Vasai Virar: सिगारेट पिण्याच्या बहाण्यानं बोलावलं, अन् मित्रांनीच गेम वाजवला, एका तक्रारीनं सगळंच संपवलं
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Nalasopara Crime News: वसई-विरार पट्ट्यात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, नालासोपाऱ्यात शुक्रवारी रात्री एका गुंडाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
नालासोपारा: वसई-विरार पट्ट्यात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, नालासोपाऱ्यात शुक्रवारी रात्री एका गुंडाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पूर्ववैमनस्यातून शुभम मिश्रा (३१) याच्यावर ७ ते ८ जणांनी चाकूने वार करत आणि दगडाने ठेचून त्याचा जीव घेतला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. शुभम मिश्रा हा तडीपारीची शिक्षा भोगून आला होता. मात्र, मित्रांनीच जुन्या एका वादातून त्याला संपवल्याची घटना घडली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत शुभम मिश्रा हा नालासोपारा पूर्वेच्या गालानगरमधील रहिवासी होता. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून तो काही काळापूर्वी तडीपारही होता. शुक्रवारी रात्री तो आपल्या अंकित पांडे, रोशन सिंग आणि इतर मित्रांसोबत 'निधिशा बार'मध्ये मद्यपान करत होता. याच दरम्यान जुन्या तक्रारीवरून शुभम आणि रोशन सिंग यांच्यात जोरदार वादावादी झाली. उपस्थित मित्रांनी हा वाद त्यावेळी सोडवला, मात्र रोशनच्या मनात सूडाची भावना कायम होती.
advertisement
सिगारेटच्या बहाण्याने मृत्यूचा सापळा
रात्री साडेअकराच्या सुमारास टिंकल मिश्रा याने शुभमला भेटायला बोलावले. शुभम आणि अंकित रिक्षाने जात असताना नालासोपारा पश्चिमेकडील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ सिगारेट पिण्याच्या बहाण्याने रिक्षा थांबवण्यात आली. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या रोशन सिंग, जगन महेंडी, सुनील मालुसरे आणि सुरज कबाडिया यांनी दुचाकीवरून येऊन शुभमवर हल्ला चढवला.
advertisement
अत्यंत क्रूरपणे मित्रांनीच संपवलं...
सुनील मालुसरे याने शुभमवर चाकूने सपासप वार केले, तर इतर साथीदारांनी त्याला जमिनीवर पाडून दगडाने त्याचे डोके आणि शरीर ठेचून काढले. हा हल्ला इतका भीषण होता की शुभमचा जागीच मृत्यू झाला. शुभमचे नुकतेच लग्न झाले असून त्याला सात महिन्यांचा लहान मुलगा आहे, त्याच्या मृत्यूने कुटुंबावर डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपी सध्या फरार आहेत. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
Location :
Vasai-Virar City,Thane,Maharashtra
First Published :
Feb 22, 2026 8:08 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Vasai Virar: सिगारेट पिण्याच्या बहाण्यानं बोलावलं, अन् मित्रांनीच गेम वाजवला, एका तक्रारीनं सगळंच संपवलं






