ऐन दिवाळीत कोकणचा हापूस बाजारात, कसं झालं शक्य? पहिल्या पेटीला किती भाव?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Sitraj Ramesh Parab
Last Updated:
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर यंदा कोकणचा हापूस बाजारात दाखल झाला आहे. मालवणमधून नाशिकला पहिली पेटी पाठवण्यात आली आहे.
सितराज परब, प्रतिनिधी
सिंधुदुर्ग: दिवाळीच्या मुहूर्तावर आंबा प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर मालवणहून आंब्याची पहिली पेटी बाजारात दाखल झालीये. यंदाच्या मोसमातील पहिली पेटी असल्याने या आंब्याला दरही तसाच मिळाला आहे. साधारणपणे हापूस आंबा सर्वसामान्यांना उन्हाळ्यात खायला मिळतो. परंतु, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुंभारमाठचे आंबा बागायतदार डॉ. उत्तम फोंडेकर आणि बंधू सूर्यकांत फोंडेकर यांनी ऐन दिवाळीत आंबा पिकवला आहे.
advertisement
मालवण तालुक्यातील कुंभारमाठचे आंबा बागायदार असणाऱ्या फोंडेकर बंधूंनी सलग चौथ्यांदा दिवाळी पाडव्याचा मुहूर्त साधला आहे. वातावरणातील बदल, वादळी पाऊस आणि रोगांचा प्रादुर्भाव अशा अनेक संकटांतून उत्तम प्रतिचा आंबा त्यांनी पिकवला आहे. कृषी क्षेत्रातील त्यांच्या या कार्याबद्दल उत्तम फोंडेकर यांना डॉक्टरेट देखील प्रदान करण्यात आलीये. मालवण तालुका कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे यश मिळवलंय.
advertisement
किती मिळाला दर?
फोंडेकर बंधूंनी हापूस आंब्याची पहिली पेटी नाशिकला पाठवली आहे. यंदाच्या मोसमातील पहिलीच पेटी असल्याने हापूसला भावही चांगला मिळाला आहे. 4 डझनाच्या पेटीला 25 हजार रुपयांचा दर मिळाला आहे. जुलै-ऑगस्ट महिन्यात आलेल्या मोहोराचे संरक्षण करून त्यांनी आंब्याचे उत्पादन घेतले आहे. आंब्याची पहिली पेटी पाठविण्याचा मान त्यांनी चौथ्यांदा मिळविला आहे.
advertisement
अनेक संकटांतून पिकवला आंबा
सिंधुदुर्गात यंदा 6 जून ते आतापर्यंत अखंडपणे मुसळधार पाऊस झाला. मात्र अशा प्रकारे प्रतिकूल वातावरणातही त्यांनी मोहोराचे संरक्षण केले. केवळ सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर करून त्यांनी हा मोहोर टिकविला. त्यातून आता त्यांना दोन ते तीन पेटी आंबा उत्पादन मिळण्याचा अंदाज आहे. यातील पहिली चार डझन आंब्याची पेटी 25 हजार रुपयांना विकली आहे. तर आणखी 15 ते 20 दिवसांनी 4 डझन आंबा उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा फोंडेकर यांनी व्यक्त केलीये.
Location :
Sindhudurg,Maharashtra
First Published :
November 06, 2024 3:37 PM IST