कृषी हवामान : शेतकऱ्यांचे टेन्शन वाढलं! कोकणासह विदर्भात पावसाचा जोर वाढणार, या जिल्ह्यांना 'येलो' अलर्ट
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचं चित्र दिसत असलं तरी हवामान विभागानं राज्यातील काही भागांसाठी आज (30 जुलै) पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचं चित्र दिसत असलं तरी हवामान विभागानं राज्यातील काही भागांसाठी आज (30 जुलै) पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, घाटमाथा आणि विदर्भात आजही मुसळधार पावसाची शक्यता असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) या भागांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा धोका कायम
कोकणातील रायगड, रत्नागिरी तसेच पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावरील भागांना 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून, दरड कोसळणे, झाडे उन्मळून पडणे तसेच वाहतुकीला अडथळे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही घाटमाथ्यांवरही अतिमुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये आणि हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे.
advertisement
विदर्भात पावसाचा जोर कायम
राज्यात इतर ठिकाणी पावसाचा जोर थोडा ओसरला असला तरी विदर्भात मात्र पाऊस जोरात सुरू आहे. आज संपूर्ण विदर्भासाठी 'यलो अलर्ट' जाहीर करण्यात आला असून, सततच्या पावसामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतपिकांवर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.
मराठवाडा आणि इतर भागांत कमी पावसाचा अंदाज
मराठवाड्यातील बीड, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये मोठ्या पावसाचा धोका नाही. या भागांसाठी 'ग्रीन अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
advertisement
खरीप पिकांची काळजी कशी घ्यावी?
सततच्या पावसामुळे पाण्याचा निचरा नीट होणं गरजेचं आहे. शेतात पाणी साचल्यास मुळे कुजण्याचा धोका वाढतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी नांगरणी व सरी-वरंबा पद्धतीने पाण्याचा निचरा करावा. तण व्यवस्थापनावर लक्ष द्यावे आणि आवश्यक असल्यास बुरशीजन्य रोगांपासून बचावासाठी योग्य फवारणी करावी. सोयाबीन, तूर, मूग, उडीद यांसारख्या खरीप पिकांवर कीड व रोगांची लक्षणे दिसल्यास तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधावा.
advertisement
प्रशासनाकडून आवाहन
view commentsहवामानातील बदल लक्षात घेता प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 30, 2025 8:35 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
कृषी हवामान : शेतकऱ्यांचे टेन्शन वाढलं! कोकणासह विदर्भात पावसाचा जोर वाढणार, या जिल्ह्यांना 'येलो' अलर्ट


