शेतकऱ्यांना मोठा दिलासा! अतिवृष्टीची मदत मिळवण्यासाठी 'ही' अट केली शिथिल
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : राज्यभरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
मुंबई : राज्यभरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता.३०) झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीपूर्वी थेट मदत जमा केली जाईल.
६० लाख हेक्टरवर नुकसान
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ६० लाख हेक्टर क्षेत्रावर शेतीचे नुकसान झाले आहे. यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर झालेच आहे, शिवाय काही भागात जमीन खरडून गेली आहे, विहिरींचे आणि घरांचे नुकसान झाले आहे. पुढील काही दिवसांत नुकसानाचे अचूक सर्वेक्षण पूर्ण होणार असून, त्यानंतर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीची अधिकृत घोषणा करण्यात येईल.
advertisement
अटी शिथिल करून मदत
फडणवीस यांनी स्पष्ट केले की, मदत मिळवण्यासाठी आवश्यक असलेली ई-केवायसीची अट शिथिल करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी अॅग्रीस्टॅक नोंदणीला आधार मानले जाईल. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना प्रक्रियात्मक अडचणी न येता मदत मिळू शकेल. "पुढील दोन ते तीन दिवसांत सर्व माहिती स्पष्ट होईल आणि त्यानंतर पुढील आठवड्यात नुकसानग्रस्तांसाठी मदत जाहीर केली जाईल," असे ते म्हणाले.
advertisement
दिवाळीपूर्वी थेट मदत
राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच बँक खात्यात थेट मदत जमा होईल. त्यामुळे सणाच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वेगळ्या प्रक्रियेत धावपळ करावी लागणार नाही, तर ती थेट खात्यावर जमा केली जाईल.
"ओला दुष्काळ" या संकल्पनेबाबत निर्णय
पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी "ओला दुष्काळ" या विषयावरही भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ अशी कोणतीही संकल्पना नाही. आजवर कधीही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही. तथापि, शेतकऱ्यांच्या सातत्याने होत असलेल्या मागणीचा विचार करून राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
advertisement
दुष्काळातील सवलती आता अतिवृष्टीसाठीही लागू
मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या सवलती दुष्काळ जाहीर झाल्यावर शेतकऱ्यांना दिल्या जातात, त्या आता सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी देखील लागू केल्या जाणार आहेत. यामध्ये कर्जमाफी, वीजबिल सवलती, शुल्क माफी यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश असेल.
शेतकऱ्यांसाठी दिलासा
राज्य मंत्रिमंडळाचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळणार असून, त्यांच्या सणासुदीला आधार मिळेल. नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेऊन शासनाने दिलेल्या हमीप्रमाणे मदतीची रक्कम लवकरच खात्यावर जमा होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 01, 2025 9:45 AM IST