2000 हजार वर्षापूर्वीचा खजिना सापडला; जमिनीखाली होती दुर्मीळ नाणी, मौल्यवान दगड; सर्वात मोठ्या शोधाने सस्पेन्स वाढला
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
ऐतिहासिक 'भीर टीला' परिसरात झालेल्या उत्खननात प्राचीन कुषाण राजवटीतील नाणी आणि मौल्यवान दगड सापडले आहेत. या शोधामुळे प्राचीन गांधार प्रदेशातील संस्कृती आणि सम्राट वासुदेव यांच्या काळातील इतिहासावर नवा प्रकाश पडला आहे.
तक्षशिला: पाकिस्तानमधील ऐतिहासिक तक्षशिला शहराजवळ सुरू असलेल्या उत्खननात पुरातत्वशास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेल्या भीर टीला (Bhir Mound) या ठिकाणी करण्यात आलेल्या उत्खननादरम्यान दुर्मीळ सजावटी दगड आणि प्राचीन नाणी सापडली असून, या शोधामुळे या भागातील अतिप्राचीन नागरी संस्कृतीवर नवे प्रकाशझोत पडले आहेत.
advertisement
तज्ज्ञांच्या मते, ही शोधमोहीम प्राचीन संस्कृती समजून घेण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची कडी ठरू शकते. पाकिस्तानमधील ‘डॉन’ या वृत्तपत्रानुसार अधिकाऱ्यांनी या शोधाला गेल्या दशकभरातील या स्थळावरील सर्वात महत्त्वाच्या शोधांपैकी एक मानले आहे.
advertisement
प्राचीन नाणी नेमकी कोणत्या काळातील?
पुरातत्त्वीय दृष्टिकोनातून अत्यंत मोलाच्या अशा या वस्तू प्राचीन भीर टीला परिसरात सापडल्या आहेत. तज्ज्ञांच्या प्राथमिक अभ्यासानुसार, येथे सापडलेले सजावटी दगड इ.स.पू. सहाव्या शतकातील असून, नाणी दुसऱ्या शतकातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. अहवालात नमूद करण्यात आले आहे की, उत्खननादरम्यान सापडलेल्या सजावटी दगडांच्या तुकड्यांची ओळख ‘लॅपिस लॅजुली’ (Lapis Lazuli) या मौल्यवान दगड म्हणून झाली आहे. यासोबतच कुषाण वंशाशी संबंधित दुर्मीळ कांस्य नाणीही सापडली आहेत. या शोधामुळे प्राचीन गांधार प्रदेशाच्या भौतिक इतिहासाला एक नवा पैलू मिळाल्याचे मानले जात आहे.
advertisement
पंजाब पुरातत्त्व विभागाचे उपसंचालक आसिम डोगर यांनी या कलाकृतींच्या प्राथमिक विश्लेषणाची अधिकृत पुष्टी केली आहे. आसिम डोगर हे या उत्खनन पथकाचे प्रमुख असून, त्यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवली जात आहे.
advertisement
नाणी सापडल्यानंतर तज्ज्ञांचे मत काय?
या शोधाबाबत बोलताना आसिम डोगर म्हणाले, “सापडलेले सजावटी दगड लॅपिस लॅजुलीचे आहेत, जे एक अत्यंत मौल्यवान दगड मानले जातात, तर सापडलेली नाणी कुषाण काळातील आहेत.” उत्खनन करणाऱ्या पथकाने धातूच्या कलाकृतींचे वय निश्चित करण्यासाठी विशेष फॉरेन्सिक सहाय्य घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
advertisement
डोगर यांच्या माहितीनुसार, पेशावर विद्यापीठातील तज्ज्ञांनी केलेल्या सविस्तर नाणे-विश्लेषणातून हे स्पष्ट झाले आहे की, या नाण्यांवर सम्राट वासुदेव यांची प्रतिमा कोरलेली आहे. इतिहासकारांच्या मते, सम्राट वासुदेव हे या प्रदेशावर राज्य करणारे शेवटचे कुषाण शासक होते.
advertisement
तक्षशिला नेमकी काय होती?
आसिम डोगर यांनी सांगितले की, परिसरात आढळलेल्या इतर पुरातत्त्वीय पुराव्यांवरून हे अवशेष मुख्यतः निवासी भागाशी संबंधित असल्याचे स्पष्ट होते. या नव्या शोधांमुळे हे अधोरेखित होते की, कुषाण राजवटीच्या काळात तक्षशिला आपल्या राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक प्रभावाच्या सर्वोच्च टप्प्यावर होती.
डोगर म्हणाले, कनिष्कसारख्या सामर्थ्यशाली सम्राटांच्या कारकिर्दीत तक्षशिला एक महत्त्वाचे प्रशासकीय, व्यापारी आणि बौद्धिक केंद्र म्हणून उदयास आली होती. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, या काळात बौद्ध धर्माला कुषाण राजांकडून व्यापक संरक्षण मिळाल्यामुळे स्तूप, मठ आणि विशाल धार्मिक संकुले उभारली गेली.
प्रसिद्ध नाणेशास्त्रज्ञ मलिक ताहिर सुलेमान यांनी ‘डॉन’शी बोलताना सांगितले की, कुषाण काळातील नाणी ही प्राचीन दक्षिण आणि मध्य आशियाचा इतिहास समजून घेण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या ऐतिहासिक स्रोतांपैकी एक मानली जातात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 02, 2026 7:37 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
2000 हजार वर्षापूर्वीचा खजिना सापडला; जमिनीखाली होती दुर्मीळ नाणी, मौल्यवान दगड; सर्वात मोठ्या शोधाने सस्पेन्स वाढला










