एक एकरमध्ये केली लिंबाची लागवड, 26 वर्षांनंतरही होतोय फायदा, 80 लाख निव्वळ नफा
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
त्यांनी 2000 साली एका एकरात लिंबूची लागवड केली होती. तब्बल 26 वर्षांनंतरही ही बाग त्यांना दरवर्षी लाखोंचे उत्पन्न देत आहे.
सोलापूर : शेतीत योग्य नियोजन आणि संयम असेल तर दीर्घकाळ भरघोस उत्पन्न मिळू शकते, याचे उत्तम उदाहरण सोलापूर जिल्ह्यातील अंकोली येथील शेतकरी प्रदीप हरिदास सरवळे यांनी घालून दिले आहे. त्यांनी 2000 साली एका एकरात लिंबूची लागवड केली होती. तब्बल 26 वर्षांनंतरही ही बाग त्यांना दरवर्षी लाखोंचे उत्पन्न देत आहे.
प्रदीप सरवळे यांनी 2000 साली एका एकरात 16 बाय 16 या अंतरावर लिंबूच्या झाडांची लागवड केली. लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करून खड्ड्यांमध्ये शेणखत टाकून झाडे लावण्यात आली. या लागवडीसाठी त्यावेळी सुमारे एक ते दीड लाख रुपयांचा खर्च आला होता. सुरुवातीच्या दोन वर्षांत बागेतून फारसे उत्पन्न मिळाले नाही.
advertisement
मात्र झाडे वाढू लागल्यावर उत्पादनही वाढू लागले. लागवड केल्यानंतर दोन वर्षांतच बागेवरील संपूर्ण खर्च निघून गेला. त्यानंतर दरवर्षी लिंबाच्या बागेतून सरासरी साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळू लागले. कमी खर्चात सातत्याने उत्पन्न देणारे पीक म्हणून लिंबूची बाग प्रदीप सरवळे यांच्यासाठी फायदेशीर ठरली आहे.
अंकोली गावातच लिंबू खरेदी करणारे व्यापारी असल्यामुळे त्यांना विक्रीसाठी फारशी धावपळ करावी लागत नाही. व्यापारी थेट बागेत येऊन लिंबांची पाहणी करतात आणि माल खरेदी करून घेऊन जातात. त्यामुळे वाहतूक आणि बाजारपेठेची अडचणही कमी झाली आहे. आज या लिंबूच्या बागेला जवळपास 26 वर्षे पूर्ण झाली असून आतापर्यंत या बागेतून प्रदीप सरवळे यांना सुमारे 70 ते 80 लाख रुपयांपर्यंत नफा मिळाला आहे.
advertisement
शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसोबत फळबागांचा विचार करणे गरजेचे असल्याचे सांगत सरवळे म्हणाले की, शेतकऱ्यांनी शेतात दहा गुंठे जरी लिंबूची लागवड केली तरी चांगले उत्पन्न मिळू शकते आणि आर्थिक अडचणीपासून मोठा आधार मिळू शकतो. असा सल्ला शेतकरी प्रदीप यांनी दिला आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Mar 13, 2026 8:22 PM IST





