शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, हळदीच्या दरात मोठी तेजी, हे आहे भाव वाढीचे कारण Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
सांगली बाजारात सध्या हळदीची आवक कमी असल्याने दर प्रतिक्विंटल 12 ते 17 हजारांदरम्यान आहेत. मागील एक महिन्यापासून हळदीचे मार्केट क्विंटलमागे दोन ते तीन हजारांपर्यंत तेजीत आहे.
सांगली : राज्यातील नवीन हळदीचा हंगाम मार्च ते मे दरम्यान सुरू होईल. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली पट्ट्यातील हळद मराठवाडा, विदर्भाच्या तुलनेत थोडी लवकर बाजारात येते. तरीही नवीन हळदीसाठी चार-सहा महिन्यांच्या प्रतीक्षेचा कालावधी आहे. या काळात हळद बाजारभाव कसे राहतील? याबाबत सांगली हळद असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत मर्दा यांनी माहिती दिली आहे.
सांगली बाजारात सध्या हळदीची आवक कमी असल्याने दर प्रतिक्विंटल 12 ते 17 हजारांदरम्यान आहेत. मागील एक महिन्यापासून हळदीचे मार्केट क्विंटलमागे दोन ते तीन हजारांपर्यंत तेजीत आहे. हळद बाजारभावातील तेजीच्या मुख्य कारणांमध्ये कमी होत असलेला हळदीचा शिल्लक साठा (स्टॉक) आणि अतिपावसाने झालेल्या हळद कंदकुजीने हळद उत्पादनात काही प्रमाणात घट झाली. सांगली मार्केट हळद असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत मर्दा यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
ही आहेत कारणे
हळद उत्पादकपट्ट्यात पिकावर कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे हळद उत्पादकतेवर परिणाम होऊन उताऱ्यात काहीशी घट होईल. महाराष्ट्रातील मालाची आवक मार्च-एप्रिल महिन्यापासून सुरू होते. त्यामुळे नव्या हंगामातील हळदीची आवक होण्यास बराचसा कालावधी असल्याने हळदीच्या दरात सरासरी प्रति क्विंटल 2 ते 3 हजारांची तेजी राहिली आहे.
advertisement
भारतीय हळद ही मध्ययुगीन काळापासून जगाचे आकर्षण राहिली आहे. जगातील एकूण हळद उत्पादनात तब्बल 80 टक्के, तर निर्यातीत 35 टक्के वाटा भारताचा आहे. आयुर्वेदाचा इतिहास पाहिला तर हळदीचे महत्त्व आपल्याला पानोपानी दिसते. आपल्या रोजच्या स्वयंपाकात हळद हा जणू अत्यावश्यक घटक असतो. परंतु हळदीचे औषधी गुणधर्म हीच या पिकाची मोठी ताकद आहे. हळदीचा मुख्य वापर असलेली अँटिसेप्टिक क्रीमसारखी उत्पादने लोकप्रिय आहेत. खास करून त्वचेवरच्या आजारासाठी हळदीचा उपयोग होत असल्याने वेगवेगळ्या औषधी उत्पादनांसाठी हळदीची मागणी सातत्याने वाढत आहे.
advertisement
नैसर्गिक आपत्तींमध्ये इतर हंगामी पिकांच्या तुलनेत कमी नुकसान, कीड-रोगांचा प्रादुर्भावही कमी, लागवड आणि काढणीसाठी मिळणारा पुरेसा वेळ, जंगली प्राण्यांचा त्रास नाही, बऱ्यापैकी उत्पादन यामुळे हळद हे पीक देशातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे. आपल्या राज्यातही सांगली, सातारा विभागांतील हे पीक मराठवाडा, विदर्भातही चांगले पिकत आहे. मागील दोन वर्षांपासून हळद बाजारात राहिलेली तेजी शेतकऱ्यांना आधार देत आहे.
advertisement
नव्या हंगामातील हळदीची आवक होण्यास असलेला विलंब त्यासोबतच काही भागांत पिकावर कंदकुज रोगाचा झालेला प्रादुर्भाव यामुळे हळदीच्या उत्पादकतेवर परिणाम राहील. मार्च अखेरपर्यंत हळदीचे दर प्रतिक्विंटल 13 ते 17 हजारांदरम्यान राहण्याची शक्यता हळद बाजारातील तज्ञ सांगत आहेत.
view commentsLocation :
Sangli,Maharashtra
First Published :
December 02, 2025 9:00 PM IST

