बलूच आर्मीने पाकिस्तानच्या छाताडावर घाव घातला, क्वेटा-कराची महामार्गावर ताबा; धडकी भरवणारा हल्ला
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Balochistan Update: बलूचिस्तान पुन्हा पेटला आहे. बंडखोरांनी पाकिस्तानच्या सुरक्षायंत्रणेला चकवा देत थेट पोलीस ठाण्यावर हल्ला करून शहरांवर कब्जा मिळवला आहे.
इस्लामाबाद: पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतात बंडखोरांनी शनिवारी (31 मे) मोठी कारवाई करत सरकारला हादरवून टाकले. बलूच लिबरेशन आर्मी (BLA) या बंडखोर संघटनेने क्वेटा-कराची महामार्ग अडवून मुख्य मार्गावर ताबा मिळवला. या कारवाईदरम्यान त्यांनी लेवी पोलीस ठाण्यावर हल्ला करून संपूर्ण इमारत आपल्या ताब्यात घेतली. पोलीस अधिकाऱ्यांना बंदी बनवले आणि इमारतीला आग लावली.
लेवी पोलीस ठाण्यावर हल्ला आणि लूट
‘द बलूचिस्तान पोस्ट’च्या वृत्तानुसार, शनिवारी संध्याकाळच्या सुमारास सशस्त्र लढवय्यांनी क्वेटा-कराची महामार्ग बंद करून लेवी पोलीस ठाण्यावर अचानक हल्ला चढवला. त्यांनी ठाण्यावरील ताबा घेत पोलीस अधिकाऱ्यांना बंदी बनवले. त्यानंतर ठाण्यातील पोलीस वाहनासह संपूर्ण इमारतीला आग लावण्यात आली. या कारवाईत पोलिसांचे शस्त्रसाठाही लुटण्यात आला आहे.
सोराब शहरावर नियंत्रण
या हल्ल्याआधी बलूच लिबरेशन आर्मीच्या लढवय्यांनी सोराब शहरात मोठा हल्ला करत संपूर्ण शहरावर नियंत्रण मिळवले होते. BLAचे प्रवक्ते जियान्द बलूच यांनी सांगितले की- त्यांच्या कमांडर्सनी पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी कार्यालय, गेस्ट हाऊस आणि बँकांवर ताबा मिळवून प्रशासन पूर्णतः ठप्प केले आहे. बलूचिस्तानमध्ये सतत होत असलेल्या अशा कारवायांमुळे बंडखोर संघटनांचे बळ वाढत असल्याचे आणि पाकिस्तानी लष्कराची पकड कमकुवत होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
advertisement
बलूचिस्तान लिबरेशन फ्रंटचाही हल्ला
या दरम्यान बलूचिस्तानमधील दुसऱ्या सशस्त्र गट बलूचिस्तान लिबरेशन फ्रंट (BLF) नेही पाकिस्तानच्या सुरक्षादलांवर हल्ला केला. BLFचे प्रवक्ते मेजर गौरम बलूच यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास खुजदार नाल परिसरात पैडीच हॉटेलजवळ त्यांच्या लढवय्यांनी अमन फोर्सच्या दोन अधिकाऱ्यांवर हल्ला करून त्यांचा खात्मा केला. त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, पाकिस्तानसाठी काम करणाऱ्या सर्व गटांना भविष्यात लक्ष्य केले जाईल. यासोबतच खारन शहरातही त्यांनी हल्ला केल्याची माहिती दिली आहे.
advertisement
गॅस पाइपलाइनवर हल्ला
शनिवारीच डेरा मुराद जमाली आणि सुई परिसरात गॅस पाइपलाइनवर हल्ला करण्यात आला. सुदैवाने त्या वेळी गॅस पुरवठा सुरु नव्हता, त्यामुळे मोठी हानी टळली. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. मात्र याआधीही या भागात अशा पाईपलाइन्सना लक्ष्य करण्यात आले असून त्या हल्ल्यांची जबाबदारी विविध बंडखोर संघटनांनी स्वीकारली होती.
advertisement
राजकीय आणि लष्करी अस्थिरतेचे वाढते सावट
या सर्व घटनांमुळे बलूचिस्तानमध्ये पुन्हा एकदा अस्थिरतेचे सावट गडद झाले आहे. बंडखोर गटांच्या वाढत्या कारवायांमुळे पाकिस्तानी सरकार आणि लष्कराची चिंता वाढली आहे. बलूचिस्तानातील परिस्थिती नियंत्रणात आणणे हे इस्लामाबादसमोरील मोठे आव्हान ठरत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 01, 2025 4:02 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
बलूच आर्मीने पाकिस्तानच्या छाताडावर घाव घातला, क्वेटा-कराची महामार्गावर ताबा; धडकी भरवणारा हल्ला