंगेश लवांडे यांचे सहकार्य त्यांना वेळोवेळी मिळालं.
advertisement
इतरांनाही रोजगार आणि मार्गदर्शन
अभिजित लवांडे केवळ स्वतःसाठी शेती करत नाहीत. त्यांच्या अंजीर बागेत आजूबाजूच्या ७ ते ८ लोकांना नियमित रोजगार मिळतो आहे. हे माणुसकीचं पाऊल त्यांच्या यशामध्ये आणखी भर घालतं. महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थानमधून शेतकरी त्यांची बाग पाहण्यासाठी येतात आणि मार्गदर्शन घेतात.
अंजिरासोबतच, त्यांनी ३ एकरमध्ये सीताफळाची (फुले पुरंदर वाण) लागवड केली आणि गतवर्षी त्यातून ४ लाख ६८ हजार रुपयांचा नफा कमावला. त्यांनी सीताफळाची आणि अंजिराची रोपे विकून शेतीपूरक व्यवसायही सुरू केला आहे. अभिजित आज सेंद्रिय शेतीवर भर देतात. जीवामृत, दशपर्णी अर्क यांसारखे सेंद्रिय खत वापरून त्यांनी फळांची उत्तम गुणवत्ता जपली आहे. एका पदवीधर तरुणाने नोकरी गमावल्यानंतर निराश न होता, आपल्या मातीशी नातं जोडून आधुनिक तंत्रज्ञान आणि जिद्दीच्या बळावर उभं केलेलं हे अंजिराचं साम्राज्य खरंच प्रेरणादायी आहे.
view commentsLocation :
Pune Cantonment (Pune Camp),Pune,Maharashtra
First Published :
November 10, 2025 11:13 AM IST
मराठी बातम्या/Success Story/
Farmer Success Story: नोकरी गेली अन् मातीशी पुन्हा नाळ जोडली, पुरंदरच्या शेतकऱ्यानं मिळवला 10 लाखांचा नफा, नक्की करतोय काय?


