Women Success Story: चला शेतीकडे! शिक्षिकेची नोकरी सोडून मॅडम शेतात पोहोचल्या, आता वर्षाला करतात 15 लाखांची उलाढाल
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
महिला शेतकरी वैजयंती घारपुरे यांनी शिक्षिकेची नोकरी सोडून शेतीमध्ये लक्ष घातले. त्यानंतर त्यांनी शेतात नवनवीन प्रयोग करायला सुरुवात केली. अनेकांच्या मार्गदर्शनातून आज त्या प्रयोगशील शेती करीत आहेत.
नागपूर: नागपूर जिल्ह्यातील सुकळी घारपुरे येथील महिला शेतकरी वैजयंती घारपुरे(गोखले). लहानपणापासून त्यांना वडिलांकडून शेतीचे धडे मिळाले. त्यानंतर त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि शिक्षिकेची नोकरी त्या करीत होत्या. वडिलांच्या निधनानंतर शेतीची जबाबदारी त्यांच्या आईवर आली. त्या शेती सांभाळत असताना त्यांना खूप अडचणी येऊ लागल्या. तरीही हार न मानता त्यांच्या आईने शेती सांभाळली. 2018 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर वैजयंती यांनी शिक्षिकेची नोकरी सोडून शेतीमध्ये लक्ष घातले. त्यानंतर त्यांनी शेतात नवनवीन प्रयोग करायला सुरुवात केली. अनेकांच्या मार्गदर्शनातून आज त्या प्रयोगशील शेती करीत आहेत.
प्रगतशील महिला शेतकरी वैजयंती घारपुरे (गोखले) यांच्याशी लोकल18 ने संवाद साधला. तेव्हा त्या सांगतात की, मी लहानपणापासूनच शेतीशी जुळलेली आहे. लहान असताना मी वडिलांसोबत शेतात जायची. शेतीचे साधने बघायची. त्यामुळं शेतीबद्दल माया तर मनातून होती. वडील शेती करीत होते. कालांतराने वडिलांची प्रकृती बिघडली. शेतीचे नियोजन बिघडले. तेव्हा मी नोकरी करून वडिलांना मदत करत होते. दहावीनंतर मी टेक्सटाईल्स विषयात डिप्लोमा केला, असे त्या सांगतात.
advertisement
शिक्षिकेची नोकरी सोडून शेतीकडे वाटचाल
पुढे त्या सांगतात की, काही वर्षांनंतर लग्न झाले. लग्नानंतर मी M.A. आणि B.Ed केले आणि शाळेत (Southern Point School, नागपूर) येथे पुन्हा नोकरी करत होते. लग्नानंतर 15 दिवसांनी माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर आईवर सर्व जबाबदारी आली. शेतीची सर्व कामे आई करत होती. माझ्या माहेरी आम्ही चार बहिणीच होतो. मी आईचे कष्ट बघत होती, तिला मदत करत होती. पण, आईला असं वाटत होतं की मी शेतीत येऊ नये. कारण तिने यात खूप चढ-उतार बघितले होते. पण, 2018 मध्ये आईचे निधन झाले आणि मी शेती क्षेत्रात आले.
advertisement
तेव्हा मी शिक्षिकेची नोकरी सोडली आणि मी आईचा आदर्श घेऊन शेती करायला सुरुवात केली. तेव्हा मला माझ्या काकांनी खूप मार्गदर्शन केले. त्यांचे नाव श्याम घारपुरे, ते कृषितज्ञ आहेत. त्यांच्या आधाराने मी शेती करत होते. शेतात दोन वर्ष रासायनिक पीक घेतले. पण, त्यातून मला समाधान मिळत नव्हते. नंतर मी काकाच्या मदतीने नैसर्गिक शेतीला सुरुवात केली. सुरुवातीला खूप अडचणी आल्या. पण, अनेकांच्या मदतीने मी त्या सोडवत गेली.
advertisement
वेगवेगळ्या फाउंडेशनची मदत मिळाली
कालांतराने वेगवेगळ्या शेतकरी संस्थांशी मी जुळत गेले. अंबुजा फाउंडेशन, आत्मा संस्था यासारख्या अनेकांची मला मदत मिळाली. त्यातून खूप फायदा होत गेला. गांडूळखत निर्मिती केली, वेगवेगळी औषधे बनवण्याची संधी मिळाली. त्यातून शेतीला खूप फायदा झाला. अनेक शेतकऱ्यांना यातून पाहिजे ती मदत मिळाली.
advertisement
वार्षिक उलाढाल 13 ते 15 लाखांपर्यंत
वडिलांची 10 एकर शेती आणि भाडेतत्त्वावर घेतलेली 5 एकर शेती असे मिळून 15 एकर शेती मी सध्या सांभाळत आहे. यामध्ये कपाशी हे मुख्य पीक आहे. त्याचबरोबर भाजीपाला, सोयाबीन, गहू, चना, तूर असे सर्व पिकं मी घेते. मला कापूस आणि तुरीचे उत्पन्न एकरी 10 ते 15 क्विंटलपर्यंत मिळते. शेतात पिकवलेली तूर मी मार्केटमध्ये विकत नाही तर त्याची डाळ बनवून विकते. त्यामुळे नफा जास्त मिळतो. तसेच भाजीपाला सुद्धा मी स्वतःच विक्री करते. यासर्व शेतातून माझी वार्षिक उलाढाल 13 ते 15 लाखांपर्यंत होते, असं वैजयंती सांगतात.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
July 24, 2025 5:25 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Women Success Story: चला शेतीकडे! शिक्षिकेची नोकरी सोडून मॅडम शेतात पोहोचल्या, आता वर्षाला करतात 15 लाखांची उलाढाल