कोहळ्यास मार्केटचा फटका, लाखोंचे नुकसान, सांगलीतील शेतकरी चिंतेत
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
युट्युब वरून माहिती घेत, सांगलीच्या शेतकऱ्यारे दोन टप्प्यात सात एकर शेतात कोहळा पिकाचे उत्पादन घेतले आहे. एकरी 40 हजार खर्चून घेतलेल्या भरघोस उत्पादनास कोणत्याच मार्केटला मागणी आणि दर नसल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
प्रीती निकम, सांगली
प्रतिनिधी: सांगलीच्या आष्टा येथील प्रगतिशील शेतकरी सुनील आनंदराव माने ऊस शेतीला फाटा देत फळे आणि भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. युट्यूबवरून माहिती घेत त्यांनी यंदा सात एकरात कोहळ्याची लागवड केली आहे. अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाने कोहळ्याचे पीक जोमदार आले आहे. मात्र सध्या कोणत्याच मार्केटला कोहळ्याची मागणी आणि दर नसल्याने सात एकर कोहळा पिकवून प्रयोगशील शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
advertisement
सुनील माने यांनी पपईचे पीक काढलेल्या सात एकर शेतामध्ये दोन टप्प्यात कोहळ्याची लागवड केली. एकरी 40 हजार रुपये खर्च करून कोहळा पिकवला आहे. रोपवाटिकेमधून कोहळ्याची रोपे त्यांनी तयार करून घेतली. वेलवर्गीय वनस्पती असल्याने संभाव्य रोगराई लक्षात घेऊन पिकाची काळजी घेतली. वेळोवेळी कीटकनाशके आणि बुरशीनाशके फवारली. आता चार एकरचा प्लॉट काढणीला आला आहे. तर तीन एकरचा प्लॉट फुलांनी भरला आहे. कोहळ्याचे पीक जोमदार आले आहे. एक एक कोहळा दहा ते पंधरा किलोचा झाला आहे. कोहळ्यास उत्पादन भरघोस आले असले तरी सध्या कोणत्याच फळ मार्केटमध्ये मागणी नसल्याने सुनील माने चिंतेत सापडले आहेत.
advertisement
शेतकऱ्यांनी काही नवीन प्रयोग करायचा म्हटले तरी अशा संकटांना सामोरे जावं लागते. याने लाखोंचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे, अशी प्रतिक्रिया सुनील माने यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
ते पुढे म्हणाले की, कोहळ्या ऐवजी कलिंगडाचे पीक घेतले असते तर वीस-पंचवीस ठिकाणी स्टॉल लावून विकता आले असते. परंतु कोहळ्यास लोकल मार्केटला मागणी नाही. हा कोहळा शेतामध्येच गाढून खतही करता येत नाही. कारण त्यामध्ये असणाऱ्या बियांपासून भरपूर झाडे उगवून पुढच्या पिकात भांगलनीचा दुप्पट खर्च करावा लागेल. तसेच मार्केटला बिलकुल दर आणि मागणी नसल्याने मजूर लावून शेतातून बाहेर काढणे देखील परवडत नाही. या कोहळ्याचं आता करायचं काय? असा मोठा प्रश्न प्रयोगशील शेतकरी सुनील माने यांना चिंतेत पाडत आहे.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
January 10, 2025 1:18 PM IST