विना OTP ही उडू शकतात खात्यातून पैसे, फोनमध्ये शिरतोय नवीन वायरस, यापासून कसं वाचाल? ही गोष्ट लक्षात ठेवा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
सामान्यतः कोणत्याही ट्रान्झॅक्शनसाठी आपल्याला ओटीपी येतो, पण हा व्हायरस तुमच्या फोनच्या 'एक्सेसिबिलिटी सर्व्हिसेस'चा ताबा घेतो आणि बँक ॲपमध्ये घुसून परस्पर पैसे ट्रान्सफर करतो.
मुंबई : आजच्या डिजिटल युगात आपला स्मार्टफोन हे केवळ संवादाचे साधन राहिले नसून ते आपले चालते-फिरते बँक खाते झाले आहे. खिशातून पाकीट चोरीला जाण्याची भीती आता कमी झाली असली, तरी मोबाईलमधील एका 'क्लिक'मुळे तुमची आयुष्यभराची कमाई क्षणात गायब होऊ शकते, अशी भीती आता निर्माण झाली आहे. गुन्हेगार आता तुमच्या घरापर्यंत येत नाहीत, तर ते तुमच्या खिशात असलेल्या फोनमध्ये चोरपावलांनी शिरत आहेत.
सध्या अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्ससाठी एक अत्यंत धोक्याची घंटा वाजली आहे. 'Albiriox' नावाचा एक नवीन आणि अत्यंत घातक 'सुपर व्हायरस' (मॅलवेअर) सध्या धुमाकूळ घालत असून, त्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो तुमच्या परवानगीशिवाय आणि विना OTP तुमचे बँक खाते रिकामे करू शकतो.
काय आहे हा 'Albiriox' व्हायरस आणि तो कसा काम करतो?
सायबर सुरक्षा संस्था 'क्लीफी' (Cleafy) ने या नवीन धोक्याची पुष्टी केली आहे. हा व्हायरस इतर सामान्य व्हायरसपेक्षा वेगळा आहे कारण:
advertisement
विना OTP व्यवहार : खरंतर कोणत्याही ट्रान्झॅक्शनसाठी आपल्याला ओटीपी येतो, पण हा व्हायरस तुमच्या फोनच्या 'एक्सेसिबिलिटी सर्व्हिसेस'चा ताबा घेतो आणि बँक ॲपमध्ये घुसून परस्पर पैसे ट्रान्सफर करतो. युजरला साधा अलर्टही मिळत नाही. धक्कादायक म्हणजे हा व्हायरस आता 'मॅलवेअर-ॲज-अ-सर्व्हिस' (MaaS) मॉडेलवर विकला जात आहे. म्हणजेच कोणताही गुन्हेगार ठराविक पैसे देऊन हे टूल विकत घेऊ शकतो आणि लोकांवर हल्ले करू शकतो.
advertisement
तुमच्या फोनमध्ये हा व्हायरस येतो तरी कसा?
हॅकर्स थेट तुमच्या फोनवर हल्ला करत नाहीत, तर ते तुम्हाला जाळ्यात ओढतात:
1. बनावट ॲप्स: व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवर तुम्हाला एखाद्या फाईलची लिंक येते (उदा. मोफत रिचार्ज किंवा स्वस्त वस्तूंची ऑफर). ही फाईल एखादे अधिकृत ॲप असल्यासारखी दिसते.
2. अननोन APK फाईल्स: जेव्हा तुम्ही एखाद्या लिंकवरून APK फाईल डाऊनलोड करता, तेव्हा हा व्हायरस तुमच्या फोनमध्ये गुपचूप शिरतो.
advertisement
3. परवानगीचा गैरवापर: एकदा का तुम्ही 'Install from Unknown Sources' ला परवानगी दिली की, बॅकग्राउंडमध्ये हा व्हायरस तुमचे बँकिंग, पेमेंट आणि क्रिप्टो ॲप्स आपल्या नियंत्रणाखाली घेतो.
400 हून अधिक बनावट ॲप्स सक्रिय
संशोधकांनी आतापर्यंत असे 400 पेक्षा जास्त बनावट ॲप्स शोधले आहेत जे विशेषतः बँकिंग सेवा वापरणाऱ्यांना लक्ष्य करत आहेत. हा व्हायरस तुमचे पासवर्ड चोरी करण्याऐवजी थेट तुमच्या खात्याचा ताबा घेतो, ज्यामुळे तुम्हाला साधी लॉगिन सूचनाही मिळत नाही.
advertisement
स्वतःला सुरक्षित कसे ठेवायचे?
तुमचे बँक खाते सुरक्षित ठेवण्यासाठी खालील गोष्टींचे पालन करणे आता अनिवार्य झाले आहे. त्यामुळे कोणतेही ॲप कधीही अनोळखी लिंक, मेसेज किंवा वेबसाईटवरून डाऊनलोड करू नका. फक्त 'Google Play Store' चाच वापर करा.
Settings बदला: तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन 'Install Unknown Apps' हा पर्याय नेहमी बंद ठेवा.
Google Play Protect: तुमच्या फोनमधील प्ले प्रोटेक्ट सेटिंग नेहमी 'On' ठेवा, जेणेकरून ते घातक ॲप्सना स्कॅन करू शकेल.
advertisement
ॲप्सवर लक्ष ठेवा: तुमच्या फोनमध्ये असे कोणतेही ॲप आहे का, जे तुम्ही स्वतः डाऊनलोड केलेले नाही? असल्यास ते तातडीने डिलीट करा.
सॉफ्टवेअर अपडेट: फोनची कंपनी जेव्हा जेव्हा सिस्टम अपडेट पाठवते, तेव्हा ते त्वरित इन्स्टॉल करा. या अपडेट्समध्ये नवीन व्हायरसपासून वाचण्यासाठी 'सिक्युरिटी पॅचेस' असतात. सतर्क राहा, कारण तुमची एक छोटीशी चूक तुमच्या बँक खात्यासाठी महागात पडू शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 21, 2026 10:27 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
विना OTP ही उडू शकतात खात्यातून पैसे, फोनमध्ये शिरतोय नवीन वायरस, यापासून कसं वाचाल? ही गोष्ट लक्षात ठेवा









