राज्यातील शेतकऱ्यांवर नवीन संकट! पशुवैद्यक,पशुधन पर्यवेक्षक घेणार मोठा निर्णय
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : राज्यातील शासकीय पशुवैद्यकीय सेवांवर मोठे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुमारे अडीच हजार शासकीय पशुवैद्यक आणि चार हजार पशुधन पर्यवेक्षक 10 मार्च रोजी सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई : राज्यातील शासकीय पशुवैद्यकीय सेवांवर मोठे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुमारे अडीच हजार शासकीय पशुवैद्यक आणि चार हजार पशुधन पर्यवेक्षक 10 मार्च रोजी सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. हा निर्णय अमलात आल्यास ग्रामीण भागातील हजारो शासकीय पशु रुग्णालयांमधील सेवा ठप्प होऊन शेतकऱ्यांसमोर गंभीर परिस्थिती उभी राहू शकते.
मनुष्यबळाच्या कमतरतेविरोधात आंदोलन
महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटना यांनी पशुसंवर्धन विभागाच्या धोरणांविरोधात राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. संघटनेचा आरोप आहे की अत्यल्प मनुष्यबळावर संपूर्ण व्यवस्था चालवली जात आहे. एका पशुवैद्यकावर अनेक गावांचा कारभार सोपवण्यात आला असून, आधीच कामाच्या ताणाखाली असलेल्या डॉक्टरांकडून रात्री उशिरापर्यंत तातडीची सेवा देण्याची अपेक्षा ठेवली जात आहे.
बदललेली वेळापत्रके आणि वाढलेला प्रशासकीय ताण
संघटनेनुसार, शासकीय पशु दवाखान्यांच्या वेळा कोणतेही ठोस कारण नसताना बदलण्यात आल्या आहेत. फील्डवर्कचा भार वाढलेला असतानाही बायोमेट्रिक उपस्थिती सक्तीची करण्यात आली आहे. सतत ऑनलाईन अहवाल सादर करणे आणि विविध ॲप्सवर माहिती अपडेट ठेवण्याचा दबाव टाकला जात असल्याचे सांगितले जात आहे. तांत्रिक अधिकाऱ्यांकडून अतांत्रिक कामे करून घेतली जात असल्याने आरोग्य सेवेकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार संघटनेने केली आहे.
advertisement
टप्प्याटप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढवणार
आंदोलनाचा पहिला टप्पा 2 मार्चपासून सुरू झाला असून, अडीच हजार पशुवैद्यकांनी शासनाच्या अधिकृत व्हॉट्सअॅप गटांचा बहिष्कार टाकला आहे. 4 मार्च रोजी सर्व पशुवैद्यक काळ्या फिती लावून काम करणार आहेत. 5 मार्चला सामूहिक रजा घेण्यात येणार आहे. 6 मार्चपासून शासकीय अहवाल देणे बंद केले जाईल. 9 मार्च रोजी राज्यभर उपोषण करण्यात येईल. मागण्या मान्य न झाल्यास 10 मार्च रोजी 2500 पशुवैद्यक आणि 4000 पशुधन पर्यवेक्षक सामूहिक राजीनामे देतील, असा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
शेतकऱ्यांपुढे नवे संकट
या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्या यांसारख्या पशुधनासाठी शासकीय दवाखान्यांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. लसीकरण, तातडीचे उपचार आणि कृत्रिम रेतन यांसारख्या सेवा ठप्प झाल्यास दूध उत्पादन आणि पशुपालन व्यवसायावर थेट परिणाम होऊ शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 04, 2026 8:38 AM IST






