कृषी हवामान : पावसाचा जोर वाढणार की ओसरणार? पिकांचं मोठं नुकसान,किती जिल्ह्यांना अलर्ट?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Maharashtra Weather News : अरबी समुद्रात पुन्हा एकदा सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले असून सलग आठव्या दिवशी कमी दाबाचा पट्टा कायम राहिला आहे.
मुंबई : अरबी समुद्रात पुन्हा एकदा सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले असून सलग आठव्या दिवशी कमी दाबाचा पट्टा कायम राहिला आहे. त्यामुळे समुद्रात वाऱ्याचा वेग वाढत आहे आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी याठिकाणी गुरुवारी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले होते. आज पहाटेपासूनही पावसाने जोर धरला असून, वाहतूक आणि जनजीवनावर परिणाम झाला आहे.
राज्यभर सतर्कतेचा इशारा
पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रालाही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सातारा, पुणे, कोल्हापूर, अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. दरम्यान, विदर्भात आठवडाभर जोरदार पावसानंतर हवामान स्थिर झाले आहे.
जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे गुरुवारी सकाळी 6 ते 7 दरम्यान उघडण्यात येणार असून गोदावरी नदीपात्रात 9,432 क्युसेक विसर्ग केला जाईल. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
पूरस्थितीची गंभीरता
कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून आंबेवाडी व चिखली गावांना स्थलांतर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. नाशिकमध्ये गंगापूर धरणातून 6,340 क्युसेक पाणी सोडल्याने गोदावरी नदी पात्रात पाणी वाढले आहे. रामकुंड, गोदाघाट परिसर पाण्याखाली गेला आहे. पुण्यात चासकमान धरण ओव्हरफ्लो झाल्याने 24 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून भीमा नदीत पूरस्थिती निर्माण झाली आहे. इंदापूर तालुक्यात अनेक पूल व बंधारे पाण्याखाली गेले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. हवामान खात्याने नाशिकसाठी रेड अलर्ट, तर पालघर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या काही तासांत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
advertisement
शेतकऱ्यांसाठी सूचना
गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे खरीप पिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेणे गरजेचे आहे. भातासारख्या पाण्याच्या पिकांमध्ये निचरा होण्यासाठी पाटबंधारे खुली ठेवावीत. सोयाबीन, मका, भुईमूग यांसारख्या पिकांच्या शेतात पाणी साचू देऊ नये, अन्यथा मुळे कुजण्याचा धोका आहे.
उभ्या पिकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने शेतात नियमित फेरफटका मारून वेळेवर औषध फवारणी करावी. पालेभाज्या,भाजीपाला यांसाठी ओलावा कमी-जास्त होऊ नये म्हणून प्लास्टिक मल्चिंगचा वापर करावा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 21, 2025 7:59 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
कृषी हवामान : पावसाचा जोर वाढणार की ओसरणार? पिकांचं मोठं नुकसान,किती जिल्ह्यांना अलर्ट?