मोठा दिलासा! सहा महिन्यानंतर अलिबाग-रोहा बस पुन्हा धावणार; नोकरदार आणि विद्यार्थ्यांना फायदा
Last Updated:
Alibag–Roha ST Bus Service : सहा महिन्यांनंतर अलिबाग-रोहा बससेवा पुन्हा सुरू झाली आहे. धोकादायक पुलांजवळ पर्यायी मार्ग तयार झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नोकरदार, विद्यार्थी आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ठाणे : अलिबाग-रोहा प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. या मार्गावरील सुडकोली आणि नवघर येथील पूल धोकादायक झाल्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून अलिबाग-रोहा बससेवा बंद ठेवण्यात आली होती. या निर्णयामुळे रोहा आणि परिसरात जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. दररोज प्रवास करणारे नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी आणि व्यापाऱ्यांना पर्यायी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत होते.
सहा महिन्यांनंतर धावणार अलिबाग-रोहा बस
अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाने तालुक्यातील धोकादायक पुलांचे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात अलिबाग-रोहा मार्गावरील नवघर येथील एक आणि सुडकोली येथील दोन असे एकूण तीन पूल धोकादायक असल्याचे आढळून आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या मार्गावरून पाच टनांपेक्षा जास्त वजनाच्या वाहनांना वाहतुकीस बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे या मार्गावरील एसटी बससेवा थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
advertisement
बससेवा बंद असल्यामुळे अलिबाग ते रोहा थेट प्रवास शक्य नसल्याने केवळ अलिबाग ते महानपर्यंतच बससेवा सुरू ठेवण्यात आली होती. त्यामुळे पुढील प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत होते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सातत्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला.
अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक पुलांच्या बाजूने तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी मार्गाची व्यवस्था करून दिली आहे. या पर्यायी मार्गामुळे बससेवा सुरू करण्यात आता कोणतीही अडचण राहिलेली नाही. याबाबत अलिबाग आणि रोहा येथील आगार व्यवस्थापकांना पत्र पाठवून बससेवा सुरू करण्यास हरकत नसल्याचे कळविण्यात आले आहे.
advertisement
या निर्णयानुसार मंगळवार 23 डिसेंबरपासून अलिबाग-रोहा बससेवा सुरू होणार आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून त्रस्त असलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 23, 2025 11:52 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
मोठा दिलासा! सहा महिन्यानंतर अलिबाग-रोहा बस पुन्हा धावणार; नोकरदार आणि विद्यार्थ्यांना फायदा








