शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मोदी सरकारने युरियाच्या किंमतीबाबत घेतला मोठा निर्णय, फायदा होणार की तोटा?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : २०२६ च्या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणापूर्वी, केंद्र सरकारने देशभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबई : २०२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने सल्फर-लेपित युरियाच्या ४० किलोच्या पिशवीसाठी २५४ रुपयांची कमाल विक्री किंमत निश्चित केली आहे. यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली असून हा निर्णय खत (नियंत्रण) आदेश, १९८५ अंतर्गत तात्काळ लागू झाला आहे.
नियंत्रित दरात खत उपलब्ध करण्याचा उद्देश
मंत्रालयाच्या माहितीनुसार, ही निश्चित किंमत देशभरातील डीलर्स, उत्पादक, आयातदार तसेच पूल हँडलिंग एजन्सींमार्फत चहा, कॉफी, रबर उत्पादक आणि इतर सर्व शेतकऱ्यांना लागू राहणार आहे. शेतकऱ्यांना युरिया ठरावीक आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावा, तसेच काळाबाजार आणि दरवाढीला आळा बसावा, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
advertisement
जीएसटी वेगळा आकारला जाणार
मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, २५४ रुपयांची ही कमाल किंमत जीएसटी किंवा इतर केंद्र व राज्य करांचा समावेश न करता निश्चित करण्यात आली आहे. लागू असल्यास, हे कर विक्रीवेळी वेगळ्या स्वरूपात आकारले जाऊ शकतात.
लहान पिशव्यांसाठी अतिरिक्त शुल्क
डीलर्सना लहान वजनाच्या युरिया पिशव्यांवर पॅकिंग शुल्क आकारण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार २ किलोच्या पिशवीसाठी ₹१.५०, ५ किलोसाठी ₹२.२५, १० किलोसाठी ₹३.५० आणि २५ किलोच्या पिशवीसाठी ₹५ इतके अतिरिक्त शुल्क आकारता येणार आहे. ही अधिसूचना कृषी व शेतकरी कल्याण विभागाकडून जारी करण्यात आली असून त्यावर सहसचिव फ्रँकलिन एल. खोबांग यांची स्वाक्षरी आहे.
advertisement
सल्फर-लेपित युरिया म्हणजे काय?
सल्फर-लेपित युरिया हा नायट्रोजनसोबत सल्फरचा थर असलेला सुधारित खत प्रकार आहे. सल्फर हे पिकांसाठी अत्यावश्यक अन्नद्रव्य असून ते जमिनीत असलेली सल्फरची कमतरता भरून काढते. यामुळे पिकांमध्ये प्रथिन निर्मिती सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
शेतकऱ्यांसाठी फायदे
सल्फर-लेपित युरियाचा वापर केल्याने मातीची सुपीकता वाढते, नायट्रोजनचा कार्यक्षम वापर होतो आणि उत्पादनात लक्षणीय वाढ दिसून येते. हे खत विद्यमान कडुनिंब-लेपित युरियाच्या तुलनेत अधिक परिणामकारक आणि किफायतशीर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. विशेषतः तेलबिया पिकांसाठी सल्फर अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याने या युरियाचा मोठा फायदा होणार आहे. तसेच खतांचा अतिरेकी वापर कमी होऊन पिकांची गुणवत्ता सुधारण्यास मदत मिळणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 01, 2026 2:13 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मोदी सरकारने युरियाच्या किंमतीबाबत घेतला मोठा निर्णय, फायदा होणार की तोटा?








